वाचक लिहितात...

वाचक
शुक्रवार, 15 जून 2018

वाचक लिहितात...
निवेदन :
 ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

विद्यार्थी-पालकांसाठी उपयुक्त अंक
मी ’सकाळ साप्ताहिक’ अंकाचा नियमित वाचक आहे. २६ मे २०१८ च्या अंकातील संपादकीय ’संवादी कुटुंब हवे’ वाचनीय आहे. संपादकीयमधून विभक्त आणि संयुक्त कुटुंब पद्धतीचे फरक लक्षात आले. प्रत्येक व्यक्तीने कुटुंबात शैक्षणिक, आरोग्य विषयक संवाद साधणेे गरजेचे आहे. नातेसंबंधात आरोग्यवर्धक संदेश पाठवणे गरजेचे आहे. यातून नातेसंबंध बळकट होतील. कुटुंबात उत्साहाचे वातावरण पसरेल. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीत मनमोकळेपणा, हसतमुखपणा असणे अत्यावश्‍यक आहे. कुटुंबात जास्तीत जास्त सलोखा असला तर शिस्त वाढेल ही उत्कृष्ट माहिती यातून मिळाली. तसेच २ जून २०१८ चा करिअर विशेषांक खूप आवडला. करिअर विशेषांकातून अनेक शैक्षणिक कार्सेसची माहिती मिळाली. दहावी, बारावी नंतरचे एकात्मिक अभ्यासक्रम याची उत्कृष्ट माहिती दिली आहे. पुढील शिक्षणासाठी  नामवंत शिक्षण संस्था, विद्यापीठे याबद्दल चांगली माहिती दिली आहे. कोणतेही एज्युकेशनल प्रदर्शन, शिक्षकांचे मार्गदर्शन या सर्वांपेक्षा अधिक माहिती एकाच ’करिअर विशेष’ मधून मिळाली. प्रत्येक विद्यार्थी, पालक, शिक्षक यांनी आवर्जून हा अंक वाचायला हवा. 
समीर सतीश कुलकर्णी, कोल्हापूर

 

माणूस विरुद्ध प्राणी? 
ता. १६ जूनच्या अंकातील ‘हत्ती विरुद्ध माणूस?!’ हा लेख अतिशय वाचनीय आहे. लेखकाने त्या भागात जाऊन माहिती घेतल्याचे लेखनावरून जाणवते. काँक्रिटीकरणामुळे केवळ हत्तीच का, प्राणी विरुद्ध माणूस असाच संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत. किंबहुना अनेक ठिकाणी तसा तो दिसतोही. उदा. मानवी वस्तीत बिबट्याचे दिसणे. हे फारच ठळक उदाहरण झाले. असे काही झाले की आपण म्हणतो, अमक्‍या ठिकाणी बिबळ्या दिसला. पण असे म्हणताना हे लक्षात घेत नाही की तो जिथे दिसला ते ठिकाण कदाचित त्याचा मूळ निवास असेल. आपण अतिक्रमण करून तो आपला बनवला.. आणि आता सोईस्करपणे बिबट्यालाच दोष देतो. यातून मार्ग काढायला हवा. 
- शंकर सातपुते, सोलापूर 

 

संग्राह्य करिअर विशेष 
‘करिअर विशेष’ (ता. ९ जून) अतिशय भावला. विज्ञान, वाणिज्य, कला अशा विविध शाखांतील करिअर संधी सुरेश वांदिले यांनी अगदी विस्ताराने दिल्या. विद्यार्थ्यांसह पालकांना ही माहिती अतिशय उपयुक्त आहे. तज्ज्ञांच्या लेखनाने अनेक संभ्रम दूर झाले. यूपीएससी संदर्भात तुकाराम जाधव यांनी अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे. संग्रही ठेवण्यासारखा हा अंक आहे. 
- गोपाळ देशपांडे, पुणे

 

परखड संपादकीय 
सकाळ साप्ताहिकाचा, ता. २ जूनचा अंक फारच आवडला. ‘कुत्र्याचा चावा आणि आपण’ या संपादकीयमध्ये परखड विचार व्यक्त करून सामान्य जनतेची सुरक्षितता किती गंभीर आहे, हे स्पष्ट करण्यात आले आहे. ‘ढवळगाव’ची माहिती उपयुक्त आहे. डॉ. मंगला नारळीकर यांचे ‘गणितभेट’ हे सदर लहानांबरोबरच मोठ्यांनाही उपयुक्त आहे. विविध प्रकाशनांच्या पुस्तकांचा परिचय वाचनप्रेमींना नक्कीच आवडेल असा आहे. डॉ. सदानंद मोरे यांची लेखमाला विचारप्रवर्तक आहे. अंकच दरवेळी वाचनीय असतो. 
- सुदर्शन वा. तांदळे, पिंपरी-चिंचवड

संबंधित बातम्या