वाचक लिहितात...

वाचक
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

वाचक लिहितात...
निवेदन ः ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता ः सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल ः saptahiksakal@esakal.com

प्रियंका काँग्रेससाठी नवसंजीवनी ठरतील
‘सकाळ साप्ताहिक’चा ९ फेब्रुवारीचा अंक वाचला. अंकाचे मुखपृष्ठ छान आहे. ‘प्रियंका गांधींची एंट्री’ ही कव्हर स्टोरी आवडली. मात्र कव्हर स्टोरीमध्ये विश्‍लेषण करण्यात आले आहे, की उत्तर प्रदेशमधील राजकारणात काँग्रेसला प्रियंका गांधी यांच्या राजकीय प्रवेशाचा फायदा होईल. मी मात्र याशी सहमत नाही. कारण केवळ उत्तर प्रदेशचा विचार करुन काँग्रेसने प्रियंका गांधी यांना राजकारणात आणलेले नाही. राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसची जी पिछेहाट होते आहे आणि त्यामुळे काँग्रेस संघटनेचे नुकसान होते आहे, ते टाळण्यासाठी प्रियंकांना राजकारणात आणले आहे, असे माझे मत आहे. राजकीय पक्षाची खरी ताकद ही त्याच्या संघटनेमध्ये असते आणि २०१४ च्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे संघटन हे दुबळे झाले आहे. भविष्यात निवडणुकांमध्ये विजय मिळवायचा असेल तर पक्ष संघटन मजबूत असायला हवे, हे राहुल गांधींच्या लक्षात आले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष संघटन पातळीवर मजबूत करण्यासाठी त्यांनीच प्रियंका गांधी यांना राजकारणात आणले आहे.
- रमेश भोंग, इंदापूर


काँग्रेसची घराणेशाही
‘सकाळ साप्ताहिक’चा ९ फेब्रुवारीचा अंक वाचला. अंकामध्ये प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशाबाबत भाष्य करण्यात आले आहे. प्रियंकांच्या राजकीय प्रवेशामुळे काँग्रेसला कसा फायदा होईल, याचे चित्र प्रियंका गांधींची ‘एंट्री’ या लेखात रंगविण्यात आले आहे. मात्र प्रियंका यांच्या राजकीय प्रवेशाने पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये केवळ घराणेशाहीच चालते, हे स्पष्ट झाले आहे. प्रियंका यांना राजकारणाचा अनुभव नसताना केवळ आडनाव गांधी आहे म्हणून त्यांचा राजकीय प्रवेश सुकर झाला. विशेष म्हणजे त्यांना लगेच सरचिटणीसपदाची जबाबदारीदेखील मिळाली. सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढ्या सहजपणे सरचिटणीसपदाची जबाबदारी मिळाली असती का? अर्थात याचे उत्तर नाही असेच आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांपेक्षा घराणेशाहीला जास्त महत्त्व आहे.
- राहुल मोरे, कल्याण


देणगी देणाऱ्यांची नावे जाहीर करा
‘सकाळ साप्ताहिक’चा २ फेब्रुवारीचा अंक वाचला. अंकातील ‘कट्टा’ सदरामध्ये काँग्रेसला वर्गणी गोळा करण्यासाठी कशा अडचणी येत आहेत. याचे वर्णन वाचले. काँग्रेसची लोकांकडून थेट वर्गणी घेण्याची कल्पना चांगली आहे. त्यामुळे जनसामान्यांमध्ये काँग्रेस आपला पक्ष आहे, अशी प्रतिमा निर्माण होईल. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्योगपतींकडून मिळणाऱ्या देणग्यांपैकी एकट्या भाजपला ९२ टक्के देणग्या मिळाल्या आहेत. ज्या राजकीय पक्षांना उद्योगपती देणग्या देतात त्या पक्षांनी त्या उद्योगपतींची नावे आणि देणगीची रक्कम जाहीर करावी.
 - राजेंद्र दिघे, भांडुप


हेल्मेट वापरा
‘सकाळ साप्ताहिक’चा ‘हेल्मेट आवश्‍यक का?’ हा २ फेब्रुवारीचा अंक वाचला. हेल्मेटची आवश्‍यकता का आहे? हेल्मेटसक्तीसाठी कोणते कायदे आहेत? आरोग्याच्या दृष्टीने हेल्मेट फायदेशीर आहे का? अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे या अंकातून मिळाली. डॉ. अविनाश भोंडवे यांच्या ‘सर सलामत तो पगडी पचास’ या लेखामुळे हेल्मेटसंबंधित अनेक गैरसमज दूर झाले. हेल्मेट हे आपल्याच सुरक्षिततेसाठी आहे, हे जोपर्यंत लोकांना कळणार नाही तोपर्यंत हेल्मेटसक्तीला विरोध होत राहील, असे मला वाटते. त्यामुळे हेल्मेटची आवश्‍यकता का आहे, हे समाजसेवी संस्थांनी लोकांपर्यंत पोचवणे गरजेचे आहे.
- अविनाश पवार, पुणे

संबंधित बातम्या