चारा छावण्यांच्या व्यथा... 

ज्योती बागल
सोमवार, 13 मे 2019

पाण्यासाठी...
सध्या राज्यभर भीषण दुष्काळ पडला आहे. सर्वत्र पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. यात माणसांबरोबर जनावरंदेखील होरपळून निघत आहेत. त्यांना ना पोटभर चारा आहे, ना पाणी. छावण्यांची गरज असतानादेखील बऱ्याच ठिकाणी छावण्या उभारलेल्या नाहीत. ज्या ठिकाणी आहेत, त्याठिकाणी पुरेशा प्रमाणात चारा-पाणी उपलब्ध नाही. मिळेल त्या चाऱ्यात समाधान मानून आपली जनावरं शेतकरी कशीबशी जगवत आहेत... 

शेतकरी आपल्या पोटच्या पोरांना जेवढा जीव लावतो, तेवढाच जीव तो आपल्या गुरांना लावतो. कारण हेच त्यांचं पशुधन असतं. पण आज अशी परिस्थिती उद््‌भवली आहे, की जिवापाड जपलेल्या या जिवांना मिळेल त्या भावात विकण्याच्या मार्गावर हे शेतकरी आहेत. या जनावरांना रोज थोडं थोडं मरताना बघून बळीराजाचा जीव कासावीस होतोय. जनावरांना असं बघण्यापेक्षा त्यांना विकलेलंच बरं. जर पुन्हा भरपूर पाऊस पाणी झालं, तर घेऊ परत, पण असं चित्र बघवत नाही. या व्यथा आहेत, या परिस्थितीला बळी पडलेल्या शेतकऱ्यांच्या!
राज्यात भीषण दुष्काळ पडला असल्यानं काही ठिकाणी सरकारी छावण्या सुरू झाल्या आहेत. मात्र, असे अनेक तालुके आहेत जिथंदेखील दुष्काळाची झळ बसत आहे, जनावरांसाठी चारा छावण्यांची गरज आहे, पण अद्याप चारा छावण्या सुरू झाल्या नाहीत. ज्या ठिकाणी चारा छावण्या सुरू आहेत, त्याठिकाणी पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध नाही. जेवढा द्यायला पाहिजे तेवढा दिला जात नाही. बऱ्याच ठिकाणी फक्त ओला-सुका ऊसच चारा म्हणून दिला जातोय, तर पेंड अजिबातच उपलब्ध नाही. सतत सुका चारा खाल्ल्यानं जनावरांच्या तोंडाला फोडी येत आहेत. यावर शेतकऱ्यांनी आवाज उठवला पाहिजे, पण हेच शेतकरी काहीच नसण्यापेक्षा जे काही मिळतंय त्यात समाधान मानून गप्प बसत आहेत. 

बलराम चारा छावणी, नावळी
 सध्याची शेतकऱ्यांची परिस्थिती, समस्या, गरज जाणून घेत सागर जगताप यांनी पुरंदर तालुक्‍यातील नावळी या गावी, स्वत:च्या जागेत शंभूसेना सामाजिक संघ या संस्थेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यातली पहिली चारा छावणी १० फेब्रुवारी २०१९ रोजी सुरू केली आहे. शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विकू नये यासाठी दुष्काळाची तीव्रता वाढत आहे, हे जाणवताच जगताप यांनी छावणी सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. फेसबुक, व्हॉट्‌सॲप, इतर सोशल मीडिया आणि सेलिब्रिटी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चारा छावणीमध्ये आपली जनावरं आणण्यासाठी आव्हान केलं. 
 
या छावणीमध्ये आजूबाजूच्या गावातील ३०० जनावरांची नोंद झाली असून सध्या छावणीत फक्त १०० जनावरांसाठीच चारा-पाण्याची सोय झाली आहे. ज्या जनावरांची नोंद झाली आहे, ते शेतकरी रोज छावणीत त्यांच्यासाठीपण सोय झाली का बघण्यासाठी येतात आणि निराश होऊन परत जातात. जगताप कुटुंब आणि शंभूसेना जमेल त्या परीनं ही चारा छावणी चालवत आहेत. यांना सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही. याठिकाणी आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची वेगळी व्यथा आहे. पण अपेक्षा मात्र एकच आहे, की आपल्या जनावरांना ते जगतील एवढा तरी चारा-पाणी मिळावं. कारण त्यांची जनावर वाचली, तरच ते जगू शकणार आहेत. 

 या भागातील जास्त जमीन खडकाळ आहे. त्यामुळं शेतीला जोडव्यवसाय म्हणून दूध व्यवसाय केला जातो. या व्यवसायावरच त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण होतं. सध्याची परिस्थिती बघता, पोट भरण अवघड आहे, तर शिक्षणासाठी खर्च करणं लांबच राहिलं. त्यामुळं इथले शेतकरी, जनावरं अनेकांच्या मदतीच्या आशेत आहेत. 

या छावणीला जेजुरी देवस्थानकडून पाण्याची मदत होत असून पाऊस पडेपर्यंत ही मदत पुरवणार आहेत. तसंच चारा छावणीसाठी शंभूसेना सामाजिक संघाचे अध्यक्ष दीपक राजेशिर्के यांनी आपली पेन्शन देऊ केली आहे. बलराम छावणीला पहिली मदत सागर जगताप यांचे गुरू, मार्गदर्शक योगेश कदम, लायन्स क्‍लब ऑफ पुणे यांच्याकडून झाली. त्यांनी एक कडबा कुट्टी मशिन मदत म्हणून पुरवली आहे. श्रीनाथ म्हस्कोबा सहकारी साखर कारखाना यांच्याकडून एक टेम्पो वाडे आणि ऊस मिळाला आहे. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टकडून एक टॅंकर पाणी व दोन ट्रॅक्‍टर ऊस मिळाला आहे. तर भारतीय विकास संघाकडून ४५ हजार रुपयांचा चारा मिळाला आहे. पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप व मित्रपरिवार यांच्याकडून २२ टन ऊस मिळाला आहे. असे अनेक दानशूर लोक आहेत, ज्यांनी मदत केली आहे.

पुण्यातील मोहनलालजी बागमार यांनी आपल्या नातीचा वाढदिवस या छावणीवर साजरा करून सहा हजार दोनशे रुपयांचा चारा इथल्या जनावरांसाठी दिला. दानशूर माणसांनी तर छावणीला मदत केली आहेच, पण लहानांनीसुद्धा यात खारीचा वाटा उचलला आहे. या छावणीला तीन गटातून मदत होते. व्यक्तिगत, राजकीय पुढारी आणि सामाजिक संस्था.

ही २०१३ मधील घटना आहे. आमच्या गावातल्या एका शेतकऱ्यानं कर्ज काढून एक गाय विकत घेतली होती. त्यानं ती गाय कितीला घेतली, किती कर्ज काढलं हे मला माहिती होतं. पण नंतर दुष्काळात अशी परिस्थिती निर्माण झाली, की दुष्काळामुळं त्यांच्यावर गाय विकायची वेळ आली. इच्छा नसतानादेखील तो शेतकरी पाणावलेल्या डोळ्यांनी व्यवहार करत होता. हे बघून मी एकदम अस्वस्थ झालो आणि त्यांना गाय विकण्यापासून थांबवलं. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही करताय का चारा छावणी सुरू? नाहीतर माझ्याकडं गाय विकण्याशिवाय पर्याय नाही. त्या आधी मला चारा छावण्या प्रत्यक्षात माहिती नव्हत्या. जे काही माहिती होत ते पेपरमध्ये वाचलं होतं एवढंच. पण जेव्हा त्या शेतकऱ्यानं मला तसं विचारलं, तेव्हा मी त्यांना शब्द दिला पुढच्या ४८ तासात चारा छावणी सुरू करेन नाहीतर गावात तोंड दाखवणार नाही. ही त्या शेतकऱ्यांसाठीची तळमळ होती. आणि तेव्हा मी नुकताच शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागलो होतो.
चारा-छावण्या सुरू करण्यासाठी मला भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते माऊली तुपे यांची खूप मदत झाली. त्या शेतकऱ्यांना शब्द देऊन त्यानंतर मी पुण्याला निघालो. तेव्हा माझ्याकडं जेमतेम ४०-५० रुपये होते. अण्णांकडे गेलो. त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी काहीतरी करावं म्हणून मी त्यांच्या इथंच बसून राहिलो. शेवटी त्यांनी मला बोलावून घेऊन सामाजिक संस्थांची लिस्ट काढायला सांगितली. त्यानंतर मला पहिली मदत एस.पी. कॉलेजमधील एका प्राध्यापक बाईंनी केली. ३७ व्या तासाला आमच्या गावात चाऱ्याचा पाहिला टेंपो आला आणि छावणीवर गुरे आणायला सुरुवात झाली. नंतर शेतकऱ्यांशी बोलून अडी-अडचणी जाणून घेतल्या आणि तशी सुधारणा करत गेलो. माझे वडील मी नऊ महिन्यांचा असताना वारले. त्यामुळं आयुष्यात संघर्षाची सवय लहानपणापासून होतीच. मी उभी केलेली ही छावणी माझ्यासाठीच एक आदर्श प्रकल्प ठरली. कारण यातून मला स्वत:ला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत.  
इथल्या शेतकऱ्यांचा विकास न होण्याला कारण म्हणजे एमआयडीसीचं इथलं आरक्षण. त्यामुळे २००९ पासून इथल्या शेतकऱ्यांचा विकास खोळंबला आहे. त्यांच्या मुलांचं शिक्षण थांबलं, मुलींची लग्न मोडली, कितीतरी शेतकऱ्यांनी जीव गमावले आहेत. कारण शेती होत नाही म्हणून पैसा नाही. शेतीला पर्याय म्हणून लोकांनी जनावरं पाळायला सुरुवात केली होती. छावणी सुरू करण्याचा माझा मुख्य उद्देश म्हणजे आमचा भाग डोंगराळ आहे. सखल जमीन नसल्यामुळं कुरणं जास्त आहेत. त्यामुळं गुरांना चाराही मिळतो आणि त्यातून दुधाचा व्यवसाय उत्तम चालतो. दुधाच्या या जोडव्यवसायातून शेतकऱ्यांचं भागतं. पण दुष्काळ आहे म्हणून हीच जनावरं विकली, तर त्यांचं आर्थिक उत्पन्नच बंद होतं. म्हणून शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विकू नये आणि नैराश्‍यातून आत्महत्या करू नये हाच माझा उद्देश आहे. त्यामुळे फूल नाही, तर फुलाची पाकळी म्हणून मी ही छावणी सुरू केली आहे. ज्यांना जी मदत करता येईल त्यांनी ती करावी. म्हणजे चारा, जनावरांना छत करण्यासाठी नेट, पाणी असं काहीही चालेल.   
 - सागर जगताप, राष्ट्रीय प्रवक्ते, शंभूसेना सामाजिक संघ, नावळी  

सागर जगताप हे स्वत: छावणीवर नसताना त्यांच्या आई विमल जगताप आणि पत्नी कोमल जगताप या छावणीतील पूर्ण व्यवस्था बघतात. त्यामध्ये जनावरांना दिवसातून दोनवेळा चारा वाटणं, पाण्याचा टॅंकर आला नाही, तर फोन करून बोलावून घेणं. आलेलं पाणी विहिरीत सोडणं, पाण्याचे बॅरल भरून ठेवणं, जनावरांसाठी शेतकऱ्यांच्या मदतीनं कुट्टी तयार करणं. जनावरांना काही त्रास झाला, तर डॉक्‍टरांना फोन करून बोलावणं. बरीच अशी लोकं आहेत, जे स्वत: आपल्यापरीनं जमेल ती मदत करत आहेत. जनावरांचे डॉक्‍टरदेखील जनावरांची मोफत तपासणी करून देतात. 

गावात भीषण दुष्काळ आहे. जनावरांना खायला काहीच नाही आणि प्यायला पाणीपण नाही. परतीचा पाऊस न झाल्यामुळं ज्वारीच्या पिकाची उंची वाढली नाही. त्यामुळं वैरण कमी पडली. चारा कमी पडला, म्हणून छावणीवर यावं लागलं. ही पुणे जिल्ह्यातली पहिली छावणी आहे. तरी सरकारनं या आमच्या गुरांसाठी काहीतरी व्यवस्था करावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. आता सुपे आणि जुन्नर भागात सरकारी छावण्या सुरू झाल्याचा अंदाज आहे. 
- नवनाथ कुंजीर, शेतकरी, मावडी कडेपठार

या छावणीत माझी आणि माझ्या भावाची अशी नऊ जनावरं आहेत. आम्ही साधारण तीन महिन्यांपासून इथं आलोय. आमच्या भागात फार बिकट दिवस आहेत. चारा नाही, पाणी नाही म्हणून इथं आलोय. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं चारा दिला आहे. पण सरकार काहीच मदत करत नाही. त्यामुळे आहे त्यात चालवतोय आम्ही. आमच्यासारखेच पुरंदर तालुक्‍यातले बरेच शेतकरी इथं आहेत. या छावणीमुळं आमचं पशुधन तरी वाचलं. त्यामुळे सरकारनं काहीतरी मदत करावी, कारण तालुक्‍यात काय जिल्ह्यातसुद्धा एकही छावणी नाही.  
- हिरालाल भाणे, शेतकरी, मावडी कडेपठार

मी आताच बारावीची परीक्षा दिली आहे. मी दिवसभर इथं असतो. इथं आल्यावर गुरांना दोनवेळा चारा-पाणी देतो. धारा काढतो, शेण काढतो. सर्व गुरांसाठी कुट्टी करायला मदत करतो. आताच पाण्याअभावी गावांची अवस्था एवढी वाईट आहे, तर भविष्यात याहून भीषण परिस्थिती निर्माण होऊच शकते. त्यामुळे मी शेती न करता शहरात जाऊन नोकरीच करायचं ठरवलं आहे. त्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय पण नाही.     
 - निखिल सोनवणे, विद्यार्थी 

 

राज्यभरात चारा छावण्यांचा बोलबाला असला, तरी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्‍यात अजून एकही चारा छावणी सुरू झालेली नाही. तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थितीनं भीषण रूप धारण केलेलं असून तालुक्‍यातील शेतकऱ्यांचं अर्थकारण दूध व्यवसायावर अवलंबून आहे. परंतु, दुष्काळी परिस्थितीमुळं जनावरांना चाऱ्याची व्यवस्था नसल्यामुळं अडचणीचा सामना करावा लागत आहे. राज्यात विशेषत: ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. अनेक गावांची जलस्रोतं आटल्यानं पाण्याचा आणि चाऱ्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. एकीकडं दुष्काळातील झळांनी ग्रामीण भागातील लोकांची पाण्यासाठी पायपीट सुरू असताना सरकार आणि विरोधक मात्र प्रचाराच्या रणधुमाळीत, तर प्रशासन निवडणूक कामात व्यस्त आहे. केवळ दुष्काळ जाहीर करून न थांबता तालुक्‍यातील गावांमध्ये दुष्काळी उपाययोजना म्हणून चारा छावण्या त्वरित सुरू कराव्यात.
- राम शिंदे, एक तरुण शेतकरी, औंढी, ता. मोहोळ, जि. सोलापूर 

दुष्काळामुळं इथं दिवस बेकार आहेत, म्हणून आहे त्यात चालवायचं! आमच्या इथं दोन महिन्यांपासून सरकारी चारा छावणी सुरू झाली असून, चारा पाण्याची व्यवस्था ठीक आहे. एक दिवस ऊस देतात आणि एक दिवस सुकं भुस्कट देतात. एका जनावराला दिवसाला १५ किलो चारा देतात. सुग्रासची गोळी देतात, पण जनावरं ती खात नाही. त्या सुक्‍या चाऱ्याला जोड म्हणून सरकी पेंड किंवा खपडी पेंड पाहिजे होती. पाण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आपले ड्रम आणले असल्यानं लागलं तसं पाणी भरून देतात. दोन-तीन दिवसांपूर्वीच मी जीआर वाचला होता, त्यात चाऱ्याचं प्रमाण वाढवलं आहे. पण इथले व्यवस्थापक म्हणत आहेत, त्यांना अजून वरून आदेश नाही आला, म्हणून अंमलबजावणी नाही. 
 - परमेश्‍वर तळेकर, फुलसांगवी, ता. शिरूर कासार, जि. बीड

आमच्या इथल्या चारा छावणीची सध्याची स्थिती चांगली आहे. भारत कृषी सहकार संस्था शिरूर इथं ही छावणी सुरू आहे. साधारण ७०० पेक्षा जास्त जनावरं आहेत. माझी चार जनावरं आहेत. चारा-पाणी वेळेवर मिळतोय. फक्त पेंडीचा थोडा प्रश्‍न आहे, पण त्याचीपण तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. सुग्रास देतात, पण ते जनावरांना खाताना त्रास होतो. एका मोठ्या जनावराला दिवसाला १५ किलो चारा देतात, तर लहान जनावराला साडेसात किलो देतात. पाणीपण शुद्ध देतात. 
- राजू उगले, हाजिपूर, ता. शिरूर कासार, जि. बीड

 
खडलास हे माझं १० हजार लोकवस्तीचं गाव आहे. मी पाणी चळवळीसाठी खूप आधीपासून काम करतो. गेल्या जून-जुलैमध्ये पाऊस खूप कमी झाला म्हणून जनावरांसाठी चारा उपलब्ध नाही. म्हणून सरकारनं तीन चारा छावण्या सुरू केल्या आहेत. चाऱ्याची व्यवस्थापण चांगली आहे. त्यात ऊस आणि मकवान दिलं जातं. सांगोला तालुक्‍यात सध्यातरी पाण्याची व्यवस्था ठीक आहे.
- दत्ता टापरे, खडलास, ता. सांगोला, जि. सोलापूर

संबंधित बातम्या