वाचक लिहितात...

वाचक
गुरुवार, 7 जून 2018

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

करिअरच्या नव्या संधी कळल्या
 करिअर विशेष अंक उत्तम झाला आहे. यामध्ये कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखांबरोबर इतर कोर्सची माहिती दिल्याने माझ्या पुतणीसाठी त्याचा फायदा झाला. तिने नुकतीच विज्ञान शाखेतून बारावीची परीक्षा दिली आहे. तिला डॉक्‍टर किंवा इंजिनिअर होण्यात रस नाही. त्यामुळे तिने कोणते क्षेत्र निवडावे याबद्दल आम्ही संभ्रमात होतो. तिला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये रस होता मात्र त्याची पूर्ण माहिती नव्हती. ‘सकाळ साप्ताहिक’चा करिअर विशेष हाती पडल्याने तिचा प्रश्‍न सुटला. हॉटेल मॅनेजमेंट (आदरातिथ्य) या गजेंद्र बडेंच्या लेखामुळे तिच्या मनातील शंका दूर झाल्या आहेत. या विशेषांकामुळे आम्हाला ही कळले, की फक्त डॉक्‍टर व इंजिनिअर ही दोनच क्षेत्र करिअरसाठी नाहीत. करिअरसाठी हजारो क्षेत्र उपलब्ध आहेत.
- अविनाश पवार, फलटण  

संग्राह्य अंक
’करिअर विशेष’ हा अंक वाचनीय झाला आहे. विशेष म्हणजे कला शाखेमध्ये करिअरसाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे वाचून आश्‍चर्याचा धक्का बसला. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना प्राथमिक अवस्थेमध्ये काय केले पाहिजे ते अभ्यास कसा, किती करावा या सर्व प्रश्‍नांची उत्तरे देणार तुकाराम जाधव यांचा ’युपीएससी ः आव्हानात्मक संधी’ हा लेख उत्तम झाला आहे. त्यासोबतच करिअरचे प्लॅनिंग करताना काय अडचणी येऊ शकतात हा सांगणार ’करिअरच्या वाटेतील धोके’ हे श्रीराम गीत यांचा लेख प्रत्येक विद्यार्थ्याने वाचावा असाच आहे. हा लेख वाचून विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता ओळखून करिअर निवडता येईल. त्याशिवाय कृषी, हॉटेल मॅनेजेमेंट, ग्राफिक्‍स ॲनिमेशन या क्षेत्रातील करिअरची माहिती देणारा ’करिअर विशेष’ अंक संग्राह्य ही ठेवावा असाच आहे.  
- अमित सद्रे, धायरी, पुणे

भीषण वास्तवाचे दर्शन
सकाळ साप्ताहिकाचा (१२ मे २०१८) अंक अत्यंत वाचनीय होता. महाराष्ट्रातल्या गडचिरोलीमध्ये  निमलष्करी दलाने आणि पोलिसांनी एकत्र येऊन नक्षलवाद्यांच्या कारवायांना आळा घालणारी मोठी कामगिरी केली. या कामगिरी आढावा घेणारा मिलिंद ऊमरे यांचा लेख ‘माओवादाचे मढं’ हा लेख अत्यंत अभ्यासपूर्ण होता. कमीत कमी शब्दात लिहिलेला हा लेख नक्षलवादाचे भीषण वास्तव समोर आणतो. हा लेख समाजासाठी तसेच प्रशासनासाठीसुद्धा मार्गदर्शक आहे. - शिरीषकुमार धायगुडे, पुणे
 

संबंधित बातम्या