वाचक लिहितात...

वाचक
गुरुवार, 3 जानेवारी 2019

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

संग्राह्य दिवाळी अंक 
‘सकाळ साप्ताहिक’ दिवाळी अंक (२०१८) वाचला. एक चांगला दिवाळी अंक वाचण्याचा आनंद मिळाला. अंकातील लेखांची निवड व मांडणी आवडली. सर्वच लेखकांचे लेख वाचनीय. कवितांनी थोडी निराशा केली. पद्यात लिहिलेल्या कवितेसारख्या वाटल्या नाहीत. कदाचित सध्या अशाच प्रकारे कविता लिहिल्या जात असाव्यात. तरीसुद्धा इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली ‘रहना नही देश बिराना है’ कविता वास्तववादी हृदयाला छेदून मेंदूपर्यंत पोचणारी आणि सुनील ज्ञानदेव कापसे यांची ‘आमचे बापू’ साधी, सरळ भावस्पशी कविता आहे. या दोन्ही कविता आवडल्या. 
लेखांमध्ये डॉ. बाळ फोंडके यांचा ‘कानोकानी’ कानातून मेंदूचे पोस्टमार्टेम करणारा. सध्याच्या परिस्थितीवर प्रकाशझोत टाकणारा आणि वास्तवतेची भयानकता अधोरेखित करणारा आहे. डॉ. मंदार दातार यांचा ‘जिगरबाज गवत’ अभ्यासपूर्ण आणि गवताबद्दल भरपूर माहिती देणारा, ज्ञानाची कवाडे उघडून त्यात भर टाकणारा आहे. तो खूप आवडला. मृणाल तुळपुळे यांची अनुभवसंपन्न खाद्यकहाणी डोळ्यातून मेंदूपर्यंत पोचली पण मनसोक्त अनुभवण्यासाठी आणि पोटापर्यंत पोचविण्यासाठी युरोपची टूर करायलाच हवी. विभावरी देशपांडे यांचे मनोगत मनःस्पर्शी, वास्तवतेचे भान देणारे आणि विशेष म्हणजे वाचताना नकारत्मकतेच्या (Negativity) भावनेकडून सकारत्मकतेच्या (Positivity) भावनेकडे ओढून नेणारे आहे. गणेश देवी, माधव गाडगीळ, श्रीकर अष्टपुत्रे यांचे भटकंतीवरील लेख हे ज्ञानात मोलाची भर टाकणारे आहेत. अनिल अवचट, प्रवीण दवणे, राधिका टिपरे, शैलेश माळोदे यांचे लेख वाचनीय आणि माहितीपूर्ण आहेत. संजय दाबके आणि मृणाल तुळपुळे यांच्या युरोपवरील लेखांनी आणि छायाचित्रांनी युरोपची सहल घडविली. लेख व लेखातील छायाचित्रे आवडली. 
अंकातील सर्व लेखकांच्या कथा वाचल्या आणि आवडल्या. जय जाधव यांची हास्यचित्रे हसविणारी आहेत. थोडक्‍यात ‘सकाळ साप्ताहिक’ दिवाळी अंक (२०१८) वाचनीय, उत्तमरित्या संपादन केलेला सर्व बाजूंनी परिपूर्ण असा अंक आहे. दिवाळीत एक चांगला अंक वाचावयास दिल्याबद्दल ‘सकाळ साप्ताहिक’ टिमचे मनापासून धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा! 
-विश्‍वास दत्तात्रय सांगळे, नवी मुंबई


‘आडवळणावर’ विसावू
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये प्रसिद्ध होणारे ‘आडवळणावर’ हे सदर माझे विशेष प्रिय आहे.  आडवळणावर असणाऱ्या पर्यटन स्थळांची माहिती लेखक उदय ठाकूरदेसाई हे उत्तम प्रकारे देत असतात. अगदी पुण्या-मुंबईच्या जवळ असणारी मात्र फारशी परिचित नसणारी अनेक पर्यटन स्थळे केवळ या सदरामुळेच आम्हाला कळू शकली. तसेच त्यांनी परदेशातील पर्यटनस्थळांविषयी दिलेली माहितीदेखील उपयुक्त असते. भविष्यात त्यांनी माहिती दिलेल्या सर्वच आडवळणावरील पर्यटनस्थळांना नक्कीच भेट देऊ.
राजेश्‍वरी कुलकर्णी, पुणे


इस्रोचा अभिमान वाटतो
 ‘सकाळ साप्ताहिक’चा ५ जानेवारीचा अंक वाचला. अंकाचे मुखपृष्ठ अतिशय देखणे झाले आहे. 
डॉ. अनिल लचके यांची ‘इस्रोची व्यावसायिक झेप’ ही कव्हरस्टोरी ज्ञानात भर टाकणारी आहे. इस्त्रो या संस्थेविषयी फक्त ती अवकाशात उपग्रह सोडते एवढेच माहिती होते. मात्र या लेखामुळे इस्त्रोच्या व्यावसायिक कामगिरीची माहिती मिळाली. आंतराष्ट्रीय स्तरावर इस्रोने आपले वर्चस्व प्रस्थापित केल्याचे वाचून संस्थेविषयी अभिमान वाटला. तसेच या अंकातील ‘परदेशातलं बाबापण’ ‘करोडपती वरुण!’ ‘लाल मातीतील मल्ल’ हे लेखदेखील वाचनीय आहेत. 
- राहुल कुलकर्णी, वडगाव शेरी, पुणे

संबंधित बातम्या