वाचक लिहितात

वाचक
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

वाचक लिहितात...
निवेदन : ‘सकाळ साप्तािहक’मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांसंबंधीच्या आपल्या अभ्यासू प्रतिक्रिया जरूर पाठवा. पत्रावर आपला पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई-मेल अवश्‍य द्यावा. पाकिटावर ‘वाचक लिहितात...’ असा उल्लेख जरूर करावा. 
संपर्कासाठी पत्ता : सकाळ साप्ताहिक, ५९५ बुधवार पेठ, पुणे- २. 
ई-मेल : saptahiksakal@esakal.com

प्रत्येक अंक म्हणजे पर्वणी
‘जागतिक पर्यटन’ विशेषांकामधून (ता. २८ सप्टेंबर) पर्यटनासाठी उपयुक्त टिप्स मिळाल्या. विविध लेखांतून परदेशातील संस्कृती, भटकंती याविषयी चांगली माहिती मिळाली. डॉ. अविनाश भोंडवे यांच्या आरोग्य विषयक लेखातून गर्भवती स्त्रियांचे आरोग्य कसे जपावे याची उत्कृष्ट माहिती मिळाली. तसेच नावीन्यपूर्ण खाद्यपदार्थ आवडले. प्रत्येक अंकातून पर्यटनविषयक लेख वाचण्यास मिळतात. ‘सकाळ साप्ताहिक’चा प्रत्येक अंक वाचकांसाठी नवीन पर्वणी असतो.
- समीर कुलकर्णी, कोल्हापूर


आरोग्याबाबत उपयुक्त माहिती
‘सकाळ साप्ताहिक’च्या अंकातील (ता. १४ सप्टेंबर) ‘फिट आहात? कशावरून?’ हा लेख आरोग्याबाबत माहिती देणारा लेख आहे. आरोग्याबाबत उपयुक्त माहिती ‘सकाळ साप्ताहिक’च्या प्रत्येक अंकात येत असते. त्याप्रमाणे पालन केल्यास मनुष्य दीर्घायुषी होऊ शकेल. वृद्धापकाळ व्याधींबाबतही माहिती मिळते.
- माधवराव पाटील, पिंपळगाव हरेधर, जि. जळगाव


आता क्षमा कुणाची मागावी?
‘अक्षम्य बेपर्वाईची शिक्षा’ हा डॉ. श्रीकांत कार्लेकर यांचा लेख (ता. २४ ऑगस्ट) वाचून यासाठी जे कोणी जबाबदार आहे, त्यांना देव असेल तर माफ करणार नाही, असे उद्वेगाने म्हणावे लागेल. शहरातील नद्यांचे नाले झाले आणि ज्या नद्या होत्या तिथे स्वच्छ वातावरण म्हणून कोटी कोटी रुपयांचे टुमदार बंगले बांधले गेले. या जागा उपलब्ध करून देणारे राजकीय नेते जबाबदार नाहीत का? यात नुकसान झालेले जसे गरीब आहेत, तसे श्रीमंत लोकही आहेत. वाहून गेलेली घरे, मालमत्ता सर्वांची होती पण वाहून गेलेली गरिबांची घरे व मालमत्ता आणखी कैक वर्षे उभी राहणार नाहीत याचे वाईट वाटते. या लोकांचे अश्रू व भावी पिढी या लोकांना कधीही माफ करणार नाही.
- सुनील समडोळीकर, कोल्हापूर


किल्ले भाड्याने देण्याआधी चर्चा हवी
‘सकाळ साप्ताहिक’च्या २१ सप्टेंबरच्या अंकातील ‘दुर्ग आमुचे, आम्ही दुर्गांचे’ आणि ‘किल्ले, कल्लोळ आणि वास्तव’ हे दोन्ही लेख वाचनीय आहेत. डॉ. अमर अडके आणि संकेत कुलकर्णी यांनी किल्ल्यांचे वास्तव स्पष्टपणे मांडले आहे. महाराष्ट्रातील काही किल्ले पर्यटनवृद्धीसाठी भाड्याने द्यायचे, असे शासनाने ठरवले. पण,  त्यासाठी नीट अभ्यास व्हायला हवा, तज्ज्ञांशी चर्चा व्हायला हवी. असे कोणाचेही मत विचारात न घेता किल्ले भाड्याने देणे चुकीचे आहे.
- मंगेश कारखानीस, मुंबई


उत्कृष्ट ‘फराळ विशेषांक’ 
दरवर्षी प्रमाणे यावर्षीचाही ‘फराळ विशेष’ अंक (ता. १९ ऑक्टोबर) उत्कृष्ट होता. लाडू, चकली, चिवडा, करंज्या अशा सर्वच पदार्थांच्या निरनिराळ्या पाककृती वाचून स्वतः घरी करायची इच्छा होतेच. हल्ली स्त्रियांना घरी फराळाचे पदार्थ करणे जमत नाही, त्यामुळे बाहेरून आणण्यावर भर असतो. परंतु, ‘सकाळ साप्ताहिक’मध्ये दिलेल्या काही सोप्या पाककृतींद्वारे एखादा पदार्थ तरी घरी करून बघायला हरकत नाही. 
- सुप्रिया चौगुले, सांगली

संबंधित बातम्या