वाचक लिहितात...

वाचक
गुरुवार, 24 मे 2018

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. ई-मेल ः saptahiksakal@esakal.com    वाचक

बहारदार शैलीतील लेख
सकाळ साप्ताहिकाच्या (१९ मे २०१८) अंकातील पर्यटन सदरामधील अपर्णा सावंत यांचा ’ऑफबीट टर्की’ हा लेख खूप आवडला. टर्कीमधील निसर्गनिर्मित आणि मानवनिर्मित स्थळांची नेमक्‍या शब्दात छान माहिती देण्यात आली आहे. विशेषतः ‘पामुकल्ले’ या ठिकाणाचे वर्णन अत्यंत बहारदार शैलीत करण्यात आले आहे. या लेखात त्यांनी भेट दिलेल्या सर्व ठिकाणांचे ऐतिहासिक संदर्भही दिले आहेत. अपर्णा सावंत यांचा लेख वाचकांच्या मनात टर्कीला भेट देण्याची उत्सुकता निर्माण करतो.
- कल्पना भागवत,  पुणे

आंब्याची उत्कृष्ट माहिती
सकाळ साप्ताहिकच २१ एप्रिल २०१८ चा ‘आंबा विशेष’ अंक आवडला. या अंकाचे मुखपृष्ठ सुंदर आहे. या अंकातील अमित गद्रे यांचा ‘जपतोय गावरान आंब्याचा मेवा’ हा लेख आवडला. या लेखातून आंब्याच्या विविध जाती, तसेच आंब्यावर संशोधन करणाऱ्या संस्था याबद्दल माहिती मिळाली. सकाळ साप्ताहिकाच्या प्रत्येक अंकात वेगवेगळ्या विषयांवरची माहिती दिली जाते. या माहितीपूर्ण लेखामुळे वाचकांच्या ज्ञानात नक्कीच भर पडते. प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांच्या ग्रंथालयात सकाळ साप्ताहिकचा अंक मिळाल्यास याचा फायदा सर्व विद्यार्थ्यांना होईल. प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीने सकाळ साप्ताहिकाचे अंक आवर्जून वाचायला हवेत.
- समीर सतीश कुलकर्णी, कोल्हापूर

आगळ्यावेगळ्या विषयांची माहिती देणारे लेख
मी सकाळ साप्ताहिकचा नियमित वाचक आहे. सकाळ साप्ताहिकाचे सर्व अंक अत्यंत माहितीपूर्ण असतात. सकाळ साप्ताहिकाच्या १२ मे २०१८ च्या अंकातील ‘कासवांचे गाव’ हा रोहित हरीप यांचा लेख अतिशय माहितीपूर्ण होता. वेळाससारख्या छोट्या गावात कासव संवर्धनाचा जो स्तुत्य उपक्रम, तिथल्या गावकऱ्यांकडून राबवला जातो तो नक्कीच प्रशंसनीय आहे. कोकणातल्या सागरी जैवविविधतेचे दर्शन आणि त्यांचे पर्यावरणातील महत्त्व या लेखामुळे समजले. सकाळ साप्ताहिकाच्या १९ मे २०१८ च्या अंकातील राधिका बेहरे यांचा ’बहर उन्हाळ्यातला’ हा लेख अतिशय वेगळा आणि रंजक होता. उन्हाळ्यासारख्या दाहक ऋतूत फुलणारी ही रंगीबेरंगी फुले आणि वृक्ष यांच्याबद्दलची माहिती अतिशय नावीन्यपूर्ण होती. याच अंकातील ’व्हॅली ऑफ बटरफ्लाय’ हा लेख सह्याद्री आणि पश्‍चिम घाटातील जैवविविधता किती समृद्ध आहे याची प्रचिती देणारा होता. वेळासची कासवं असो किंवा आंबा घाटातील फुलपाखरे; सकाळ साप्ताहिकाच्या अंकातून दरवेळी अत्यंत रोचक माहिती आमच्यासारख्या वाचकांना वाचायला मिळते.  
- जनार्दन कामटे, गेवराई, बीड, (ई.-मेलद्वारे)
 

संबंधित बातम्या