वाचक लिहितात...
वाचक लिहितात...
निवेदन : ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा.
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २.
ई-मेल : saptahiksakal@esakal.com
सर्जिकल स्ट्राइकचा पुरावा मागणे अयोग्य
‘लक्ष्य निश्चित करावे’ आणि ‘पुलवामाचा धडा’ हे दोन लेख वाचले. यातील ‘लक्ष्य निश्चित करावे’ हा लेख योग्य वाटला. परंतु, ‘पुलवामाचा धडा’ हा लेख नकारात्मक, आपला देश जणू काहीच विशेष परिणामकारक कारवाई करू शकणार नाही, असाच समज निर्माण करणारा वाटला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देश लष्करीदृष्ट्या अतिशय सामर्थ्यवान असला पाहिजे असेच सांगितले होते. एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी आपल्या लष्करात पाकिस्तानला धडा शिकवण्याची ताकद आहे, हे सांगितले आहेच. पण, त्याचबरोबर स्वतःच स्वतःच्या क्षमता वाढवण्याची गरज आणि त्याचे महत्त्व प्रतिपादन केले आहे. भारताला स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार आहे, असे पूर्वी एकदा बराक ओबामा यांना आणि आता डोनाल्ड ट्रम्प यांना का सांगण्याची वेळ यावी, हे समजत नाही. दहशतवादी हल्ला जो देश आपल्यावर करतो तोच देश आपल्याकडे पुरावा द्या, अशी मागणी करतो आणि आपण तो देतो. सर्जिकल स्ट्राइक केला आहे याचा पुरावा आपल्याच देशातील कोणीतरी द्यावयास सांगते आणि संशय व्यक्त करते. या गोष्टी उद्विग्न करणाऱ्या आहेत.
- कांत देवधर, नाशिक
जवानांवरच्या हल्ल्याचा निषेध
‘सकाळ साप्ताहिक’चा २ मार्चचा अंक वाचला. ‘पुलवामाचा धडा’ हा अनंत बागाईतकर यांचा लेख आवडला. अमेरिकेत अट्टल दहशतवादी लादेन याने २००२ मध्ये हल्ला घडवून आणला. या देशाने लादेनची संपूर्ण माहिती घेऊन तो जगाच्या कोणत्याही देशात कुठल्याही कोपऱ्यात लपलेला असो त्याचा खातमा करायचे ठरवले. अमेरिकेने पाकिस्तानात घुसून त्याचा खातमा केला. आश्चर्याची गोष्ट ही, की तेथील मानवाधिकारी लोकांनी याला विरोध केला नाही. वास्तविक मानवदेहधारी श्वापदाला तो अधिकार नसावा या मताचे ते लोक आहेत. हे येथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. भारताच्या जवानांवर झालेला हल्ला हा भ्याड असून तो निषेधार्थ आहे. जनतेने शासनाच्या बाजूने खंबीरपणे उभे राहावे.
- सां. रा. वाठारकर, चिंचवड
एअर स्ट्राइकच्या मुद्द्यावर राजकारण नको
‘सकाळ साप्ताहिक’च्या २ मार्चच्या अंकातील एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांचा ‘लक्ष्य निश्चित करावे’ हा लेख वाचला. त्यामध्ये भूषण गोखले यांनी पुलवामा हल्ल्याचे भारतीय लष्कर अचूक उत्तर देईल, असे म्हटले होते. ते अगदी खरे झाले. पुलवामा हल्ल्यानंतर अवघ्या १३ दिवसांतच भारतीय हवाई सेनेने पाकिस्तानातील बालाकोट इथल्या दहशतवादी अड्ड्यांवर ‘एअर स्ट्राइक’ केला. हे व्हायलाच हवे होते. दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचे असे जबरदस्त प्रत्युत्तर देणे आवश्यकच होते. आता या मुद्द्यावरून राजकारण होऊ नये, एवढीच इच्छा आहे.
- कश्मिरा इनामदार, पुणे
‘पुलवामा’वरील लेख अभ्यासपूर्ण
‘सकाळ साप्ताहिक’च्या २ मार्चच्या अंकामधील पुलवामा विषयावरील भूषण गोखले व अनंत बागाईतकर यांचे अभ्यासपूर्ण लेख आवडले. मुळात इतक्या मोठ्या संख्येने जवानांना एकावेळी व तेही बसने नेणे अत्यंत चुकीचे होते. त्यांना हवाई मार्गानेच नेणे आवश्यक होते व तशी मागणीही करण्यात आली होती, असे कळते. मंत्र्यांसाठी केवढी सुरक्षा ठेवली जाते. आपल्या देशाचे जवान रात्रंदिवस प्रतिकूल वातावरणात सीमेवर काम करतात. त्यांच्यासाठी सर्व सोयीसुविधा पुरवल्या गेल्या पाहिजेत.
- हरीश भांडारी, नाशिक