सहजसोपी वाळवणं

सुजाता नेरुरकर
सोमवार, 15 एप्रिल 2019

उन्हाळी वाळवणं
उन्हाळा सुरू झाला, की आपल्या भारतीय संकृतीत महिला वर्षभराची वाळवणं तयार करून हवाबंद डब्यात ठेवतात. पूर्वी आजूबाजूच्या महिला एकत्र येऊन एकमेकींना मदत करून वाळवणं करीत असत. लग्नकार्यात रुखवतात देण्यासाठी पापड, पापड्या, कुरडया, सांडगे करीत असत. पण कालांतराने महिला कामानिमित्त घराबाहेर पडू लागल्या. त्यामुळे असे बेगमीचे पदार्थ करायला वेळ मिळत नाही. म्हणूनच आपण वेळ मिळाला, की थोडेतरी पदार्थ घरी जरूर करावेत.

मैद्याचे कुरकुरीत इन्स्टंट पापड
साहित्य : एक कप मैदा, पाव टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मीठ, १ टेबलस्पून तेल, १ कप पाणी, १ छोटे स्टीलचे चहाचे भांडे, भांड्याच्या आकाराच्या ४ स्टीलच्या ताटल्या. 
कृती : एका भांड्यात मैदा घेऊन त्यामध्ये मीठ, जिरे घालावे. त्यामध्ये हळूहळू पाणी घालून मिश्रण एकसारखे हलवून घ्यावे. मिश्रणामध्ये गुठळ्या होता कामा नयेत. एका स्टीलच्या भांड्यात दोन कप पाणी गरम करावे. चारही स्टीलच्या ताटल्यांना अगदी थोडेसे तेल लावावे व त्यावर एक टेबलस्पून मैदा मिश्रण घालून पसरून घ्यावे. त्यानंतर ताटली गरम भांड्यावर ठेवून त्यावर झाकण ठेवावे व दोन मिनिटे मैद्याचा पापड वाफवून घ्यावा. दोन मिनिटांनंतर भांड्यावरची ताटली खाली उतरवून लगेच दुसरी ताटली भांड्यावर ठेवावी. ही कृती आपल्याला मिश्रण संपेपर्यंत करायची आहे. पापड तयार झाले, की प्लॅस्टिकच्या पेपरवर ठेवून कडकडीत उन्हात वाळत घालावेत. वाळल्यावर तळून खाता येतील.

नाचणीचे पापड
साहित्य : अर्धा किलो नाचणीचे पीठ, १ टेबलस्पून तीळ, १ टेबलस्पून जिरे, १ टीस्पून हिंग, १ टीस्पून पापडखार.
कृती : प्रथम नाचणी धुऊन वाळवावी. मग मिक्‍सरमध्ये किंवा गिरणीतून दळून आणावी. एका जाड बुडाच्या पातेल्यात एक लिटर पाणी गरम करायला ठेवावे. त्यामध्ये हिंग, जिरे, तीळ, पापडखार, मीठ घालावे. पाणी उकळल्यावर नाचणीचे पीठ घालून एकत्र करून घ्यावे. मिश्रण सतत हळूहळू हलवत राहावे, जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. पीठ शिजले, की थोडे पीठ परातीत काढावे. थोडे थंड झाल्यावर मळून एका प्लॅस्टिक पेपरला थोडेसे तेल लावून पापड लाटून घ्यावेत. पापड थोडा मोठा लाटून एका लहान वाटीने छोटे छोटे पापड कापून घ्यावेत. अशा प्रकारे सर्व पापड तयार करून उन्हात वाळवून मगच डब्यात भरून ठेवावेत.

बटाटा साबुदाणा पापड्या
साहित्य : दोन कप साबुदाणा, ५ कप पाणी, ४ मध्यम आकाराचे बटाटे, ४ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून जिरे, चवीनुसार मीठ, आपल्या आवडीनुसार रंग. 
कृती : रात्री साबुदाणा धुऊन, तो बुडेल एवढे पाणी घालून झाकून ठेवावा. दुसऱ्या दिवशी प्रथम बटाट्यांची साले काढून पाच मिनिटे उकडून घ्यावेत. बटाटे गरम असतानाच किसून घ्यावेत. हिरवी मिरची बारीक चिरून घ्यावी. एका जाड बुडाच्या स्टीलच्या भांड्यात पाच कप पाणी गरम करायला ठेवावे. पाणी चांगले गरम झाले, की त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालावा. थोडे घट्ट व्हायला लागले, की त्यामध्ये किसलेला बटाटा, जिरे, मीठ, हिरवी मिरची घालून एकत्र करून एक वाफ येऊ द्यावी. एका प्लॅस्टिक पेपरवर एक चमचा घेऊन मध्यम आकाराच्या पापड्या पसरून घालाव्यात. नंतर प्लॅस्टिक पेपर कडकडीत उन्हात ठेवावा. संध्याकाळी पापड्या उलट्या करून प्लॅस्टिक पेपर झाकून ठेवावा. परत दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हात ठेवावा. या पापड्या उन्हात चांगल्या वाळल्यावर मग डब्यात भरून ठेवाव्यात. आपल्याला उपवासाच्या दिवशी किंवा इतर दिवशीसुद्धा तळून खाता येतात.

वाफवलेल्या साबुदाणा पापड्या 
साहित्य : दोन कप साबुदाणा, चवीनुसार मीठ, केशरी, हिरवा किंवा आपल्या आवडीनुसार रंग, इडलीपात्राला लावण्यासाठी तेल.
कृती : आदल्या रात्री साबुदाणा धुऊन, तो बुडेल एवढे पाणी घालून झाकून ठेवावा. दुसऱ्या दिवशी पापड करण्याआधी भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये चवीपुरते मीठ घालावे. त्याचे तीन एकसारखे भाग करून तीन वेगवेगळ्या बाऊलमध्ये ठेवावेत. पहिल्या बाउल मधील साबुदाण्यामध्ये लाल, दुसऱ्या बाउल मधील साबुदाण्यामध्ये हिरव्या रंगाचे थेंब घालावेत. तिसऱ्या बाउल मधील साबुदाणा पांढराच ठेवावा. त्यानंतर इडलीपात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवावे. इडलीपात्राला अगदी थोडेसे तेल लावावे म्हणजे साबुदाणा चिकटणार नाही. इडलीपात्रामध्ये एक-एक चमचा साबुदाणा घालून बोटाने एकसारखा पसरून घ्यावा. मग पात्राचे झाकण लावून १२-१५ मिनिटे पापड वाफवून घ्यावेत. थंड झाल्यावर एका प्लॅस्टिक पेपरवर वाळत ठेवावेत. अगदी कडकडीत उन्हात दोन दिवस ठेवून पापड पूर्ण वाळल्यावर डब्यात भरून ठेवावेत.

कोहळ्याची उसरी 
साहित्य : एक मध्यम आकाराचा कोहळा, १ कप दही, १ टेबलस्पून मिरची पूड, १ टीस्पून मेथी पूड, १ टेबलस्पून मीठ, १ टीस्पून हिंग.
कृती : प्रथम कोहळा धुऊन, पुसून त्याची साले काढून त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्याव्यात. मग दह्यामध्ये मिरची पूड, मेथी पूड, मीठ व हिंग घालून एकत्र करून घ्यावे. कोहळ्याच्या फोडींना दही चोळून उन्हात वाळवत ठेवावे. नंतर पुन्हा एकदा दह्यात घालून परत वाळवाव्यात. वाळल्यावर तळून खावे.

ज्वारीच्या पिठाचे खानदेशी धामोडे
साहित्य : दोन कप ज्वारीचे पीठ, १ टेबलस्पून मिरची पूड, १ टीस्पून हळद, १ टेबलस्पून तीळ, १ टेबलस्पून ओवा, चवीनुसार मीठ.
कृती : रात्री ज्वारीचे पीठ थोड्या पाण्यात भिजत ठेवावे, म्हणजे ते सकाळपर्यंत आंबते. सकाळी धामोडे करण्याआधी तीन कप पाणी उकळावे. पाण्याला उकळी आली, की त्यामध्ये आंबवलेले ज्वारीचे पीठ घालून हलवत राहावे. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी. त्यात मिरची पूड, हळद, तीळ, ओवा व मीठ घालून एकत्र करावे. एका जाड ओल्या कापडावर छोटे छोटे धामोडे घालावेत. कडक उन्हात वाळत घालावेत व दुसऱ्या दिवशी उलटे करून कडक उन्हात वाळवावेत. उलटताना कापडाला मागच्या बाजूने पाणी शिंपडावे मगच धामोडे उलटावेत. दोन-तीन दिवस उन्हात वाळल्यावर मग डब्यात भरून ठेवावेत आणि तळून खावेत. हे धामोडे करून बघाच, तुम्हाला खूप आवडतील, अगदी टेस्टी लागतात.

ब्रेडचे पापड
हा एक नवीन प्रकार आहे. अवश्‍य करून बघा.
साहित्य : ब्रेडचा एक पुडा, अर्धा टीस्पून मिरची पूड, २-३ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ४ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, १ टीस्पून जिरे, ३ टेबलस्पून तेल, चवीनुसार मीठ, पापड करण्यासाठी २ प्लॅस्टिक पेपर. 
कृती : प्रथम ब्रेडच्या कडा कापून ब्रेड पाण्यामध्ये भिजत ठेवावा. मग ब्रेडमधील पाणी दाबून काढावे. एका परातीत ब्रेड, मिरची पूड, चिरलेली कोथिंबीर, जिरे, मीठ घालून चांगले मळावे. दोन्ही प्लॅस्टिक पेपरला तेलाचा हात लावून घ्यावा. ब्रेडच्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यावेत. एक गोळा घेऊन प्लॅस्टिक पेपरवर ठेवावा. त्यावर दुसरा प्लॅस्टिक पेपर ठेवून बोटाने पापड एकसारखा थापून घ्यावा. मग एका वाटीने पापड कापून घ्यावा, म्हणजे सगळे पापड एकसारखे दिसतील. पापड एका प्लॅस्टिक पेपरवर वाळत ठेवावा. अशा प्रकारे सर्व पापड तयार करून घ्यावेत. नंतर प्लॅस्टिक पेपर उन्हात ठेवावा. वरच्या बाजूने पापड अर्धवट वाळला, की पापड उलटावा. संध्याकाळपर्यंत पापड वाळतील. दुसऱ्या दिवशी पुन्हा पापड उन्हात वाळत घालावेत. वाळल्यावर डब्यात भरून ठेवावेत.

गाजर मुळ्याचे सांडगे
साहित्य : चार कप किसलेले गाजर, १ कप किसलेला मुळा, १ कप किसलेली कच्ची पपई, ७-८ हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेले २ मोठे पिकलेले टोमॅटो, २ टेबलस्पून तीळ, १ टीस्पून धने-जिरे पूड, अर्धा कप चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून हळद, १ टेबलस्पून मिरची पूड, अर्धा टीस्पून हिंग.
कृती : गाजर, मुळा व पपई धुऊन, पुसून, साले काढून किसून घ्यावी. हिरव्या मिरच्या व कोथिंबीर चिरून घ्यावी. एका मोठ्या भांड्यात किसलेले गाजर, मुळा, पपई, हिरव्या मिरच्या, टोमॅटो, तीळ, धने-जिरे पूड, कोथिंबीर, मीठ, हळद, मिरची पूड, हिंग घालून चांगले एकत्र करून घ्यावे. या मिश्रणाचे एका प्लॅस्टिक पेपरवर छोटे सांडगे घालावे व वरून एक पातळ कापड घालून दोन-तीन दिवस कडक उन्हात वाळवत ठेवावेत. वाळल्यावर तळून खावेत किंवा नुसतेसुद्धा छान लागतात.

तांदळाच्या कुरडया
साहित्य : दोन कप तांदळाचे पीठ, २ कप पाणी, १ टीस्पून मीठ, २ टीस्पून तेल, आपल्या आवडीनुसार रंग.
कृती : प्रथम एका भांड्यात तांदूळ धुऊन पाणी घालून तीन दिवस भिजत ठेवावेत. रोज पाणी बदलावे. तिसऱ्या दिवशी पाणी काढून थोडे सुकवून बारीक दळून घ्यावे. कुरडया करण्यासाठी एका जाड बुडाच्या भांड्यात दोन कप पाणी घेऊन त्यामध्ये मीठ व तेल घालून ढवळून घ्यावे. मग त्यामध्ये हळूहळू तांदळाचे पीठ घालावे व पीठ घालताना हलवत राहावे. चांगले ढवळून झाले, की विस्तव बंद करून भांड्यावर दोन-तीन मिनिटे झाकण ठेवावे. नंतर एका प्लेटमध्ये थोडे थोडे उकडीचे पीठ घेऊन तेलाचा हात लावून चांगले मळून घ्यावे. चकलीच्या सोऱ्याने शेवेची चाकी लावून प्लॅस्टिक पेपरवर कुरडया घालाव्यात. सर्व कुरडया घालून झाल्यावर कडकडीत उन्हात वाळवाव्यात. पूर्ण वाळल्यावर डब्यात भरून ठेवाव्यात.

सांबाराचे गोळे
साहित्य : दोन कप हरभरा डाळ, ६ हिरव्या मिरच्या, ७ लसूण पाकळ्या, १ टीस्पून मिरची पूड, १ टीस्पून हळद, चवीनुसार मीठ.
कृती : ज्या दिवशी सांबाराचे गोळे करायचे आहेत, त्याच्या आदल्या दिवशी रात्री डाळी भिजत घालाव्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व पाणी काढून घ्यावे. मिक्‍सरमध्ये पाणी न घालता भिजवलेली डाळ, हिरव्या मिरच्या, मिरची पूड, लसूण, हळद व मीठ घालून थोडे जाडसर वाटून घ्यावे. एका प्लॅस्टिक पेपरवर हाताने छोटे-छोटे गोळे घालावेत व कडकडीत उन्हात हे गोळे वाळवावेत. वाळल्यावर डब्यात भरून ठेवावेत. याची भाजी खूप चविष्ट व खमंग लागते. कोकण भागात ही पाककृती प्रसिद्ध आहे. कधी घरात भाजी नसेल, तर याची भाजी करता येते.

संबंधित बातम्या