वाचक लिहितात...

वाचक
गुरुवार, 27 डिसेंबर 2018

वाचक लिहितात...
निवेदन : ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

...तर अडचण येणार नाही
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये ‘लग्नविषयक’ या सदरात प्रसिद्ध झालेले सर्व लेख चांगले असतात. या लेखांमधील सर्वच माहिती अनुकरणीय आहे. आपल्या मुला-मुलींचे लग्न ठरवताना व लग्न झाल्यानंतर आई-वडिलांना काय खबरदारी घ्यायची, याची माहिती या लेखांमधून मिळते. शिवाय लग्नानंतर येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जायचे, याचेही मार्गदर्शन या लेखांमधून केलेले असते.
हल्ली मुलामुलींचे शिक्षण, नोकरी किंवा अन्य कारणामुळे लग्ने उशिरा होतात. उशिरा लग्न झाल्यामुळे उशिरा अपत्य व त्यांच्या संगोपनात करण्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे योग्य वयात लग्न करण्याचा विचार पालकांनी आपल्या पाल्यावर बिंबवण्याची आवश्‍यकता आहे. नातेसंबंध टिकवण्यासाठी भारतीय कुटुंबव्यवस्था परिपूर्ण आहेत. आपल्या वाडवडिलांनी जे रीतिरिवाज पाळले त्याचे जतन आजच्या पिढीने करायला हवे, असे मला वाटते. शेवटी संसारात यशस्वी होण्यासाठी कुटुंबामधली लोकांमध्ये आत्मीयता, प्रेम, समर्पणाची भावना वृद्धिंगत व्हावयास हवी. शेवटी कोणाचा का संसार असेना, लग्न काही ८-१० वर्षांची गोष्ट नाही. तर प्रत्येकाच्या आयुष्यात उतार चढाव, सुख-दुःख, चांगले वाईट असे प्रसंग येतच राहणार. तेव्हा त्या प्रसंगांना तोंड देणे यातच संसाराचे खरे गमक आहे, आणि हेच आपल्या वाडवडिलांनी केले.  
- दि. ह. दांडेकर, पुणे.


भाजपने धडा घ्यावा
‘सकाळ साप्ताहिक’च्या २२ डिसेंबरच्या अंकातील ‘काँग्रेसला नवसंजीवनी...’ हा लेख वाचला. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. तीन राज्यात काँग्रेसला बहुमत मिळाले. अनेकांना हा पराभव राज्य सरकारचा नसून नरेंद्र मोदी यांचा वाटतो आहे. मात्र पराभूत राज्यातील भाजप मुख्यमंत्र्यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. या पराभवासाठी एकट्या मोदींना दोषी ठरवता येणार नाही. लोकसभेच्या निवडणुकीसाठी अजूनही चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे या पराभवापासून धडा घेत भाजप काँग्रेसचा पराभव करेल.
- सुशांत गद्रे, धायरी, पुणे


प्रेरणा देणारा अंक
मी गेली ३२ वर्षे अन्‌ ८ महिन्यापासून म्हणजेच २ ऑक्‍टोबर १९८७ पासून ‘सकाळ साप्ताहिक’चा वाचक आहे. या गोष्टीचा मला सार्थ अभिमानही वाटतो. मराठी वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या साप्ताहिकांमध्ये ‘सकाळ साप्ताहिक’चा प्रथम क्रमांक आहे. ‘सकाळ साप्ताहिक’ची उज्वल परंपरा ८ डिसेंबर २०१८ च्या अंकानेही पुढे नेली आहे. ‘समानतेचा लढा...असाही’ या संपादकीयमध्ये मांडलेला विषय प्रत्येक कुटुंबाचा जिव्हाळ्याचाच आहे. बाळाचे संगोपन ही आई-वडील दोघांचीही जबाबदारी असते. हे पटवून देण्यासाठी डॉन्टे पल्मर व त्यांची पत्नी लेईशा यांनी अमेरिकेत सर्वप्रथम ‘squat for change‘ ही मोहीम सुरू केली. आता ती जगभरात सुरू झालेली आहे. पुरुषप्रधान संस्कृती जपणाऱ्या सर्व राष्ट्रांबरोबरच भारतानेही ती स्वीकारलेली आहे. 
‘मठ नसलेला आचार्य’ या लेखामधून चुंबकीय व्यक्तिमत्त्व लाभलेल्या दिलीप गणेश माजगावकर यांच्या राष्ट्रउभारणीच्या अन्‌ ग्रामविकासाच्या कार्याची माहिती आणि महती समजली. सात संस्थांना तब्बल ४५ लाखांचा निधी देणाऱ्या दातृत्वाचा आदर्श प्रस्थापित करणाऱ्या ‘दिमा’चे अभिनंदन. मातृभाषेसाठी ५०० दिवसात २० हजार किमीचा सायकल प्रवास करणाऱ्या गंधार विलास कुलकर्णी या ध्येयवेड्या तरुणाला मानाचा मुजरा. ‘वऱ्हाडातील सौंदर्यस्थळे’ या लेखामधील लोणार सरोवराची माहिती वाचून लोणार परिसर पाहून आलेल्या मला पुनःप्रत्ययाचा आनंद लाभला. - अशोक वा. कोर्टीकर, पंढरपूर.

संबंधित बातम्या