वाचक लिहितात...

वाचक
गुरुवार, 10 मे 2018

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. 
पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

संग्राह्य विशेषांक
सकाळ साप्ताहिकाचा (५ मे २०१८) विवाह विशेष विशेषांक अत्यंत वाचनीय होता. लग्नसराईच्या काळात लग्नाच्या खरेदीसाठी वधू आणि वर पक्षाची नुसती झुंबड उडालेली असते. खरेदी करताना सध्या बाजारात दागिन्यांचे कुठले ट्रेंड प्रसिध्द आहेत, त्यांचे प्रकार याची अद्ययावत माहिती ’सोन्याचा मुहूर्त साधताना’ या लेखातून मिळाली. तसेच लग्नात कपड्यांची खरेदी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हे कपडे खरेदी करताना सध्या बाजारात प्रचलित फॅशन कोणती आहे, कपड्यांचे प्रकार, किंमती याबद्दल माहिती या अंकातून देण्यात आली. याशिवाय 
रोहित एरंडे यांच्या ’नोंदणी विवाह’ या लेखातून ‘रजिस्टर लग्न’ करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया काय असते याची माहिती मिळाली.
- अरुण नाडकर्णी, सोलापूर

मानसिकता बदलत नाही...
सकाळ साप्ताहिकाच्या (२८ एप्रिल २०१८) अंकातील संपादकीय ‘अजून  किती सोसायचे?’ वाचून मन अक्षरशः सुन्न झाले. या घटनेत कथुआ बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीत सहभागी झाल्याबद्दल दोन मंत्र्यांना काही दिवसांपूर्वी राजीनामा द्यावा लागला होता. हे योग्यच  झाले. परंतु हा फेरबदल करताना या  रॅलीत सहभागी असलेल्या तिसऱ्या आमदाराला मंत्रिपद देण्यात आले. याचाच अर्थ आधीच्या दोन मंत्र्यांचा राजीनामा ही केवळ धूळफेक होती. वास्तविक या मुलीला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी शासनाची व पर्यायाने लोकप्रतिनिधींची आहे. याउलट ही एक लहानशी घटना आहे. त्याला जास्त महत्त्व देऊ नये अशी असंवेदनशील वक्तव्ये राज्याचे उपमुख्यमंत्री करत आहेत. जोपर्यंत शासनकर्त्यांची ही मानसिकता बदलत नाही. तोपर्यंत महिलांवरील अत्याचार कसे बंद होतील ?
- बकुल बोरकर, मुंबई

गुंतवणुकीसाठी उपयुक्त सदर
सकाळ साप्ताहिकाच्या अंकातील ‘अर्थनीती’ हे सदर अत्यंत माहितीपूर्ण आहे. शेअरबाजारासारख्या किचकट विषयावर अत्यंत सोप्या शब्दात माहिती या सदरातून दिली जाते. मी आणि माझे मित्र हे सदर अत्यंत नियमितपणे वाचतो. या सदरात गुंतवणूक करताना ज्या टिप्स दिल्या जातात त्यांचे पालन करतो. यामुळे आम्हाला शेअर बाजारातून उत्तम रिटर्न्स मिळत आहेत.
- संजय जाधव, मेलद्वारे

ऑफबिट ठिकाणांची माहिती
सकाळ साप्ताहिकाच्या ( ५ मे २०१८) अंकात प्रसिध्द झालेले निंबाळचा आश्रम हा लेख आवडला. पांडुरंग पाटणकर यांनी आडवाटेवरच्या या ठिकाणाची सुंदर माहिती दिली आहे. 
- नेहा सुनील, बंगलोर

मुले आणि पालकांची भूमिका कळली 
‘सकाळ साप्ताहिका’तील ‘लग्नविषयक’ हे सदर अतिशय वाचनीय आहे. विवाहेच्छू मुलांची मानसिकता लेखिका गौरी कानिटकर यांनी खूप छान सांगितली आहे. ही मुले इतकी गोंधळलेली का असतात, याचे कारण कळते. तसेच पालकांची मनःस्थितीही कळते. दोघेही आपापल्या जागी बरोबरच असतात; याचाच सुवर्णमध्य साधायला हवा. या सदरातील पुढील लेखांबद्दल उत्सुकता वाढली आहे. 
- वसंत वैद्य, अमरावती

संबंधित बातम्या