वाचक लिहितात...

वाचक
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

वाचक लिहितात...
निवेदन : ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

‘प्रवासाचे प्रिस्क्रिप्शन’ लेख माहितीपूर्ण 
‘सकाळ साप्ताहिका’च्या (ता.२६ जानेवारी) अंकाचे मुखपृष्ठ व छपाई अत्यंत सुंदर आहे. ‘प्रवासाचे प्रिस्क्रिप्शन’ हा डॉ. अविनाश भोंडवे यांचा लेख खूप आवडला. प्रवासात प्रथमोपचारासाठी लागणाऱ्या औषधांचे महत्त्व, याची चांगली माहिती लेखात मिळाली. प्रवासात धाडस, शिस्त; त्याचबरोबर आरोग्याला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. फूड पॉइंट, कुकिंग-बिकिंग ही सदरे मला विशेष आवडली. त्यातील सर्वच खाद्यपदार्थ खूप आवडले. 
- समीर कुलकर्णी, पुणे 


रहदारीचे नियम पाळणेही आवश्‍यक 
‘हेल्मेट आवश्‍यक का?’ या विषयावर ‘सकाळ साप्ताहिक’मध्ये (ता. २ फेब्रुवारी) प्रसिद्ध झालेले तज्ज्ञांचे लेख वाचले. वाहनचालकांकरता हेल्मेट ही अत्यंत गरजेची बाब आहे हे नक्की, पण माणसांच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट पुरेसे नाही. अपघात टाळण्यासाठी, सुरक्षिततेसाठी रहदारीचे साधे साधे नियम पाळणे गरजेचे आहे. तेच नियम आपण पाळत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. आपल्या सुरक्षिततेला आपण जबाबदार आहोत. समर्थ रामदासांनी दासबोधात लिहून ठेवले आहे, की प्रत्येकजण आपल्याबरोबर मृत्यू घेऊन वावरत असतो. म्हणून जीवन फार मौल्यवान आहे, ते परत मिळणार नाही, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. चारचाकी, दुचाकी, सायकलस्वारांनी रामदासांनी दिलेला हा संदेश लक्षात ठेवला तर अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. रहदारीचे नियम पाळण्यासाठी आहेत, मोडण्यासाठी नाहीत, हे लक्षात ठेवायला हवे. अपघात होऊ नयेत म्हणून सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असतेच. पण सगळे काही सरकार करू शकणार नाही; आपल्या सुरक्षिततेची काळजी आपणच घेतली पाहिजे. 
- दि. ह. दांडेकर


हेल्मेटबाबत जागृती आवश्‍यक
‘सकाळ साप्ताहिक’चा ‘हेल्मेट आवश्‍यक का?’ (ता. २ फेब्रुवारी) या विषयावरील अंक आवडला. हेल्मेट वापराचे शहाणपण शिकवणारा तसेच हेल्मेट या जीवनरक्षक साधनाची उपयुक्तता, त्याबाबतची मानके आणि प्रमाणके याबाबतच्या माहितीचा विस्तृत ऊहापोह करणारा हा अंक आहे. ‘डोके शाबूत राहायला हवे’ हे दिशादर्शक संपादकीय, ‘सर सलामत तो पगडी पचास’ हा डॉ. अविनाश भोंडवे यांचा आरोग्य भान जपणारा व जपायला लावणारा लेख तसेच ॲड. रोहित एरंडे यांचा ‘हेल्मेट सक्ती आणि कायदा’ हे महत्त्वपूर्ण लेख आहेत. विशेषतः डॉ. अविनाश भोंडवे यांनी लेखात सुचविल्याप्रमाणे शालेय व महाविद्यालयीन स्तरावर शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सतर्क करणे महत्त्वाचे आहे. याबाबत आम्ही आमच्या ‘प्रभात किड्‌स स्कूल’मध्ये शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये सातत्याने जागरूकता आणण्यासाठी सजगतेने प्रयत्नशील असतो. असा अभिनव प्रयोग इतर शाळांमध्येही झाला तर तो शिस्तबद्ध सवयीचा भाग होऊन सक्तीचा राहणार नाही, अशी आशा वाटते. 
- डॉ. गजानन नारे, अकोला


हेल्मेट वापरण्यासाठी जनजागृती आवश्‍यक
 ‘सकाळ साप्ताहिक’चा (ता. २ फेब्रुवारी) ‘हेल्मेट आवश्‍यक का?’ हा अंक वाचला. अंकातील हेल्मेट सक्तीच्या कायद्याविषयी माहिती देणारा ॲड. रोहित एरंडे यांचा लेख आवडला. मुळात हेल्मेटसक्तीचा कायदा आहे, हे दुचाकी वाहनचालकांना माहीतच नाही. या कायद्याविषयी जनजागृती होणे आवश्‍यक आहे. तसेच कायदा आहे म्हणून हेल्मेट वापरण्यापेक्षा आपल्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे, असे मला वाटते. हेल्मेट वापरासंबंधी लोकांच्यामध्ये अनेक गैरसमज आहेत; ते डॉ. अविनाश भोंडवे यांचा अंकातील ‘सर सलामत तो पगडी पचास’ या लेखाने नक्की दूर होतील.    
- उदय कुलकर्णी, वारजे
 

संबंधित बातम्या