वाचक लिहितात...

वाचक
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

’स्पर्धा परीक्षांचा गेट वे’ फायद्याचा
मी ’सकाळ साप्ताहिक’चा नियमित वाचक आहे. गेल्या तीन वर्षांपासून पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षा विशेषतः यूपीएससीचा अभ्यास करत आहे. युपीएससीची तयारी मराठी माध्यमातून करतो आहे. त्यासाठी ’सकाळ साप्ताहिक’मधील ’स्पर्धा परीक्षांचा गेट वे’ या सदरातील चालू घडामोडी व क्वीझ या लेखांचा खूप फायदा झाला. गावाकडे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये देखील या सदराची बरीच चर्चा होत असते. मागील काही अंकांत हा विभाग निदर्शनास आलेला नाही. तो बंद केला गेलाय का? जर तो बंद केला असल्यास माझी विनंती आहे, की हा भाग पुन्हा सुरू करावा.
प्रवीण काळे, ई-मेलवरून

उद्‌बोधक संपादकीय 
मी शेतकरी असून माझे वय ९३ आहे. मी सकाळ साप्ताहिकाचा नियमित वाचक आहे. आमच्या वाचनालयात अनेक साप्ताहिके व मासिके येतात. सर्वांत आधी सकाळ साप्ताहिकाचे वाचन करण्यास मी प्राधान्य देतो, कारण सर्वप्रकारची उपयुक्त माहिती सकाळ साप्ताहिकात असते. सकाळ साप्ताहिकामुळे ज्ञानात भर पडते. मी २१ जुलैचा अंक वाचला. या अंकातील संपादकीय ’अपत्याची व्यापक व्याख्या’ हे उद्‌बोधक आहे. मुले आपल्या आईवडिलांच्या इस्टेट, पैसा, मालमत्ता यावर हक्क दाखवतात प्रसंगी कोर्ट कचेरी करतात परंतु त्यांचे संगोपन करण्यात उदासीन असतात. सध्या वृद्धश्रमांची संख्या फार वाढत आहे. परंतु या वयात वृद्धांना आपुलकी, प्रेमासोबतच उपयुक्त खाद्य, पैशाची जास्त जरुरी असते. सध्या वृद्धांची स्थिती दयनीय झाली आहे. हे संपादकीय सर्व तरुणांनीदेखील वाचायला हवे असे वाटते.
माधवराव शंकराव पाटील, पिंपळगाव हरेश्वर, जळगाव

संग्रही ठेवावा असा लेख
साप्ताहिक सकाळ मधील डॉ. सदानंद मोरे यांच्या ’लोकयात्रा’ सदरातील ’नायक व महानायक’ हा लेख वाचनीय होता. समाजकारण व राजकारणाचा अभ्यास करण्याऱ्या सर्वांनी हा लेख संग्राह्य ठेवावा असाच आहे. मी आत्तापर्यंत लोकयात्रा या सदरातील सर्व लेख वाचलेले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासावर इतके सुंदर, सोपे, सुटसुटीत विश्‍लेषण माझ्यातरी वाचनात आले नव्हते. मोरे सरांच्या उत्तम लेखांबद्दल अभिनंदन.
मनोहर जांभेकर, चिंचवड
 

संबंधित बातम्या