टू ऑल द बॉइज...

प्राजक्ता कुंभार
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

वेब ओरिजिनल्स
 

शाळा हे बॅकग्राऊंड असणाऱ्या लव्ह स्टोरीज खूप क्युट असतात. या गोष्टींमध्ये 'प्रेम' नसतंच कुठं आणि खरं तर हे प्रेम बदलणाऱ्या इयत्ता आणि तुकडीनुसार सतत इकडं तिकडं फिरत राहतं. पण त्यावेळी आपल्याला जे काही वाटतंय ते अगदी खरंखुरं प्रेमच आहे, हे जगाला नाही, पण स्वतःला तरी अगदी पक्कं ठाऊक असतं, खात्रीच असते तशी. या हायस्कूल लव्हस्टोरीज सुरू होण्याची कारणंही जगावेगळी असतात. कधीतरी आपल्याकडं बघून हसलेली-लांबसडक वेण्या असणारी ती किंवा शाळेच्या बसमध्ये शेजारी येऊन बसणार तो 'उगाचच' आवडतात आणि ही उगाचच कोणीतरी आवडण्याची यादी लांबत जाते. अनेकदा हे फिलिंग आपल्यापुरतंच असतं, आपण आपल्याशी कबूल करण्यापुरतं. त्यामुळं शाळेतून बाहेर पडेपर्यंत अनेकांवर जडलेला जीव आपल्यापुरतं का असेना पण शाबूत असतो! ना या आवडत्या लिस्टमधल्या लोकांना याचा पत्ता असतो, ना आपल्या मित्र-मैत्रिणींना, ना घरच्यांना. सगळा मामला फक्त आपल्यापुरता सेट असतो आणि कधीकधी शाळेबरोबर संपूनही जातो.

नेटफ्लिक्स ओरिजिनल 'टू ऑल द बॉइज आय हॅव लव्ह्ड बिफोर' हा चित्रपटही एक अशीच गोडुली हायस्कूल लव्हस्टोरी आहे. पण ही साधीसरळ गोष्ट नाहीये, तर यात एक वेगळीच गंमत आहे. या चित्रपटातल्या नायिकेचं, 'लारा जीन'चं तिच्याबरोबर शाळेमध्ये असणाऱ्या पाच मुलांवर क्रश असतो. प्रत्येकाबद्दल वेळोवेळी वाटणारं आकर्षण, प्रेम-तिच्या सगळ्या फिलिंग्स तिनं पत्रांमध्ये लिहून ठेवलेल्या असतात. प्रत्येक क्रशच्या नावाचं एक पत्र, अशी एकूण पाच पत्रं तिच्या खोलीत एका कोपऱ्यात पडून असतात. तिला ती कधीच त्यांना द्यायचीही नसतात. तिचं त्यांच्यावर प्रेम तिला फक्त स्वतःपुरतंच ठेवायचं असतं. पण जे तिला करायचं नसतं, तेच होतं आणि ती पाचही पत्र एकाच वेळी त्या पाच जणांच्या हातात पडतात..!    

एकुलत्या एका आयुष्यात आपण किती वेळा प्रेमात पडू शकतो? एकदा.. दोनदा.. दहा वेळा? खरं प्रेम एकदाच आणि एकाच माणसावर होतं ही आपल्याकडची असणारी मुख्यतः बॉलिवूडची फिलॉसॉफी. आता यात खरं प्रेम म्हणजे नेमकं काय आणि ते शोधायचं कसं हा वेगळाच मुद्दा आहे खरा. त्यामुळं प्रेम 'खरं' आहे की 'खोटं' या कंडिशनपेक्षा एखाद्याच्या प्रेमात असणं जास्त महत्त्वाचं वाटत मला.

पूर्वीचं 'पेहली नजर का प्यार' वगैरे असेलही खरं, पण आजकाल प्रेमात पडण्याचेही काही टप्पे ठरलेत. आधी त्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या आयुष्यात कन्सिडर करायला लागता, मग हळूहळू त्याच्यावर तुमचा क्रश डेव्हलप होतो, मग आवड येते आणि हे सगळं टिकलं-वाढलं तर मग तुम्ही 'रिलेशनशिप'चा विचार करता. आता 'क्रश' या टप्प्यावरच थांबणारी अनेक प्रकरण असतात आणि या टप्प्याला वयाचं कोणतंही बंधन नाही. त्यामुळं प्रेम नाही तर नाही, पण क्रश तर असूच शकतं की... आणि ते एकाचवेळी एकच असावं असं कोणतंही शास्त्र नाहीये!

प्रेम म्हटलं की नातं आलं, ते निभावण्याची-जपण्याची जबाबदारी आली, थोड्याशा का असेना पण मर्यादा आल्या. अगदी एकतर्फी प्रेम म्हटलं तरी त्यात ती व्यक्ती कधीतरी आपली व्हावी हा अट्टहास आलाच. पण क्रश हे प्रकरण फुलपाखरासारखं वाटतं मला, अगदी निवांत.. स्वच्छंद. ना तो माणूस पूर्णपणे माहीत असण्याची गरज, ना त्याच्या सततच्या सहवासाची, ना संवादाची! तो आहे, तो आसपास होता, त्यानं कधीतरी आपल्याकडं पाहिलं, तो काहीतरी असंबद्ध बोलला, त्यानं एखादा मेसेज फॉरवर्ड का असेना पण केला... बास.. और चाहिये क्या जिंदगी में. मनातल्या मनात हवं तितकं प्रेम करा!

खऱ्या आयुष्यात रिलेशनशिपपासून सतत लांब पळणारी पण मनातल्या मनात समोरच्यावर वेड्यासारखं प्रेम करणारी लाराची ही गोष्ट आजच्या जेनरेशनला अगदी स्वतःची वाटेल. प्रेम, नातं या गोष्टी 'वर्क आउट नाही झाल्या तर..?' ही भीती सतत मनात असणाऱ्या माझ्यासारख्या मुलीला लाराची प्रेम करण्याची पद्धत, तिचं पीटरमध्ये इन्व्हॉल्व होणं अगदी माझ्यासारखंच वाटलं. कधीकधी एखाद्याचं फक्त आपल्या आसपास असणं ही सुखावणारं असतंच की. खरं तर ही दोन तासांची गोष्ट संपल्यावर उगाच वाटून गेलं, की लारासारखी पात्र लिहायला हवीत. अगदी थोड्या दिवसांसाठी ज्या कोणी आपलं थोडं लक्ष भरकटवलं, आयुष्य अगदीच गोड आहे असं वाटू दिलं, ज्याच्यासोबत बेंच शेअर करताना उगाच आयुष्य वगैरे शेअर करण्याची स्वप्नं पाहिली, ज्याचा 'ओके' इतकुसा रिप्लाय वाचूनही चेहऱ्यावर स्माइल आलं, पोटात फुलपाखरं असतात अशी जाणीव झाली, अशा प्रत्येकासाठी एक पत्र.. टू ऑल द बॉइज!

संबंधित बातम्या