वाचक लिहितात...

वाचक
मंगळवार, 29 जानेवारी 2019

वाचक लिहितात...
निवेदन : ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

पर्यटन विशेष आवडला
‘सकाळ साप्ताहिक’चा ‘पर्यटन विशेष’ अंक वाचला. ‘स्वराज्याचा बुलंद पहारेकरी’, ‘चंद्रगडावरचे अग्निदिव्य’, ‘आडवाटेवरची लेणी’ हे लेख आवडले. पर्यटन म्हटले, की लोकांना समुद्र किनारी किंवा परदेशात जावे असे वाटते. मात्र सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यात असणारे किल्ले, लेणी याकडे आपण दुर्लक्ष करत असतो. सह्याद्रीमध्ये पर्यटन करण्यासाठी अनेक स्थळे आहेत हे या अंकामुळे समजले. इतिहासावर प्रेम करणाऱ्यांना सिद्धगडाविषयी असणारा ‘स्वराज्याचा बुलंद पहारेकरी’ हा लेख नक्की आवडेल. याची खात्री आहे.
- राजेश कुलकर्णी, इंदापूर


ऑस्ट्रेलियावरील विजय खास
‘सकाळ साप्ताहिक’चा १२ जानेवारीचा अंक वाचला. हुर्रे..ऽऽ...ही कव्हर स्टोरी खूपच आवडली. भारतीय संघ हा परदेशी नेहमीच पराभूत होत असतो. अशी टीका केली जाते. त्यातही ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय संघाला एकदाही मालिका विजय मिळवता आला नव्हता. त्यामुळे विराट सेनेने ऑस्ट्रेलियन भूमीवर मिळवलेला विजय हा खासच म्हणावा लागेल. भारतीय संघात राहुल द्रविड नंतर कोण? हा प्रश्‍न अनेक क्रिकेट रसिकांना सतावत होता. मात्र चेतेश्‍वर पुजारा याने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध केलेल्या फलंदाजीमधून सिद्ध केले आहे, की तोच राहुल द्रविडचा खरा वारसदार आहे. सोशल मिडियावर टीका केली जात आहे, की ऑस्ट्रेलियन संघ कमकुवत होता. त्यामुळे भारतीय संघाला विजय मिळवता आला. प्रत्यक्षात ऑस्ट्रेलियन संघाची फलंदाजी थोडी कमकुवत होती. मात्र त्यांचे गोलंदाज हे जागतिक दर्जाचे आहेत. त्यामुळे भारतीय संघाने मिळवलेला विजय हा भीमपराक्रमच ठरतो.
महेश जाधव, बेळगाव


बाला रफिक ‘हिंद केसरी’ होईल 
‘सकाळ साप्ताहिक’चा ५ जानेवारीचा अंक वाचला. ‘लाल मातीतला मल्ल’ हा लेख आवडला. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात अभिजित कटके आणि बाला रफिक यांच्यात लढत होणार होती. हे दोन्ही मल्ल तुल्यबळ आहेत. त्यामुळे कोण जिंकणार, याचा अंदाज बांधणे कठीण होते. मात्र ही लढत बाला रफीक याने एकतर्फी जिंकली. बाला रफिकचे अभिनंदन. ज्या आक्रमकपणे त्याने कुस्ती केली ते पाहता बाला रफिक फक्त महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदावर थांबणार नाही. भविष्यात तो ‘हिंद केसरी’ नक्की होईल असे वाटते. महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात बाला रफिकसारखे मल्ल आहेत. मात्र त्यांना योग्य संधी आणि आधुनिक प्रशिक्षण मिळत नाही. आंतरराष्ट्रीयस्तरावर कुस्ती हा क्रीडाप्रकार हे मॅटवर खेळला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातील मल्लांनी मॅटवर कुस्ती खेळण्याचे प्रशिक्षण घेतले पाहिजे. त्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगले यश मिळेल आणि त्या यशात महाराष्ट्रातील मल्लांचा सिंहाचा वाटा असेल. 
- अमोल ननावरे, इंदापूर 


‘अर्थनीती’ आर्थिक फायदा देणारी
‘सकाळ साप्ताहिक’मधील डॉ. वसंत पटवर्धन यांचे ‘अर्थनीतीः शेअर बाजार’ हे सदर मी नियमित वाचतो. या सदरामुळे शेअर बाजाराची परिस्थिती कशी आहे, कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करावी, कंपन्यांची आर्थिक परिस्थिती कशी आहे, यासंबंधी माहिती मिळते. या माहितीच्या आधारे मी अनेकदा शेअर बाजारात गुंतवणूक केली आहे, आणि मला चांगला परतावादेखील मिळालेला आहे. 
- भगवान शिरसीकर, भांडूप, मुंबई

संबंधित बातम्या