वाचक लिहितात...

वाचक
सोमवार, 6 मे 2019

वाचक लिहितात...
निवेदन :
 ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

वाळवणं विशेषांक मनास भावला
‘सकाळ साप्ताहिक’चा ‘उन्हाळी वाळवणं’ विशेषांक मनास एकदम भावला. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. लहानपणी सुट्या लागल्या, की घरोघरी वाळवणं केली जायची. या शिवाय हळद, तिखट, शिकेकाई, शिंगाडे, साबुदाणा पीठ वगैरे गिरणीतून दळून आणले जाई. एकत्र कुटुंबपद्धती व वाडा संस्कृतीमुळं आठवडे दोन आठवडे चंगळ असायची. पापडाच्या लाट्या, गव्हाचा चीक, तांदुळाच्या सालपापड्या, साबुदाण्याच्या पापड्या हेच जेवण असायचं. सुती नऊवारी साडी अथवा पांढरं शुभ्र धोतर वाळवणासाठी वापरलं जाई. घरी काही शुभकार्य असेल, तर पापड्या, चिकोड्या रंगीत केल्या जात. बारीक बारीक सांडगे सुबकतेनं घातले जात. नंतर प्लॅस्टिकचे कागद आले. ज्यांनी ज्यांनी हे अनुभवलं आहे, त्यांना हा अंक वाचताना नुसत्या आठवणींनी तोंडाला पाणी सुटले असेल. यातील प्रांतोप्रांतीच्या वाळवणं पद्धती उपयुक्त आहेत. काही नवीनदेखील आहेत. सध्या जागेअभावी व वेळेअभावी वाळवणं मागं पडत चालली आहेत, तथापि तयार वाळवणाला प्रचंड मागणी आहे. त्यामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. बाजारात वाळवणाचे असंख्य प्रकार बघावयास मिळतात. पूर्वी सणावाराला अथवा मधल्या वेळचे खाणे म्हणून तळण तळले जायचे. 
- क्षमा एरंडे, पुणे


वाळवणाचा अंक म्हणजे ‘हॅंडबुक’
‘उन्हाळी वाळवणं’ हा अंक वाचला. कुटीरउद्योगात, लघुउद्योगात ज्यांना शहरी किंवा ग्रामीण भागात स्वयंरोजगारातून करिअर करावयाचे असेल त्यांच्यासाठी हे जणू काही ‘हॅंडबुक’च आहे. पापड करण्यातून एक लिज्जत उभी राहिली. शेकडो कोटींची उलाढाल करून हजारो महिलांना रोजगार पुरवत आहे, तर विविध प्रकारची वाळवणं करण्यातून किती रोजगार निर्माण होईल. १९६० च्या दशकात अमेरिकेत अन्नप्रक्रिया क्षेत्रात अब्जाधीश झालेल्या उद्योगपतीने How to become a billionaire in a zippy हे मार्गदर्शक पुस्तक लिहिले आहे. त्याच्या कंपनीचे नाव Sprout Growers Association. मोड आलेली धान्ये वाळवणे.  
- पद्माकर देशपांडे, पुणे

संबंधित बातम्या