वाचक लिहितात...

वाचक
सोमवार, 1 जुलै 2019

वाचक लिहितात...
निवेदन :
 ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

ब्लॉगपर्यावरण रक्षण हा मानवाचा धर्म हवा
‘सकाळ साप्ताहिक’च्या १५ जूनच्या अंकातील पर्यावरण रक्षणाबाबतचे विविध मान्यवरांचे लेख फार वाचनीय असून पर्यावरण संवर्धन किती गरजेचे व आवश्‍यक आहे याचे महत्त्व अधोरेखीत करतात. जंगल संपत्तीची मोठ्या प्रमाणावर तोड झाली. टेकड्या, डोंगर तोडून तेथे मानव राहायला गेला. वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस वाहतुकीच्या समस्या वाढल्या. त्यामुळे पर्जन्यमान कमी होणे, काही ठिकाणी जास्त पाऊस, काही ठिकाणी अजिबात पाऊस न पडणे या सर्व गोष्टींना पर्यावरणाचा असमतोल कारणीभूत आहे. आपला देश नैऋत्य मॉन्सूनवर अवलंबून आहे आणि भारतीय जीवन कृषिप्रधान असल्यामुळे जनतेने व सरकारने पर्यावरण रक्षण हे ध्येय अंगी बाणवले पाहिजे. पर्यावरणाबाबतच्या कायद्यांचे सर्वांनी पालन करावयास हवे. 
‘सकाळ साप्ताहिक’ने पर्यावरणाबाबतचा अंक काढून फार मोठे प्रबोधन केले आहे. पर्यावरण संवर्धन हे सामाजिक कार्य असून त्याचा ऱ्हास म्हणजे चराचर सृष्टीचा ऱ्हास. त्यामुळे आपलेच नुकसान होणार आहे. इतर प्राणी, पक्षी, कीटकांप्रमाणे मानवसुद्धा निसर्गाचा भाग आहे. तो निसर्गापासून वेगळा असूच शकत नाही. फक्त त्याने अति हव्यासापायी मोठ्या प्रमाणावर हस्तक्षेप केल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. केवळ ‘पर्यावरण दिना’पुरते सीमित न राहता पर्यावरण रक्षण हा मानवी जीवनाचा भाग समजला पाहिजे. तो मानवी जीवनाचा धर्म असला पाहिजे. 
- दि. ह. दांडेकर, पुणे


हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही
‘गांधी-आंबेडकर-सावरकर’ ही डॉ. सदानंद मोरे यांची आठ जूनच्या अंकातील उत्कृष्ट ‘महाराष्ट्राची लोकयात्रा’ वाचली. अस्पृश्‍यता (वर्ण-जातीभेद) आणि धर्माचा काही एक संबंध नाही. मानवनिर्मित ग्रंथप्रामाण्यवादाने हे भेद मानवाच्या जीवनात निर्माण केले. म्हणून हे भेद नाकारण्यात स्वा. सावरकरांनी संकोच केला नाही. सावरकर कट्टर हिंदुराष्ट्रवादी असले, तरी अहिंदूंचा-कोणाचाही हक्क नाकारला नाही. सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येत हिंदूंना काफिर, पाखंडी मानणारे सोडून सारे येतात. अशांनाही सावरकरांनी नाकारलेले नाही. उलट लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना प्रतिनिधित्व देऊ केले आहे. या जगात हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही. उलट धर्माने वागणारे ते हिंदू असे म्हणता येते. विद्वानांनी धर्म याचा अर्थ धारण करणे असा केला आहे. 
धर्म सर्वांचेच पोषण करतो. धर्म स्वर्ग-नरक कल्पना मानव जातीवर लादतच नाही. या उलट नेमके अन्य पंथांचे-अहिंसेचे तत्त्वज्ञान आहे. जर सत्य एक आहे, तर गांधी-आंबेडकर, सावरकर-आंबेडकर असा भेदही असण्याचे कारण नाही. गांधीजी कमालीचे ग्रंथप्रामाण्यवादी. पण सावरकर-आंबेडकरांनी ग्रंथप्रामाण्य मानलेच नाही. हिंदू-मुस्लिम ऐक्‍य कुणीच नाकारले नव्हते. पण इस्लामी तत्त्वज्ञानानेच जर असे ऐक्‍य नाकारले, तर त्याला हिंदू आणि सावरकर काय करणार? वादाचा हा भाग देशाला अद्याप अज्ञात आहे. 
- सूर्यकांत शानभाग


‘जटिल जलसमस्या’ खूपच माहितीपूर्ण
आपल्या २३ मार्चच्या अंकामधील ‘जटिल जलसमस्ये’वरील डॉ. श्रीकांत कार्लेकर यांचा लेख खूपच माहितीपूर्ण होता म्हणूनच आवडला. विशेषतः त्यांनी लेखात काही ठिकाणी इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द वापरले, जसे पृष्ठीय जल (surface water), भूजल संपृक्त विभाग (aquifer)/जलजशैल (aquifer), मानचित्रीकरण (mapping), संवरचनीय (structural) या गोष्टी खूपच भावल्या. खरे तर असे लेखन करणारी मंडळी दुर्मिळ आहेत. त्याशिवाय बंध वाचनालयाचे हा गौतम पंगू यांचा विविधांगी लेख आहे. रसपूर्ण आणि (लहानपणापासून ते आजपर्यंतचा) आलेखवजा म्हणूनच लय भारी वाटला! तसाच डॉ. अमर अडके यांचाही सातमाळा-कांचनबारीची रम्य चढाई! सर्व लेखांमधील छायाचित्रेपण सुंदर!  
- सुहास भोमे, पुणे


विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ‘करिअर विशेषांक’
‘सकाळ साप्ताहिक’चा ‘करिअर विशेषांक’ शिक्षण क्षेत्रासाठी मोलाचा ठरणारा आहे. ‘आउट ऑफ बॉक्‍स विचार हवा’ या शीर्षकाच्या महत्त्वपूर्ण संपादकीयपासून प्रत्येक क्षेत्रातील करिअर, आरोग्य आणि व्यक्तिमत्वाविषयी पालक आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारा हा अंक निश्‍चितच दिशादर्शक व करिअर माहितीचा उपयुक्त खजिनाच ठरणारा आहे. हा अंक विविधांगी व नावीन्यपूर्ण शैक्षणिक विचार प्रवाहांविषयी सजगतेचे भान जपणारा आहे. 
- डॉ. गजानन नारे, अकोला

संबंधित बातम्या