लातूर टंचाईच्या खाईत
पाण्यासाठी...
लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात केवळ १७.२५ दशलक्षघनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहराला महापालिकेच्या वतीने महिन्यातून केवळ तीन वेळाच नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. भीषण पाणीटंचाईला सध्या लातूरकर सामोरे जात आहेत. २०१५ सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मॉन्सून वेळेवर आला नाही, तर मात्र ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी लातूरकरांचे अतोनात हाल होणार आहेत.
धनेगाव (ता. केज, जि. बीड) येथील मांजरा धरणातून लातूर शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. २०१६-१७ आणि २०१७-१८ ही सलग दोन वर्षे हे धरण पावसाच्या पाण्यामुळे शंभर टक्के भरले होते. इतकेच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात पाणी कर्नाटकात वाहून गेले होते. पण २०१८-१९ मध्ये पावसाने पाठ फिरवली. या धरणात पाणी आलेच नाही. त्यात वर्षभरात सिंचनासाठी तीन वेळा पाणी सोडण्यात आले. त्याचा परिणाम ऑक्टोबरमध्येच धरणातील पाण्याने मृतसाठा गाठला. या धरणातून लातूर शहरासह अंबाजोगाई, धारूर, केजसह गावांना पाणी पुरवठा केला जात आहे. या सर्व ठिकाणी आता टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
लोकांची मानसिकता बदलेना
लातूरला सातत्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यात २०१५ मध्ये तर न भूतो न भविष्यती अशा टंचाईला लातूरकर सामोरे गेले आहेत. यावर्षी रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात आला. हा प्रश्न देशातच नव्हे, तर जगभर गाजला. तरीदेखील लातूरकरांच्या मानसिकतेतच बदल झाला नाही किंवा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेने नियोजनाकडे लक्ष दिले नाही. शहरातील पन्नास टक्के नळाला तोट्या नाहीत. तासन्तास पाणी सोडले जात आहे. पाणी भरल्यानंतर नळाला तोट्या नसल्याने पाणी वाया जाण्याचे प्रमाण मोठे आहे. नागरिक टॉयलेटमध्ये पाणी सोडणे, गाड्या धुणे, रस्ते धुणे असे प्रकार आजही सर्रास घडत आहेत. याकडे महापालिका गांभीर्याने पाहत नाही हे दुर्दैव आहे.
‘अमृत’चे पाणी मिळेना
पाण्याच्या बाबतीत महापालिकेकडे नियोजनाचा मोठा अभाव आहे. लातूरमधील जलवाहिनी बदलण्याचे काम अमृत योजनेतून केले जात आहे. हे काम मार्च २०१८ मध्येच पूर्ण होणे अपेक्षित होते. मे २०१९ आला तरी हे काम अर्धवट अवस्थेतच आहे. महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड केला आहे. तरी कामात मात्र प्रगती नाही. त्यामुळे शहरातील जुन्याच जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यातूनही गळतीचे प्रमाण अधिक आहे. यावरही महापालिकेचे नियंत्रण नाही.
महिन्यातून तीन वेळाच पाणी
लातूर शहरात पुन्हा एकदा २०१५ सारखी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. मांजरा धरणात केवळ १७.२५ दशलक्षघनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे एक मेपासून शहराला दहा दिवसांतून एकदाच म्हणजे महिन्यातून तीन वेळाच पाणीपुरवठा महापालिकेच्या वतीने केला जात आहे. २०१५ मध्येदेखील मार्च - एप्रिलमध्ये असाच दहा दिवसांतून एकदा पाणीपुरवठा झाला. त्यानंतर हळूहळू बंद झाला. आताही तशीच परिस्थिती आहे. पावसाळ्यापर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन महापालिकेकडून केले जात आहे. पण वाढत्या उन्हामुळे धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहे. सध्या दररोज ०.०७ दशलक्षघनमीटर पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्याचा परिणाम पाणी कमी होण्यावर होऊ लागला आहे. त्यामुळे मॉन्सून लांबला तर मात्र लातूरकरांचे ऐन पावसाळ्यात अतोनात हाल होण्याची भीती आहे.
ग्रामीण भागाला ‘जलयुक्त’ने तारले
लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांत ‘जलयुक्त शिवार’ची मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील विहिरी, विंधन विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होण्यात झाला आहे. त्यात जिल्हा प्रशासनाने ऑक्टोबरपासून ग्रामीण भागातील पाणीसाठे राखीव ठेवले. त्याचे नियोजन केले. त्यामुळे ग्रामीण भागात सध्या केवळ ३४ गावांत ४१ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
ऊस पळवतोय तोंडचे पाणी
लातूर हा अवर्षण क्षेत्र जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्याला सातत्याने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मांजरा धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहेत. असे असताना लातूर जिल्ह्यात विक्रमी ऊसाचे गाळप झाले आहे. हा विरोधाभास आहे. लातूर जिल्ह्यात यावर्षी आठ साखर कारखाने सुरू राहिले. त्यांनी आपला हंगाम पूर्ण केला आहे.
मराठवाड्यात विक्रमी गाळप या जिल्ह्यात झाले आहे. या आठ कारखान्यांनी ३५ लाख २२ हजार ६१२ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४० लाख ४२ हजार ५५५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. यात मांजरा कारखान्याने सात लाख तीन हजार ५४१ मेट्रिक टन गाळप करून आठ लाख ४३ हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. विलास कारखान्याने सहा लाख १३ हजार ६६३ मेट्रिक टन गाळप करून सहा लाख ५५ हजार ६४० क्विंटल, विकास दोन कारखान्याने तीन लाख ७६ हजार ५३८ मेट्रिक टन गाळप करून चार लाख २१ हजार ७०० क्विंटल, रेणा कारखान्याने पाच लाख १७ हजार ५५४ मेट्रिक टन गाळप करून सहा लाख ३२ हजार ४३० क्विंटल, सिद्धी शुगर कारखान्याने चार लाख ३३ हजार ९०३ मेट्रिक टन गाळप करून चार लाख ७५ हजार १२० क्विंटल, पन्नगेश्वर कारखान्याने दोन लाख २८ हजार ८२ मेट्रिक टन गाळप करून दोन लाख ७३ हजार ४०० क्विंटल, साईबाबा शुगर कारखान्याने एक लाख १० हजार ५२२ मेट्रिक टन गाळप करून ९३ हजार ८१५, तर जागृती कारखान्याने पाच लाख ३८ हजार ८०९ मेट्रिक टन उसाचे गाळप करून सहा लाख ४७ हजार ४५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
मांजरा परिवारातील पाच कारखान्यांनी यावर्षी मराठवाड्यात सर्वाधिक भाव दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे आले, हे खरे आहे. पण या उसाने मात्र मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. ऊस हे नगदी पीक आहे. कारखाने चांगला भाव देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ऊस घेण्याकडे वाढतो आहे. यावर्षी मांजरा धरणातील पाणी सिंचनाच्या नावाखाली सोडण्यात आले. यात ऊस या पिकाचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. या उसाच्या पिकाला ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले गेले, तर पाण्याची मोठी बचत होणार आहे. जिल्ह्यात ठिबक सिंचनाद्वारे उसाला पाणी देण्याचे प्रमाण कमी आहे. याकरिता जिल्हा प्रशासन तसेच कारखान्यांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे.