वाचक लिहितात...

वाचक
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

विविध विषयांना स्पर्श करणारे लेख
सकाळ साप्ताहिकाच्या अंकातील (१५ डिसेंबर २०१८) कव्हर स्टोरी, ‘मराठा आरक्षण - एक राष्ट्रीय प्रवाह’ हा लेख मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर वेगळ्या अंगाने प्रकाश टाकणारा लेख आहे. मराठा आरक्षणाचे देशपातळीवर कसे आणि काय परिणाम होतील याचे उत्तम विश्‍लेषण या लेखात करण्यात आले आहे. अनुज खरे यांच्या ‘एका अरण्याची गोष्ट’ या लेखामुळे, नष्ट होत चाललेले पन्ना नॅशनल पार्क पुन्हा कसे बहरले याची फार छान माहिती वाचायला मिळाली. वाघासारखा राजबिंडा प्राणी आज केवळ भारतात शिल्लक आहे. त्यामुळे हा प्राणी जिवंत ठेवणे किती जास्त गरजेचे आहे याची जाणीव हा लेख वाचून झाली. टेक्‍नोसॅव्ही सदराचे लेखक वैभव पुराणिक यांच्या ‘ अमेरिकेतील फायर चळवळ’ या लेखाद्वारे अमेरिकेतल्या मध्यमवर्गाविषयी नवीन माहिती मिळाली. एकाच अंकात विविध विषयांना स्पर्श करणारे लेख हे साप्ताहिकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
- संदेश नलावडे, दापोली.

संग्राह्य साप्ताहिक
मी सकाळ साप्ताहिकाचा नियमित वाचक आहे. सकाळ साप्ताहिकाचा (२४ नोव्हेंबर २०१८) ‘भारतीय मसाले विशेषांक’ खूपच आवडला. अंकाचे मुखपृष्ठ अत्यंत सुंदर आहे. डॉ. विद्याधर बापट यांचा ‘क्षण संक्षिप्त - माइंडफुलनेस’ हा लेख आवडला. लेखातून नातेसंबंधांतील गोडवा, योग्य आहार, व्यक्तिमत्त्व विकास कशासाठी याची सुंदर माहिती मिळाली. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटावा यामधून मानसिक आरोग्य उत्तम राहते. माइंडफुलनेस तंत्राच्या सरावाने शारीरिक व मानसिक स्वास्थ मिळते याची उत्कृष्ट माहिती मिळाली. डिजिटलाय सदरातील औद्योगिक प्रकाशचित्रण हा सतीश पाकणीकर यांचा लेख अत्यंत वाचनीय आहे. लेखातून औद्योगिक प्रकाशचित्रणाची उत्तम माहिती मिळाली. साप्ताहिकातील मुलांचे पान, पर्यटनविषयक माहिती, कविता, भारतीय मसाले यांची उत्कृष्ट माहिती मिळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडत आहे. सकाळ साप्ताहिक सर्व विद्यार्थ्यांना निश्‍चित मार्गदर्शक आहे. 
- समीर कुलकर्णी

शेअर बाजाराविषयी अचूक निदान
सकाळ साप्ताहिकमध्ये प्रसिद्ध होणारे वसंत पटवर्धन यांचे ‘अर्थनीती’ हे सदर शेअरबाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. या सदरात गुंतवणुकीविषयी दिले जाणारे सल्ले अत्यंत बिनचूक असतात. आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या अनेक घटनांचा शेअरबाजारावर कसा परिणाम होऊ शकतो याची कल्पना पटवर्धन सरांचा लेख वाचताना येते. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास उत्सुक असणाऱ्यांनी सकाळ साप्ताहिकमधील हे सदर नियमित वाचावे.
- अतुल रणदिवे, अमरावती

‘टेस्टी’गोष्टी आवडते सदर
मी ‘सकाळ साप्ताहिका’चा नियमित वाचक आहे. साप्ताहिकामध्ये प्रसिद्ध होणारे डॉ. मंदार दातार यांचे ‘टेस्टी गोष्टी’ हे सदर मी नियमित वाचतो. या सदरात वेगवेगळ्या गोष्टींची अत्यंत छान व उपयुक्त माहिती दिली जाते. ही माहिती सर्व वयोगटातल्या वाचकांच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या सदरातील लेखांचे संकलन करून त्याचे पुस्तक तयार करावे असे माझे वाचक म्हणून आग्रहाचे सांगणे आहे.
- अरुण जोशी, औरंगाबाद (ई.-मेलद्वारे)

संबंधित बातम्या