वाचक लिहितात...

वाचक
गुरुवार, 5 एप्रिल 2018

वाचक लिहितात...

पारंपरिक खजिन्याची ओळख
 सकाळ साप्ताहिकाचा ‘वाळवण विशेषांक’ (३ मार्च २०१८) अतिशय वाचनीय होता. या वाळवण विशेषांकाचे मुखपृष्ठ पाहून मला लहानपणी, वाड्यातील अंगणात सुती साडीवर, पाटावर, प्लॅस्टिकवर वाळत घातलेले वाळवण डोळ्यासमोर आले. त्याकाळी जेवणाची लज्जत वाढविणारे हे सर्व जिन्नस बनविणे म्हणजे महिला वर्गासाठी एक वार्षिक सोहळाच असायचा. या अंकाच्या निमित्ताने जुन्या आठवणी जागृत झाल्या व सर्व पदार्थांची तयारी ते डब्यात भरेपर्यंतचा संपूर्ण प्रवास डोळ्यासमोरून तरळून गेला.
पानातील या डाव्या बाजूला सणावाराला विशेष स्थान असायचे. एरवीसुद्धा दुपारच्या खाण्यासाठी ताटभर तळण तळले जायचे. आता बाजारात जरी सगळे मिळत असले तरी आई, काकू, आजीच्या हाताची चव पैसे देऊन मिळू शकत नाही. तांदळाच्या ओल्या पापड्या, गव्हाचा चीक ,पापडाचे डांगर, साबुदाण्याच्या अर्धवट वाळलेल्या चिकोड्या ज्यांनी खाल्ल्या असतील त्यांना वाळवणाची प्रकर्षाने आठवण होईल. या अंकामुळे वाळवणाचे काही पदार्थ व पद्धती नव्याने कळल्या. आपल्या  पारंपरिक खजिन्याची नवीन पिढीला ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. सकाळ साप्ताहिकाचे सर्वच अंक व विशेषांक वाचनीय व मननीय असतात.
क्षमा एरंडे, पुणे

उत्तम निरीक्षण
सकाळ साप्ताहिकमधील अमृता देसर्डा यांचे ‘शब्दांची सावली’ हे सदर खूप वाचनीय आहे. लेखिकेचे निरीक्षण अप्रतिम आहे. या सदरातील (२४ मार्च २०१८) ‘झेंडे स्वतःच्या अस्मितेचे’ हा लेख आजच्या पिढीच्या वागणुकीवर आहे. या वर्तनावर काही उपाय करायला हवेत.
डॉ. दिलीप फाळके, नगर

व्याकरणासाठी उपयुक्त सदर
सकाळ साप्ताहिकाच्या अंकात प्रसिद्ध होणारे ‘शब्दाशब्दात’ हे पाक्षिक सदर नियमित लेखन करणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे. एकाच शब्दाचे दोन अर्थ, एकाच उच्चारांचे पण भिन्न अर्थ दाखवणारे इंग्रजी शब्द यांची उत्तम माहिती या सदरातून मिळते. 
संभाजी वाठारकर, चिंचवड

मार्गदर्शक लेखांचा अंक
मी सकाळ साप्ताहिकाचा वीस वर्षापासून नियमित वाचक आहे. सकाळ साप्ताहिकाच्या अंकात प्रसिद्ध होणारी सर्व सदरे अत्यंत वाचनीय, अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त असतात. सोशल मिडीयाच्या काळात, जेव्हा दिशाभूल करणारी माहिती सर्वत्र प्रसारित होत असते तेव्हा डॉ. विद्याधर बापट, डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. वसंतराव पटवर्धन यांच्यासारख्या लेखकांचे अभ्यासपूर्ण लेख मार्गदर्शक ठरतात.
पांडुरंग कुलकर्णी

संबंधित बातम्या