वाचक लिहितात...

वाचक
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

चाय गर्रर्रऽऽर्रम आवडला
फक्त चहा या विषयावर विशेष अंक काढल्याबद्दल सकाळ साप्ताहिकचे अभिनंदन. चहा मला आवडतो. मात्र चहाची एवढी रूपं; ती देखील एकाच अंकात. व्वा! हा अंक मी एका बैठकीत वाचून संपवला. यामध्ये विशेष भावला तो आशिष तागडे यांचा ‘शतकी चव’ हा लेख. या लेखातून अमृततुल्यची सुरवात कशी झाली आणि आता त्याची स्थिती काय आहे, याची अप्रतिम माहिती लेखकाने दिली आहे. मी पुण्यात अनेक वर्षे होतो. अमृततुल्यच्या दुकानात जाऊन अनेकदा चहा प्यालो. मात्र अमृततुल्यविषयीची एवढी चांगली आणि अभ्यासपूर्ण माहिती मला प्रथमच मिळाली. धन्यवाद सकाळ साप्ताहिक...
– अविनाश पवार, फलटण

ताजातवाना करणारा ‘चहा विशेषांक’
सकाळ साप्ताहिकाचा (८ सप्टेंबर २०१८) चहा विशेषांक वाचला. हा अंक वाचून अतिशय ताजेतवाने झाल्यासारखे वाटले. चहा या एकाच विषयाला किती कंगोरे असू शकतात, हे या अंकामुळे कळले. चहाचे आपल्याशी किती जवळचे आणि घट्ट नाते आहे, हे अंक वाचताना जाणवले. सकाळ साप्ताहिकाच्या या अंकामुळे चहाच्या वेगवेगळ्या ‘स्टार्ट अप’ची आगळीवेगळी माहिती मिळाली. सकाळ साप्ताहिकचा चहा विशेषांक संग्राह्य आहे.
– प्रिया प्रकाश निकुम, नाशिक

’चहा स्टार्टअप’ प्रेरणादायी
चहा मला फारसा आवडत नाही. मात्र चाय गर्रर्रऽऽर्रम हा अंक वाचला आणि चहाच्या प्रेमातच पडलो. या अंकामधील सर्वच लेख वाचनीय आहेत. मात्र ‘चहा स्टार्टअप’विषयी असलेले ’शुद्ध देशी तंदूर चहा’ ’कडक स्पेशल भारतीय जलपान’ ’येवले अमततुल्य... चव न्यारी’ ’फक्त चहा’चा आधार तसेच ’रिडिफाइन्ड टी’ हे लेख खूपच आवडले. मराठी तरुण मुले परिस्थितीसमोर हतबल न होता व्यवसायामध्ये यशस्वी होत आहेत, हे वाचून आनंद झाला. हे ’चहा स्टार्टअप’ प्रेरणादायी असून मराठी मुले मोठ्या प्रमाणात उद्योग-व्यवसायात येतील अशी आशा आहे.
– राजेंद्र भावसार, सोलापूर

मित्रांची आठवण आली
‘सकाळ साप्ताहिक’चा चाय गर्रर्रऽऽर्रम हा विशेषांक आवडला. या अंकामधील ‘चहाबाज’ या सदरातील मुलांची मनोगते वाचून मला माझ्या मित्रांची आठवण आली. कारण चहासाठी आम्ही चार-पाच मित्र न चुकता एका चहाच्या दुकानावर रोज जमायचो. तेथे कित्येक तास आमची गप्पांची मैफल रंगायची. राजकारणापासून बॉलिवूडपर्यंतच्या चर्चा या अड्ड्यावर रंगायच्या. या ‘चहाबाजां’नी व्यक्त केलेली मनोगते म्हणजे आपलेच मनोगत कोणीतरी व्यक्त करत आहे, असे हा अंक वाचताना वारंवार वाटत होते.
– प्रवीण जाधव, बारामती

चहाबद्दलची नावीन्यपुर्ण माहिती
सकाळ साप्ताहिकचा (८ सप्टेंबर २०१८) चहा विशेषांक नुकताच वाचून पूर्ण केला. आपल्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या चहाबद्दलची नावीन्यपूर्ण माहिती या अंकातून मिळाली. ब्रिटिश नंदी यांचा ‘हाच तो चहा!’ हा चहाचे महात्म्य सांगणारा लेख अत्यंत वाचनीय आहे. याशिवाय अंकातील चहाचे स्टार्टअप, ‘चहाबाजां’ची मनोगते, चहाचा इतिहास या विषयांवरचे लेखही माहितीपूर्ण होते.
– सुधीर टाकसाळे, खेड

संबंधित बातम्या