वाचक लिहितात...

वाचक
गुरुवार, 10 जानेवारी 2019

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

नवीन सदरे वाचनीय
 ‘सकाळ साप्ताहिक’ची नवीन वर्षात कोणती नवीन सदरे सुरू होतील याची उत्सुकता होती. साप्ताहिकने आपल्या परंपरेप्रमाणे यंदाही दर्जेदार नवीन सदरे सुरू केल्याचे पाहून आनंद झाला. मुलांच्या पानामधील ‘चिंगीचा चक्रमपणा’ ‘जंगल कसे बघावे?’ ‘द नेम इज सारा’ ही सदरे खूपच आवडली. तसेच ‘होम गार्डन’ हे सदरदेखील आवडले. ‘पोटपूजा’, ‘राज-रंग’ ‘माध्यमं आणि मानसशास्त्र’ ही सदरेदेखील वाचनीय आहेत. भ्रमंती करण्याची आवड असणाऱ्यांसाठी तर ‘किल्ले भ्रमंती’ आणि ‘ट्रेक कथा’ ही सदरे खजिनाच आहेत. 
- श्रीरंग कुलकर्णी, वारजे, पुणे

कचऱ्याचा प्रश्‍न सोडवू
 ‘सकाळ साप्ताहिक’ दिवाळी अंकातील ‘प्रिय लोकशाही’ हा विभावरी देशपांडे यांचा लेख वाचला. लेख पोटतिडकीने लिहिला आहे, हे लेख वाचल्यानंतर जाणवते. आपल्या लोकशाहीची पत खालवण्यात आपणच जबाबदार आहोत, हे शंभर टक्के सत्य आहे. हा लेख वाचल्यानंतर सामान्य माणसाच्या मनात पहिला प्रश्‍न येतो तो म्हणजे ‘मी आता काय करू?’ माझ्या मते, आपल्या पुढे अनेक प्रश्‍न आहेत. ते आपण एक एक करून सोडवायला हवेत. मला कचऱ्याचा प्रश्‍न हा सर्वांत मोठा वाटतो. कचरा आपणच तयार करतो तर मग त्याचे व्यवस्थापन आपणच केले पाहिजे. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी आपण विचार करायला हवा आणि चांगले विचार हीच तर खऱ्या लोकशाहीची गरज आहे.
 - कौस्तुभ ताम्हनकर, नौपाडा, ठाणे

राजकीय मूल्यांवर कठोर भाष्य
‘सकाळ साप्ताहिक’चा १२ जानेवारीचा अंक वाचला. अंकातील ‘मूल्यव्यवस्थेतील बदल’ हा प्रकाश पवार यांचा लेख आवडला. बदललेल्या काळाप्रमाणे राजकीय पक्षांच्या मूल्यव्यवस्थेत कसे बदल होत गेले, याचे योग्य विश्‍लेषण लेखकाने केले आहे. हिंदी भाषिक पट्ट्यात काँग्रेसवर भाजपने नेहमीच मात केली आहे. मात्र राजस्थान, छत्तीसगड व मध्यप्रदेश येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. कारण भाजपने केवळ काँग्रेसमुक्त भारत हेच मूल्य समोर ठेवले होते. तर काँग्रेसने सर्वसमावेशकता हे मूल्य लोकांसमोर मांडले. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडवण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यामुळे काँग्रेस भाजपचा पराभव करू शकली. राजकीय पक्ष कोणत्या मूल्यांना महत्त्व देतो याचा परिणाम निवडणुकांमध्ये होत असतो. बदलत्या राजकीय मूल्यांवर कोठेच बोलले किंवा लिहिले जात नाही. मात्र ‘सकाळ साप्ताहिक’ याला अपवाद ठरले आहे. ‘मूल्यवस्थेतील बदल’ हा लेख राजकीय नेत्यांबरोबरच राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संग्रही ठेवायला हवा, असे मला वाटते.
- अविनाश मोरे, कल्याण, मुंबई

सिंधूच्या जिद्दीला सलाम
‘सकाळ साप्ताहिक’चा ५ जानेवारीचा अंक वाचला. अंकातील किशोर पेटकर यांचा ‘अखेर सोनेरी यश!’ हा पी.व्ही. सिंधूच्या कामगिरीविषयी माहिती देणारा लेख आवडला. इंडिया ओपन, राष्ट्रकुल क्रीडास्पर्धा, थायलंड ओपन, जागतिक अजिंक्‍य स्पर्धा या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या अंतिम सामन्यात पराभूत होऊन ही सिंधू निराश झाली नाही. अखेर प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर ‘वर्ल्ड टूर’ फायनल्समध्ये तिने जपानच्या नोझोमी ओकुहारा हिला पराभूत करुन विजेतेपद मिळवले. सिंधूच्या या कामगिरीला सलाम.
- प्रदीप शिंदे, पुणे

संबंधित बातम्या