वाचक लिहितात...

वाचक
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

वाचक लिहितात...
निवेदन : ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

‘मुलांचे पान’ ही मुलांसाठी मेजवानी!
सकाळ साप्ताहिकचा पूर्णच अंक वाचनीय असतो. श्रेया आणि स्वरा या माझ्या दोन मुली. एक पाचवीला आणि दुसरी सातवीला आहे. त्या दोघी मुलांची पानं आवर्जून वाचतात. त्यातही छोटीला 'साराची डायरी' खूप आवडते, तर मोठीला 'निसर्गकट्टा' खूप आवडतो. विशेष म्हणजे निसर्गकट्ट्यामध्ये दिलेली सर्व माहिती मोठी मुलगी एका फाईलला लावून ठेवते. वेळ मिळेल तेव्हा ती चाळत असते. तिला निसर्ग, पर्यावरण यात चांगलाच रस निर्माण झाला आहे. 'मुलांचे पान' ही खरंच मुलांसाठी मेजवानी असते, म्हणून सकाळ साप्ताहिकचे आभार!
सुखदा शिंदे, नगर     


खय्यामसाब-एक मनस्वी कलाकार!
अंजोर पंचवाडकर यांनी संगीतकार खय्याम यांच्यावर लिहिलेला लेख वाचला आणि खरोखरच आपण एका मनस्वी कलाकाराला मुकलो आहोत याची तीव्र जाणीव झाली. या लेखात त्यांनी खय्यामसाब यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू उत्तमरीत्या मांडले आहेत. ज्या दिवशी हा लेख वाचला, तेव्हा खय्यामसाब यांची कितीतरी गाणी ऐकली आणि नव्यानं त्यांच्या प्रेमात पडलो... 
दिनेश कदम, पुणे


पेराल तसे उगवेल
‘अक्षम्य बेपर्वाईची शिक्षा’ हा डॉ. श्रीकांत कार्लेकर यांचा २४ ऑगस्टच्या अंकातील लेख वाचला. गेल्या काही वर्षांत होणाऱ्या अतिवृष्टीचे मुख्य कारण म्हणजे मानवाने निसर्गनियमात केलेला हस्तक्षेप. हा हस्तक्षेप होऊ नये म्हणून आपल्याकडे कडक कायदे आहेत. पण तरीसुद्धा नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात नाही का? सरकारचे या गोष्टीकडे लक्ष आहे की नाही? पुरामागील इतर महत्त्वाची कारणे ही, की धरण १००% भरूनसुद्धा विसर्ग वाढवण्यात आला नाही, जंगलाच्या तोडीमुळे नदीपात्रातील गाळ साचला व वहनक्षमता कमी झाली. धरणात किती गाळ साचला आहे याची माहिती उपलब्ध नाही. सुशिक्षित सरकारी अधिकारी एवढे बेजबाबदारपणे कसे काय वागू शकतात? ‘पेराल तसे उगवेल’ अशी एक म्हण आहे. आपण निसर्गाची हानी करतो, पण त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागत आहेत.
- अंशुमन पेमगिरीकर, संगमनेर


बालपण व्हर्च्युअल विश्‍वात हरवतंय
‘स्क्रीन टाइम’मधील व्यग्रता पालकांना आणि मुलांनाही व्हर्च्युअल विश्‍वात गुंगवून टाकते. त्याचे दुष्परिणाम, गांभीर्य अधोरेखित करताना प्रा. डॉ. अपर्णा महाजन ६ जुलैच्या ‘सकाळ साप्ताहिक’मध्ये ‘कोसळणारे बाल्य’ या लेखामध्ये मुलांना संस्कारित, संवेदनशील आणि बुद्धिमान होण्यासाठी परीकथा वाचण्याचा, त्याची पारायणं करण्याचा, अल्बर्ट आइन्स्टाईनचा सल्ला उद्‌धृत करतो आपल्याकडं कथा, गोष्टींनी पिढ्या घडविल्या आहेत. 
पण जग बदललं. तंत्रशुद्ध, तर्काधिष्टित झालं. वेळ मोलाची झाली. आजी आजोबांच्याही हातात मोबाईल आले. त्यांच्या हातात आलेला मोबाईल अलगदपणे नातवांच्या हातात कधी आणि कसा गेला हे मात्र कोणाच्याच लक्षात आलं नाही, हे वास्तव! मोबाईल, लॅपटॉप आणि तत्सम गॅजेट्सनी संवादाची गरज आणि उणीव भरून काढली. कल्पनारम्य, हसऱ्या खेळत्या, रम्य बालपणाचं व्हर्च्युअल विश्‍वात रूपांतर झालं. आम जनतेला सतावणारा हा सध्याचा ज्वलंत प्रश्‍न. अपर्णाताईंनी या निमित्तानं परिकथेचं किंवा एकंदरीतच गोष्ट, कथा या अनमोल साहित्य प्रकारचं जीवनातील मोल छानशा पद्धतीनं विशद केलं आहे. जागतिक स्वरूप धारण केलेल्या या समस्येचा मागोवा घेताना; अमेरिकेतील बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनने केलेल्या अभ्यासाच्या अहवालानुसार, साध्या सोप्या भाषेतील लिखाणदेखील शालेय शिक्षण घेत असलेल्या दर चारपैकी एका बालकाला वाचता येत नाही. शिवाय पब्जीसारख्या मोबाईल गेम्सचे दुष्परिणाम सध्या जगभर चर्चिले जात आहेत, तो मुद्दा वेगळाच.
- अनिल ओढेकर, नाशिक


रानभाज्यांचे माहितीपूर्ण लेख...
मी सकाळ साप्तहिकची नियमित वाचक आहे. मी शहरी भागात राहत असले, तरी माझं बालपण ग्रामीण भागात गेलं. त्यामुळं मला बऱ्याच रानभाज्या माहिती आहेत. हे सांगायचं कारण असं, की १७ ऑगस्टच्या अंकात रानभाज्यांवर दोन कव्हरस्टोरी होत्या. त्यात रानभाज्यांची पुरेपूर माहिती दिली होती. यातल्या काही भाज्या मी गावी असताना खाल्ल्या आहेत. त्याची प्रकर्षानं आठवण आली. पण काही भाज्या मलादेखील नवीन होत्या. आमच्या इथल्या मंडईत भाजी आणायला गेल्यावर मी मुद्दाम चौकशी केली, तर मला इथे कुर्टुले, घोळ, तादूळसा आणि टाकळा या भाज्या मिळाल्या. खूपच आनंद झाला. आवर्जून खाव्यात अशा भाज्या आहेत या. फूडपॉइंटमध्ये रानभाज्यांच्या रेसिपीज दिल्या तर आम्हा गृहिणींसाठी ''सोनेपे सुहागा'' असंच होईल.
- रेखा पांचाळ, पुणे

संबंधित बातम्या