वाचक लिहितात...

वाचक
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

रुपककथा आवडली
'सकाळ साप्ताहिक'चा ६ ऑक्‍टोबरचा अंक वाचला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय परिस्थिती काय असू शकते? यावर भाष्य करणारे त्रांगडे आणि त्रेधातिरपीट!, तिसऱ्या आघाडीला संधी मिळेल?, आव्हान की संधी?, पुनरावृत्तीपुढील आव्हाने? हे सारेच लेख वाचनीय आहेत. राजकीय घडामोडींचा अभ्यास करणाऱ्यांकडे हा अंक संग्राह्य हवा. या अंकातील ब्रिटिश नंदी यांचे द्राक्षबागेतील एमू! ही रूपक कथा वाचून मनसोक्त हसलो. राजकीय घडामोंडीवर एवढे चपखल आणि तिरकस भाष्य माझ्या वाचनात आले नव्हते. ब्रिटिश नंदींना मनापासून धन्यवाद.
आशिष पवार, फलटण    

संग्राह्य अंक
‘सकाळ साप्ताहिक’चा गणपती विशेषांक वाचला. मुखपृष्ठावरील गणरायाच्या दर्शनाने मन प्रसन्न झाले. गणेश मूर्ती कशी असावी? तिची प्राणप्रतिष्ठा कशी करावी? विसर्जन कसे करावे? सर्व शास्त्रोक्त माहिती पंचांगकर्ते मोहन दाते यांनी गणेशभक्तांना आपल्या लेखातून दिली. तर ‘मंत्र पुष्पांजली’चे माहात्म्य श्रीकांत नवरे यांच्या लेखात वाचायला मिळाले. आजच्या काळात गरजेचा असणारा पर्यावरणपूरक गणेशोत्सव कसा साजरा करावा, याविषयी विवेक सरपोतदार यांनी दिलेली माहिती प्रत्येकाने आवर्जून वाचावी. तसेच ‘संध्याछायेतील स्वतंत्र वाट’ हे संपादकीय विचारप्रवर्तक वाटले. घटस्फोट, काडीमोड हे शब्द एरवी अंगावर काटा आणणारेच असतात. त्यामुळे हे टाळण्यासाठी पती पत्नी दोघांमध्ये समजूतदारपणा हवा. 
अशोक कोर्टीकर, पंढरपूर

‘चाय गर्रर्रऽऽऽर्रम’ तलफ भागवणारा अंक
  ‘सकाळ साप्ताहिक’चा ’चाय गर्रर्रऽऽऽर्रम’ हा अंक सर्वांच्या चहाची तलफ भागवणार वाटला. चहा म्हणजे भारतीयांचा जीव की प्राण. मित्र जोडणारा, पाहुणचार करणारा, अंगात उब निर्माण करणारा अशी चहाची वैशिष्ट्ये माहिती होती. पूर्वी टपरीवर चहा कटिंग, टक्कर, मारामारी, पानीकम वगैरे नावाने मिळायचा; पण आठ सप्टेंबरच्या अंकातील  इलायची चहा, इराणी चहा, ड्रायफ्रूट चहा, ग्रीन टी, ब्लॅक टी, व्हाइट टी, प्युअर टी, हर्बल टी, तंदूर चहा, बासुंदी चहा, कहवा टी, आयुर्वेदिक टी, अमृत टी, हल्दी टी, मसाला टी, आइसलेमन टी असे चहाचे असंख्य प्रकार वाचनात आले. हा अंक चहा न आवडणाऱ्या व्यक्तीच्या वाचनात आला तर तो देखील चहाच्या प्रेमात पडेल.  
रावसाहेब शिरोळे, रुकडी, कोल्हापूर
 

संबंधित बातम्या