मॅरेज स्टोरी

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

वेब ओरिजिनल्स
 

लग्नाची गोष्ट म्हटलं, की डोळ्यासमोर काय येत? थोडसं प्रेम, ते मिळवण्यासाठी केलेला संघर्ष आणि मग थाटामाटात किंवा पळून जाऊन झालेलं लग्न! लग्न अगदी कसंही झालं, तरी ही क्रोनॉलॉजी काही बदलत नाही. मग जर कोणी त्यांच्या लग्नाची गोष्ट डिव्होर्सचा निर्णय पक्का झाल्यावर सांगितली आणि गोष्टीचा शेवट डिव्होर्सनं झाला तर?

एकमेकांबद्दलचा तीव्र तिरस्कार, फसवणुकीची भावना, मुलाचा ताबा मिळवण्यासाठी सुरू असणारी धडपड, कोर्टात एकमेकांवर केली जाणारी आरोप प्रत्यारोपांची चिखलफेक आणि या सगळ्यातही, छोट्या छोट्या प्रसंगातून 'मी अजूनही आहे' अशी जाणीव करून देणारं प्रेम! काही वर्षांच्या सुखी संसारानंतर, 'हॅप्पी फॅमिली' असं बिरुद मिरवून झाल्यावर, एका क्षणी 'जमत नाहीये, विभक्त होऊ' हे ठरवणं किती अवघड असेल? केस फाईल करून डिव्होर्स मिळेपर्यंत आणि डिव्होर्स मिळाल्यानंतर एकमेकांच्या आयुष्यातून स्वतःला खोडून टाकेपर्यंत जोडपी नेमकं काय फेस करत असतील? एका लग्नाच्या डिव्होर्सची गोष्ट सांगणारा, ऑस्करची सहा नामांकन मिळालेला नोहा बाउम्बाचचा 'मॅरेज स्टोरी' हा चित्रपट या उत्तरांसाठीच बघायला हवा. ही गोष्ट तशी साधी-सरळ आणि अमेरिकेत घडणारी आहे. जिथं डिव्होर्स होणं इज सो कॉमन! त्यामुळं चार्ली आणि निकोल या जोडप्याची ही गोष्ट वरवर अगदी नेहमीचीच वाटली, तरी ती अनुभवायला हवीच अशी आहे.

''निकोल मला आवडते कारण...'अशी सुरुवात करून चार्ली आपल्याला निकोलवर त्याच प्रेम असण्याची कारणं सांगत जातो, खूप मोठी यादी असते ही कारणांची! अगदी सेम अशीच यादी निकोलकडंही असते; चार्लीवर मनापासून असणाऱ्या प्रेमाची कारणं! ही यादी आपल्याला कळते, पण ते एकमेकांना सांगत नाहीत. आपल्याला एखादा माणूस का आवडतो, याची असंख्य कारणं असतात आपल्याकडं, पण ती सगळी क्वचितच आपल्या पार्टनरला माहिती असतात. आपल्या छोट्या छोट्या निरीक्षणांतून, त्याच्या एखाद्या नकळत घडणाऱ्या कृतीतून आपण प्रेमात पडत जातो. या गोष्टी अगदी शुल्लक असतात पण अडकून राहतात डोक्यात. आपल्या पार्टनरच्या लक्षातही न येणारी प्रत्येक कृती आपल्याला त्याच्या प्रेमात पाडत जाते आणि मग ही कारणांची यादी मोठी होत जाते, मनात साठत जाते! पुढं नात्यामध्ये इगो मोठे होतात आणि यादी मात्र मनातच राहते, अगदी नातं संपलं तरी! 

आपल्याला हवं तेव्हा उपलब्ध असणारा, आपल्याला स्वतःपेक्षा जास्त ओळखणारा पार्टनरच तर हवा असतो नेहमी आपल्याला. पण यातूनच एकमेकांना गृहीत धरणं सुरू होतं. सुरुवातीला क्यूट वाटणारी ही गोष्ट हळूहळू त्रास द्यायला लागते. आपला स्पेस ठरवतोय हे जाणवायला लागतं. मग आपण कधी आडून, तर कधी स्पष्टपणे सुचवू पाहतो. पण या सगळ्यात व्हिलन ठरणारा आपला पार्टनर खरंच इतका वाईट नाहीये किंवा तो हे मुद्दाम करत नाहीये हे आपल्या लक्षातच येत नाही. कदाचित म्हणूनच स्वतःच्या नाटकात निकोलला दिग्दर्शन करू न देणारा पण डिव्होर्सनंतर मात्र तिला दिग्दर्शनासाठी पुरस्कार मिळाल्यावर सरप्रायझिंग स्माईलनं काँग्रॅचुलेशन म्हणणारा चार्ली आपल्यातला वाटतो. आपल्याकडं ना, नातं तुटलं की प्रेमही थांबायला हवं अशी उगाच एक कंडिशन असते. त्यात डिव्होर्स म्हणजे तर ऑफिशिअल ब्रेकअप, कायद्यानं तुमचं नातं संपवणं. पण म्हणून असं सगळं एका क्षणात विसरायचं? नवरा-बायको हे नातं उरलं नाही, तरी दहा-बारा वर्षांचा सहवास, एकमेकांसोबत शेअर केलेल्या असंख्य गोष्टी हे उरताच की. ज्या आठवणी तयार करायला, साठवायला इतकी वर्षं दिली, त्यांना एका सडन मोमेंटला सांगून टाकायचं, की यापुढं माझ्या मेंदूमध्ये तुम्हाला नो एंट्री. कसं शक्य आहे? आपली उगाचच जबरदस्ती. त्यात या सगळ्यामध्ये तुमची मुलं इन्व्हॉल्व असतील तर हा आठवणींचा, प्रेम-काळजी-आदर आणि अटॅचमेंटचा गुंता किती प्रचंड असणार.

'रोज रात्री मी, तू उद्या तरी मरशील,' असा विचार करून झोपतो असं सांगणारा, स्वतःच्याच या विचारानं हादरून निकोलच्या पायाला मिठी मारून रडणारा चार्ली आणि घटस्फोट झाल्यावरही रस्त्यात खाली बसून चार्लीच्या शूजची लेस बांधणारी निकोल यांना पाहिलं, की उत्तम सुरू असणाऱ्या नात्याचं गणित नेमकं चुकत कुठं याच गुंत्यात अडकतो आपण. सारं काही हातातून निसटलं आहे असं वाटणाऱ्या शेवटापासून सुरू होऊन, स्वतःचं वेगळं आयुष्य नव्यानं सुरू करून, त्याच नात्याच्या वेगळ्याच डेफिनेशनच्या प्रेमात पडणारी ही मॅरेज स्टोरी कोणत्याही नात्याबद्दल अनेक अनुत्तरित शक्यता आपल्या मनात निर्माण करते, हे मात्र खरं!  

संबंधित बातम्या