उत्कंठावर्धक ‘द फरगॉटन आर्मी’ 

जाहिरात
गुरुवार, 23 जानेवारी 2020

वेबउपक्रम
वेबसीरिजसाठी कोणताही विषय वर्ज्य नाही, मग तो रोमान्स असो, कॉमेडी असो, ॲक्शन किंवा थ्रिलर असो. ॲमेझॉन प्राइमवर प्रजासत्ताक दिनानिमित्त अशीच एका ऐतिहासिक विषयावरील नवीन वेबसीरिज सुरू होत आहे, त्यानिमित्त...

दिग्दर्शक कबीर खान स्वातंत्र्यलढ्याच्या पानांमधली भारतीय सैन्याची विस्मृतीत गेलेली शौर्यगाथा अमेझॉन प्राइमवर उलगडणार आहेत. गणतंत्र दिनाचे औचित्य साधून येत्या २४ जानेवारीला भारतीय स्वातंत्र्य इतिहासातील हा सुवर्णकाळ जिवंत होणार आहे, ज्याची उत्कंठा प्रत्येक भारतीय प्रेक्षकाला लागून राहिली आहे. 

‘द फरगॉटन आर्मी’ हा भारतीय सैनिकांच्या नजरेतून मांडलेला आझाद हिंद सेनेचा इतिहास आहे. ही ब्रिटिश हुकमतीविरुद्धच्या लढ्याची कहाणी आहे. यामध्ये प्रमुख भूमिकेत आहेत अभिनेता सनी कौशल आणि आणि अभिनेत्री शर्वरी वाघ.

ॲमेझॉन प्राइमने तयार केलेली ही वेबसीरिज भारतातली आत्तापर्यंतची सर्वांत मोठी आणि महागडी वेबसीरिज असल्याचे मानले जाते. ही वेबसीरिज २४ जानेवारीला एकाच वेळी २०० देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक कबीर खान यांचा हा डिजिटल डेब्यू आहे. प्रत्येक युद्धाच्या दृश्यांवर त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. या वेबशोचे केवळ पाच एपिसोड्स तयार करण्यासाठी जवळपास वर्ष लागले आहे.

‘द फरगॉटन आर्मी’ची कहाणी १९४२-४३ च्या पार्श्‍वभूमीवर असून इंडियन नॅशनल आर्मीच्या उत्कंठावर्धक प्रवासावर आधारित आहे. सिंगापूरच्या युद्धात जेव्हा सैन्यातील लोक पकडले गेले, ही तेव्हाची कहाणी आहे. जेव्हा जपानी सैनिकांबरोबर मिळून लढताना आझाद हिंदच्या फौजेला लोकांचे पाठबळ मिळत होते, ही तेव्हाची कहाणी आहे. त्यानंतर इंफाळ, तिथे मिळवलेल्या विजयाचा हा इतिहास आहे. फौज पुन्हा एकदा बर्मा येथे गेली तेथे अडकून पडली, मात्र तरीही तिने तिथे विजय प्राप्त केला, ही त्याची विजयगाथा आहे.  

मालिकाकर्त्यांनी इंफाळ, बर्माचा पहाडी परिसर दाखवण्यासाठी थायलंड गाठले. थायलंडच्या पहाडांमध्ये आणि जंगलांमध्ये जाऊन मालिकेचे शूटिंग करण्यात आले आहे. तेव्हाच्या काळातील सैन्याची कार्यालये दाखवण्यासाठी मुंबई येथील लोकेशन्सचा वापर करण्यात आला आहे. मालिकेच्या टीमने सिंगापूरमध्येदेखील मोठ्या प्रमाणावर या वेबशोचे शूटिंग केले आहे.

ही इंडियन नॅशनल आर्मीची कहाणी आहे, मात्र या कहाणीचे वेगळेपण हे आहे, की नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याऐवजी, त्यांच्या सैनिकांच्या नजरेतून ती मांडण्यात आली आहे. इंडियन नॅशनल आर्मीच्या सैनिकांबरोबर वेगवेगळी युद्धे सरू असताना काय घडत होते, कोणत्या संकटांमधून ते जात होते आणि किती धैर्याने ते त्याचा सामना करत होते, या सगळ्याची शौर्यगाथा म्हणजे ॲमेझॉन प्राइमवरची दिग्दर्शक कबीर खान यांची ही उत्कंठावर्धक सीरिज आहे, ‘द फरगॉटेन आर्मी.’

संबंधित बातम्या