श्रेष्ठत्वाची स्पर्धा मांडणारा 'ट्रूप झिरो'

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 20 एप्रिल 2020

वेब ओरिजिनल्स
 

कितीही आणि काहीही झालं तरी एक आखीव रेखीव आयुष्य जगण्याकडं आपल्यापैकी सगळ्यांचाच कल असतो. चौकटी बाहेर जाऊन स्वछंद जगण्याचं कितीही कौतुक असलं, तरी स्वतःच्या बाबतीत मात्र आपल्या आजूबाजूला असणाऱ्या नियमांच्या चौकटी अनेकदा सुखद वाटतात. आदर्श, गुणी, हुशार अशा विशेषणांनी नटलेलं आयुष्य कितीही ठराविक आणि तेच तेच असलं, तरी आपल्यापैकी अनेकांना चालून जातं. मग आपल्या आसपास या अशा ठराविक चौकटी मोडून, स्वतःचा वेगळा रस्ता शोधू पाहणारे, आपल्या स्टेबल आयुष्याच्या तुलनेत अॅबनॉर्मल आयुष्य जगू पाहणारे कधी थट्टेचा-चेष्टेचा, तर कधी बुलिंगचा विषय ठरतात. खरं तर ना आदर्श जगण्याची हौस चुकीची, ना स्वतःच्या कुवतीनुसार हवं तसं आयुष्य एक्सप्लोर करण्याची इच्छा चुकीची. दोन्हीही आपापल्या ठिकाणी योग्यच आहेत, पण तरीही तुलना येतेच आणि मग उगाच सुरू होते श्रेष्ठत्वाची स्पर्धा!

अॅमॅझॉन ओरिजिनलचा 'ट्रूप झिरो' हा चित्रपटही याच स्पर्धेच्या गोष्टीवर आधारित आहे. आदर्श जगण्याची, वागण्याची स्पर्धा. लहान, शाळकरी मुलांच्या आयुष्यात अगदी नकळत घुसवली जाणारी स्पर्धा. आयुष्य जगायचं असेल, तर ते असंच आणि याच पद्धतीनं जगायला हवं अशा चौकटी आखणार्यांविरुद्ध, मनमोकळं, स्वछंद जगणाऱ्या चिमुरड्यांची ही स्पर्धा!

 ही गोष्ट आहे ख्रिसमसची. ती एक 'ह्युमन फिमेल' आहे आणि पृथ्वीपल्याड अंतरिक्षात कुठं तरी जीवसृष्टी आहे, यावर तिचा अगदी वेड्यासारखा ठाम विश्वास आहे. अगदी लहानपणी आई गमावलेल्या ख्रिसमसचा तिच्या आईनं कधी तरी सांगितलेल्या एलियन थिअरीवर प्रचंड विश्वास आहे. स्वतःच्या कपड्यांची, एकूण अवताराची फारशी फिकीर नसणारी ख्रिसमस हॅप्पी गो लकी गर्ल आहे. स्पेसबद्दल अतिप्रचंड कौतुक असणारी, कधी तरी एलियन आपल्याला भेटेल यावर विश्वास असणारी, पुस्तकात रमणारी, फारसे मित्र-मैत्रिणी नसणारी आणि जगण्याच्या सो कॉल्ड नियमांमध्ये न बसणारी ही ख्रिसमस आपल्याला स्वछंद वाटते. पण तिच्या आसपास असणाऱ्या अनेकांसाठी तिचं हे बागडणं अगदीच न सहन होणारं आहे.

 शाळेत होणाऱ्या एका स्पर्धेमुळं, नासाच्या माध्यमातून स्वतःच्या आवाजात थेट अंतरिक्षात संदेश पाठवण्याची संधी ख्रिसमससाठी चालून येते. पण त्यासाठी तिने बर्डी स्काऊट टॅलेंट स्पर्धा जिंकणं अनिवार्य असतं. आता या स्पर्धेसाठी तिच्या शाळेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गटात तिला साहजिकच घेतलं जात नाही. कारण तिचं मनमुराद आणि स्वतःच्या मनाप्रमाणं जगणं! पण एलियनशी थेट बोलायची संधी ख्रिसमस कशी सोडेल? इतरांच्या मते आयुष्य जगण्यात अगदीच झिरो असणाऱ्या ख्रिसमसच्या ट्रूपला 'झिरो' हा नंबर मिळतो आणि मग सुरू होतो तिचा जुगाडू प्रवास!

 जगण्या-वागण्याचे आखून दिलेले नियम पाळण्यात आपला सर्वाधिक वेळ जातो. पंचतंत्राच्या गोष्टींतून ऐकलेलं, कोणती तरी, कधी तरी सांगितलेलं किंवा इतरांच्या अनुभवातून आलेलं आयतं-रेडी टू युज शहाणपण जास्त हवंहवंसं वाटत आपल्याला. आपल्याला एक्सप्लोर करावीशी वाटणारी गोष्ट कोणी तरी आधीच केलीये आणि त्यात त्यांना ठराविक अनुभव आलेत हा रेफरन्स न होता, आपल्या आयुष्यातला अनुभव होतो आणि इथंच आपण चुकतो. आपल्या बाबतीत काही तरी वेगळं घडू शकतं, आपल्याला काही नवं सापडू शकतं ही शक्यता गृहीतच धरत नाही आपण. इतरांच्या आदर्श जाण्याच्या चौकटी-नियम गरज नसताना आपण आपल्या आयुष्याला लागू करत राहतो आणि मग ख्रिसमससारखे स्वतःच्या जाणीवांवर ठाम विश्वास असणारे लोक आपल्याला उगाचच अॅबनॉर्मल वाटायला लागतात. 

  'आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत' याची कुठं तरी पुसटशी जाणीव असणारी ख्रिसमस, जेव्हा तिच्यासारख्याच जराशा वेगळ्या मित्रांना घेऊन स्पर्धेसाठी स्वतःचा ग्रुप तयार करते, तेव्हा तिचं मनापासून कौतुक वाटतं. 'मी बेड वेटर नाही' असं सगळ्यांना सांगणारी ख्रिसमस, 'हेल नो प्राईझ' (हो, हे नाव आहे) या आपल्या नव्या मैत्रिणीला 'आई गेल्यापासून मी नर्व्हस झाले, की बेडमध्ये शु करते' असं खरंखरं सांगते. त्यावेळी तिचं डोकं मांडीवर घेऊन थोपटून झोपवणारी, तिच्याच वयाची 'हेल नो प्राईझ', एखाद्याला समजून घेणं किती सोपं असू शकतं हे कृतीतून दाखवून देते. ख्रिसमस आणि तिच्या ग्रुपचं वेगळेपण साजरं करणारे त्यांच्या आजूबाजूचे लोक पाहिले, की अशा लोकांची किती गरज आहे ते जाणवतं.

 काय नाहीये या गोष्टीत, चिमुरड्यांमध्ये सुरू असणारं बुलिंग, वर्णभेदाचं वास्तव, प्रत्येक पायरीवर जाणवणारा गरीब-श्रीमंतीचा वाद, परंपरा विरुद्ध नाविण्य, आपल्याला माहिती असलेला प्रत्येक संघर्ष. पण या सगळ्यात पुरून उरतो तो 'चौकटी आणि नियमांच्या पलीकडं असणारा जगण्याचा विश्वास.' छोट्या ख्रिसमसच्या प्रेमात पडताना, आपल्यालाही तिच्यासारखं स्वतःसाठी, स्वतःच्या मनाप्रमाणं जगावंसं वाटून जातं. तिच्या एलियन थिअरीसारखं, आपणही आपल्यापुरती जगण्याची एखादी थिअरी शोधावी असं वाटू लागतं.

संबंधित बातम्या