वाचक लिहितात...

वाचक
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

माहितीपूर्ण लेखांचा खजिना
दिवाळी आणि ‘साप्ताहिक सकाळ’चा दिवाळी अंक यांचे नाते जुने आहे. सकाळ साप्ताहिकाचा अंक दिवाळीची मजा नेहमीच द्विगुणित करतो. यंदाचा दिवाळी अंकसुद्धा याला अपवाद नाही. उत्तमोत्तम कथा, माहितीपूर्ण लेख आणि वाचनीय कविता यंदाच्या दिवाळी अंकातून वाचायला मिळाल्या. डॉ. बाळ फोंडके यांचा लेख ‘कानोकानी’ एका  वेगळा विषयावरचा अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी असलेला लेख आहे. ‘फेक न्यूज’ आणि ‘पोस्ट ट्रुथ’ या दोन शब्दांचे जागतिक संदर्भ आणि हे शब्द कसे प्रचलित झाले याची अत्यंत उपयुक्त माहिती या लेखामुळे कळली. याशिवाय राधिका टिपरे यांचा ‘अंर्टाक्‍टिकाची रोमांचक सफर’ हा लेख वाचताना फार मजा आली. या लेखामुळे पृथ्वीच्या दुसऱ्या टोकाची सैर घरबसल्या करता आली. या सफरीतले लेखिकेचे अनुभव अत्यंत बोलके आणि साध्या सरळ पद्धतीने मांडलेले असल्याने एका दमात सगळा लेख वाचून काढला. अभिजित पेंढारकर यांची कोकणच्या पार्श्‍वभूमीवर घडणारी शांतक्काची कथा खिळवून ठेवणारी आहे. 
दिगंबर देशमुख, नाशिक

दर्जेदार दिवाळी अंक
यंदाच्या दिवाळीत सर्वाधिक प्रतीक्षा होती ती ‘साप्ताहिका’च्या दिवाळी अंकाची. मी सकाळ साप्ताहिकाचा नियमित वाचक आहे. या वर्षीचा दिवाळी अंक ही अत्यंत दर्जेदार लेखांनी आणि कथांनी सजलेला होता. अंकातील ‘भटकंती’ या विषयावरचा परिसंवाद अत्यंत वेगळ्या विषयाला हात घालणारा होता. भटकंतीसारखा छंद जर डोळस पद्धतीने जोपासला, तर आयुष्य कसे सर्वार्थाने समृद्ध होते याची छान माहिती या परिसंवादाद्वारे मिळाली. गणेश देवी, माधव गाडगीळ यासारख्या मान्यवरांच्या भटकंतीचे अनोखे पैलू यानिमित्ताने वाचायला मिळाले. 
विभावरी देशपांडे यांचा ‘प्रिय लोकशाही’ हा लेख देशातल्या प्रत्येक जबाबदार नागरिकाला अंतर्मुख करणारा लेख होता. गौतम पंगू यांच्या ‘दुवा’ या कथेतून व्यक्त होणाऱ्या जाणिवा या नव्या पिढीच्या आहेत. त्यामुळे कथा वाचताना वेगळा अनुभव येतो. सकाळ साप्ताहिकाच्या अंकातील कवितांचा विभागही अत्यंत वाचनीय असा आहे. संदीप खरे, इंद्रजित भालेराव, रेणू पाचपोर, प्रकाश होळकर यासारख्या नामवंतांच्या कविता मनाला भिडणाऱ्या आहेत. याशिवाय अनिल अवचट यांचा साध्या सोप्या भाषेत लिहिलेला ‘ऋण बांबूचे’ या लेख वाचकांच्या ज्ञानात भर घालणारा आहे. 
योगिनी कोडीतकर, अमरावती

वैविध्यपूर्ण विषयांनी परिपूर्ण अंक
मी सकाळ साप्तहिकचा नियमित वाचक आहे. यंदाच्या दिवाळी अंकातील विषयांचे वैविध्य वाखाणण्याजोगे होते. कथा, कविता, लेख, परिसंवाद अशा विविध विषयांचा समावेश असलेला हा दिवाळी अंक हा नक्कीच संग्रही ठेवावा असा आहे. अंकातील लक्ष्मीकांत देशमुख यांची ‘प्यार की राह दिखा दुनिया को’ हा कथा खूप आवडली. काश्‍मीरसारख्या संवेदनशील विषयावर या कथेतून केलेले भाष्य वाचकांना विचार करायला प्रवृत्त करते. डॉ. मंदार दातार यांचा ‘जिगरबाज गवत’ हा गवतावरचा विषय अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण होता. याशिवाय, संजय दाबके यांचा ‘होरपळलेला युरोप - तेव्हा आणि आत्ता’ या लेख एकदम चाकोरीबाहेरचा होता. देशपरदेशात फिरायला जाताना त्या त्या देशांचा इतिहास जाणून घेतला, तर आपला प्रवास एकदम वेगळ्या उंचीवर जातो. लेखकाने या लेखात समाविष्ट केलेल्या नव्या-जुन्या छायाचित्रांमुळे लेख अत्यंत परिणामकारक आहे. आपल्या प्रवासाचे डॉक्‍युमेंटेशन कसे करावे यांचे एक उत्तम उदाहरण आहे. अशाच नावीन्यपूर्ण विषयांनी युक्त हा दिवाळी अंक सर्वार्थाने वाचनीय असा दिवाळी अंक झाला आहे.
विनया करवंदे, मुंबई
 

संबंधित बातम्या