वाचक लिहितात...

वाचक
सोमवार, 1 एप्रिल 2019

वाचक लिहितात...
निवेदन :
 ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

डॉ. आंबेडकरांनी आरक्षण वेगळ्या पद्धतीने हाताळले असते
डॉ. सदानंद मोरे यांचा ‘सकाळ साप्ताहिक’च्या १६ मार्चच्या अंकामधील ‘आंबेडकर आणि सावरकर’ हा लेख वाचला. या लेखामध्ये ‘प्रवर्तकाने टाकलेले पाऊल हेच शेवटचे असा समज धर्मपंथांचा असल्यामुळे त्यांची वाढ खुंटते,’ हा जो विचार मांडला आहे तो खूपच मोलाचा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध संप्रदायाचा स्वीकार केल्यानंतर ते अल्पावधीतच जग सोडून गेले. त्यामुळे बौद्ध संप्रदाय स्वीकारल्यानंतर आध्यात्मिक पायावर आधारित असलेल्या आणि त्यांना अभिप्रेत असलेल्या राजकीय व सामाजिक विचारांचा प्रचार ते आणि त्यांचे अनुयायी पूर्ण अर्थाने करू शकले नाहीत. तसे पाहिले, तर डॉ. आंबेडकरांच्या ‘बौद्ध’ होण्याला आक्षेप घेण्याचा सावरकरांचा उद्देश नसावा. जातीयतेविरुद्धचा लढा चालू ठेवण्याच्या पद्धतीबाबत दोघांत मतभेद होते. परंतु, त्यांच्यात ‘मनभेद’ नव्हते हे लक्षात घेतले पाहिजे. आज डॉ. आंबेडकर हयात असते, तर त्यांनी आज उद्‌भवणारा आरक्षणाचा प्रश्‍न वेगळ्या पद्धतीने हाताळला असता.
- श्रीकांत ताम्हनकर, पुणे

पुणे विशेषांक आवडला
‘सकाळ साप्ताहिक’चा १६ मार्चचा पुणे विशेष अंक आवडला. पुण्याविषयीचे सर्वच लेख सुंदर आहेत, विशेषतः आशिष तागडे यांचा ‘परंपरा जपलेली खाद्यसंस्कृती’ हा लेख खूप छान आहे. लेखातून खाद्यभ्रमंती घडते. अरुण नूलकर यांचा ‘बहरलेले सांस्कृतिक पुणे’ हा
लेख जुन्या पुण्याची आठवण करून देतो. अंकातील इतर लेखही वाचनीय आहेत. 
- आदित्य देशमुख, पुणे

मोदी लाट ओसरली
‘सकाळ साप्ताहिक’च्या २३ मार्चच्या अंकातील प्रकाश पवार यांच्या राज-रंग सदरातील ‘भाजपची चमकदार विषयपत्रिका’ लेख वाचून भाजपची (तिरकी) दूरदृष्टी लक्षात येते. वास्तविक, राहुल गांधी यांनी कितीही आपली भूमिका मतदारांना सांगितली, तरी ती सद्यःस्थितीत नवमतदारांना पचनी पडत नाही. काँग्रेसने २०१४ पूर्वी हा प्रयत्नच केला नाही. कारण, गांधीघराणे हा अनेक इतर नेत्यांना हुकमी एक्का वाटत होता. नव्या पिढीला योग्य वाटणारे, स्पर्श करणारे असे विषय जर असते, तर या प्रचारात नक्कीच काँग्रेसला फायदा झाला असता. पण आता उशीर झालेला आहे. पण मागील ‘मोदी लाट’ आता ओसरली आहे, हे निश्‍चित. 
- सुनील समडोळीकर, कोल्हापूर

‘जटिल जलसमस्या’ लेख अभ्यासपूर्ण
‘सकाळ साप्ताहिक’च्या २३ मार्चच्या अंकातील ‘जटिल जलसमस्या’ हा डॉ. श्रीकांत कार्लेकर यांचा लेख विचाराला चालना देणारा व अभ्यासपूर्ण आहे. अलीकडे काही ठिकाणी पाणी आणण्यासाठी महिला मैलोन्‌मैल जातात, असे चित्र काही गावांत दिसते. माध्यमातून या बातम्या येत असतात. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आपण अजूनही ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’कडे जेवढे वळायला हवे तेवढे वळालेलो नाही. कारण प्रसारमाध्यमे व सरकारने जेवढे प्रबोधन करायला हवे होते तेवढे केले नाही. वास्तविक आजपर्यंत ‘हार्वेस्टिंग’ ही लोकचळवळ व्हायला हवी होती. शहरी विभागात यापुढे बांधकाम करायला परवानगी द्यायच्या आधी हार्वेस्टिंगची अट घालावी. तरच भावी काळात आपल्याला पाणीटंचाईवर मात करता येईल. 
- सां. रा. वाठारकर, चिंचवड

संबंधित बातम्या