वाचक लिहितात...

वाचक
गुरुवार, 12 जुलै 2018

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

सोप्या शब्दांत मांडलेला किचकट विषय
सकाळ साप्ताहिकच्या अंकातील (१४ जुलै २०१८) ’रुपयाच्या घसरणीचा अन्वयार्थ’ हा कव्हर स्टोरीचा लेख आवडला. रुपया डॉलरच्या तुलनेत का घसरतो आहे? हा किचकट वाटणारा विषय कौस्तुभ केळकर यांनी सोप्या भाषेत मांडला आहे. हा लेख वाचनीय तर आहेच, शिवाय यातून रुपया घसरणीची कारणे आणि त्याचे परिणाम याची चांगली माहिती मिळाली. तसेच लेखकाने केलेली स्विस बॅंकेत असणाऱ्या काळ्या पैशाबाबत सरकारने बेधडक वक्तव्य करण्यापेक्षा एक श्‍वेतपत्रिका काढावी; ती श्‍वेतपत्रिका संसदेच्या पटलावर मांडून सार्वजनिक करावी ही सूचना योग्यच वाटली. कारण काळ्या पैशाच्या बाबतीत आपल्याकडे सत्ताधारी व विरोधक यांच्याकडून केवळ राजकारणच केले जाते. त्यामुळे लेखकाची सूचना यथार्थ आहे.
  गौरव मुके, भांडुप (प)

कुठल्या तोंडाने मते मागणार?
सकाळ साप्ताहिकाच्या अंकातील कट्टा हे सदर अत्यंत वाचनीय असते. कट्टा सदरामध्ये येणारी माहिती वास्तववादी असते. एखाद्या अंकात कट्टा सदर नसेल तर हुरहुर वाटते. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांना ही जबाबदारी पेललेली नाही हे स्पष्ट झाले आहे. आपल्या कर्तृत्वानेच आपण पंतप्रधान झालो हा मोदींचा अहंकार भाजपच्या ज्येष्ठ-श्रेष्ठांना(चाणक्‍यांना) दिसत नाही का? त्यामुळे ‘संपर्क फॉर समर्थन‘च्या नावाखाली मत मागण्यास सुरवात करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि भाजपला माझा प्रश्‍न आहे, की सर्वच स्तरावर अपयश आले असताना तुम्ही कुठल्या तोंडाने मत मागणार आहात.  
सूर्यकांत शानभाग

नकार पचवण्याची ताकद हरवतेय
 साप्ताहिक सकाळच्या २३ जूनच्या अंकातील संपादकीय ’हत्या करुन साधले काय?’ मध्ये म्हटल्याप्रमाणे काय केले म्हणजे माणसे सुधारतील? हा प्रश्न सर्वसामान्यांना वारंवार पडू लागला आहे. आसपास घडणाऱ्या खून-मारामारीच्या घटनांमधून माणसाचे आयुष्य इतके कवडीमोल झाले आहे का? असा प्रश्न पडतो आहे. मनाविरुद्ध घटना घडल्या, की तत्काळ जीव घेऊन टाकायचा त्या व्यक्तीचा; एक घाव दोन तुकडे, आर या पार ,पुढचे पुढे बघू ही वृत्ती इतक्‍या थराला जाऊन पोचली आहे, की यातूून कोणतीही नाती सुटलेली नाहीत. हत्या करून कोणते मानसिक समाधान मिळते, हे कळेनासे झाले आहे. गुन्हा सिद्ध झाल्यावर धड तुला ना मला अशी अवस्था होऊन बसते. गुन्हा करणारा किती थंड डोक्‍याने खून करतो हे काही घटनांमधून दिसून आले आहे. अत्याचार करत खून करून परत मृतदेहाची इतकी विटंबना करायची, की बघणाऱ्याचा थरकाप उडावा. घरच्यांचा विरोध म्हणून नाखुषीने लग्न करायचे आणि प्रियकराच्या मदतीने नवरा/नवरीचा काटा काढायचा. काय साध्य होते यातून? किती घरे उद्ध्वस्त होतात. मागचा पुढचा काहीही विचार न करता फक्त स्वखुषीसाठी समोरच्याला संपवायचे. या घटना इतक्‍या वाढल्या आहेत, की नातेसंबंधांवरचा विश्वासच उडावा. मनाविरुद्ध घडले, की घे जीव. इतका जीव स्वस्त झाला आहे का? नकार, अपयश पचविण्याची ताकदच माणूस हरवत चालला आहे. हे कुठेतरी थांबायला हवं. सूडापोटी बदला मग परत सूड हे नष्टचक्र थांबले पाहिजे. सुसंवाद घडायला हवेत, नाही तर हा भस्मासूर वाढतच जाईल.  
- क्षमा एरंडे, पुणे (ईमेलवरुन)

संबंधित बातम्या