वाचक लिहितात...

वाचक
सोमवार, 17 जून 2019

वाचक लिहितात...
निवेदन :
 ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

संग्राह्य ‘उन्हाळा विशेष’ अंक 
‘सकाळ साप्ताहिक’च्या सहा एप्रिलच्या अंकातील उन्हाळा विशेषमध्ये ‘शरीरातला पाण्याचा दुष्काळ’ हा डॉ. अविनाश भोंडवे यांचा लेख प्रासंगिक व उन्हाळ्यात अत्यंत उपयुक्त होय. यातील डिहायड्रेशनची माहिती महत्त्वपूर्ण व प्रत्येकाला माहीत असावी अशी आहे. डिहायड्रेशनची लक्षणे ही सर्वांना माहीत व्हावी यासाठी संग्रहित ठेवण्यासारखी आहेत. लहान मुलांतील डिहायड्रेशनबाबतही महत्त्वपूर्ण लक्षणे दिलेली आहेत, ती प्रत्येकाने लक्षात घ्यावीत. एप्रिल व मे महिना अत्यंत तापदायक व अधिक रणरणत्या उन्हाचा असणारा आहे. म्हणून अति सावधानता बाळगण्याची गरज आहे. हा अंक प्रत्येकाने संग्रही ठेवावा असा आहे. याच अंकातील ‘भाजपचा (मूळ) पोलादी पुरुष’ हा लेख आवडला. लालकृष्ण अडवानी यांची खूप स्वप्ने होती. परंतु, त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे ते बाजूला पडल्यासारखे आहेत. तसेच, २७ एप्रिलच्या अंकातील ‘आर्थिक नियोजनाचा संकल्प’ या कव्हर स्टोरीमुळे आर्थिक नियोजन किती महत्त्वाचे आहे, याची कल्पना आली. व्यवस्थित नियोजन केले, तर एखादी व्यक्ती आपल्या जीवनात ध्येयाची व निश्‍चित उद्दिष्टांची शिखरे गाठेल या बाबत दुमत नाही. आपण मिळवलेला पैसा आपल्यासाठी कसा उपयोगात आणावयाचा, याचे सूत्रबद्ध नियोजन ही काळाची गरज आहे. प्रत्येकाने जीवनात दीर्घकालीन आर्थिक नियोजन करायलाच हवे. तरच कुटुंब व समाजाचा विकास योग्य प्रकारे साधता येईल.
- धोंडिरामसिंह राजपूत, औरंगाबाद


‘सकाळ साप्ताहिक’चे अंक आनंद देणारे
‘सकाळ साप्ताहिक’च्या १३ एप्रिलच्या अंकामधील उदय ठाकूरदेसाई यांचा ‘भीषणसुंदर भारमोर’ आणि ओंकार ओक यांचा ‘भय इथले संपत नाही’ हे लेख वाचून अतिशय मजा आली. इतर लेखही माहितीपूर्ण आहेत. ‘सकाळ साप्ताहिक’चे सर्वच अंक वाचताना आनंद होतो.
- सुबोध गुप्ते, कल्याण


पाण्याचे ऑडिट व्हावे
अठरा मेच्या अंकातील ‘पाण्यासाठी...’ हे सर्व लेख वाचून आपण अद्यापही पाण्याबाबतीत किती बेजबाबदार आहोत ते कळते. ‘तहानलेला विदर्भ’, ‘इथे सर्वांचेच प्राण तहानलेले’ ही कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील परिस्थिती वाचून आपली राजकीय व प्रशासकीय यंत्रणा किती बेफिकीर आहे हे समजते. राजकीय लोकांनीही अशा वेळी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून दुष्काळासाठी उपाययोजना केली पाहिजे. मुळात आपल्याकडे पाण्याचे ऑडिट होत नाही. दरवर्षी गतवर्षी किती दिवस पाऊस पडला, त्या पाण्याची योग्य प्रकारे साठवण झाली का, गेल्या तीन ते चार वर्षांत किती पाऊस झाला व त्याचा वापर शेतीसाठी व पिण्याच्या पाण्यासाठी किती झाला याचा अंदाज घ्यायला हवा. साधारण फेब्रुवारीपासूनच सर्व गावे आणि शहरांमध्ये पाण्याची कपात सक्तीची करायला हवी. ती होतच नाही. परिणामी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच पाणी इतकेच शिल्लक आहे, हे वृत्तपत्रात वाचल्यावर कळते. पाणीकपात म्हटल्यावर काही राजकीय व सत्ताधारी लोकप्रतिनिधी या निर्णयाला विरोध करतात. पण त्यामुळे होते काय, तर एखाद्या विशिष्ट ठिकाणी पाण्याचा अपव्यय, तर बऱ्याच ठिकाणी पाण्यासाठी वणवण. पाण्याचा वापर जपून करायला हवा, ही मानसिकता तयार केली पाहिजे. तरच पाण्याच नियोजन करणे शक्‍य होईल. अन्यथा दरवर्षी पाऊस येईपर्यंत फक्त दुष्काळावर चर्चाच होत राहील. कारण कोल्हापुरात (शहरी भागात) अजूनही काही ठिकाणी भरपूर प्रमाणात पाणीपुरवठा होतो, तर काही ठिकाणी अपुरा व अनियमित मग यात दोष कुणाचा?
- सुनील समडोळीकर


ते तर विरोधी पक्षाचे अपयश! 
प्रकाश पवार यांचा २५ मेच्या अंकातील ‘अध्यक्षीय पद्धतीचा शिरकाव’ हा लेख वाचला. अध्यक्षीय निवडणूक थेट मतदानाने होते. तेथे सरळसरळ थेट दोन उमेदवार समोरासमोर उभे राहतात. आपली निवडणूक ही संविधान अमलात आणून हजारो उमेदवार उभे राहून मतदान होते. लेखकांचे मत मोदी विरोधी असल्याने हा रोख त्यांना वाटला असेल. भाजपने आपला पंतप्रधानपदासाठी उमेदवार घोषित करून निवडणूक लढविली म्हणजे अध्यक्षीय वाटचाल झाली असे म्हणणे चुकीचे ठरेल. तो त्यांचा ताकदीचा उमेदवार होता व त्याचा उपयोग म्हणजे लोकशाहीविरोधी असे होत नाही. विरोधी पक्षाकडे पंतप्रधान पदाचा उमेदवार नव्हता, हा भाजपचा दोष असू शकत नाही. तर विरोधी पक्षाचे अपयश आहे. विविध पक्षांचे उमेदवार हे लोकशाहीच सशक्त असल्याचे द्योतक आहे. अध्यक्षीय पद्धत हे लेखकाचे पूर्वग्रहदूषित मत असू शकते.
- श्रीधर करंदीकर, पुणे

संबंधित बातम्या