ब्यूटिफुल बॉय!

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 18 मे 2020

वेब ओरिजिनल्स
 

'द बीटल्स' या इंग्लिश रॉक बँडच्या  जॉन लेनननं (John Lennon) आपल्या मुलासाठी एक गाणं लिहिलं होतं. त्याच्या मृत्यूआधी रिलीज झालेला शेवटचा अल्बम 'डबल फँटसी'मधील हे गाणं, 'ब्यूटिफुल बॉय!' जॉनचं त्याच्या पहिल्या बायकोपासून असलेल्या मुलाबरोबरचं  नातं कधीच फारसं बरं नव्हतं. प्लेबॉय मासिकाला दिलेल्या मुलाखतीत जॉननं 'I don’t love Julian any less as a child. He’s still my son, whether he came from a bottle of whiskey or because they didn’t have pills in those days' असं एक स्टेटमेंट दिलं होतं. त्यामुळंच कदाचित  सीन (Sean) या त्याच्या  योको ओनो (Yoko Ono) पासून झालेल्या दुसऱ्या मुलासाठी त्यानं  हे गाणं लिहिलं. या गाण्याचे शब्द म्हणजे आपल्या लहान बबड्याशी एका बापानं  साधलेला सहज-सोपा संवाद, आयुष्य जगण्याची फिलॉसॉफी, मुलाबरोबरचं बॉंडिंग  घट्ट करण्याची धडपड असं सगळंच आहे.

बाप म्हणजे आयुष्यात काहीही झालं, अगदी कोणतंही संकट आलं, तरी आपल्याला  सावरू शकेल, आपल्याला एकटं सोडणार नाही, असा ज्याच्याबद्दल अगदी पक्का विश्वास असतो असा माणूस. अगदी काहीही झालं, तरी बाप नावाच्या सुपर हिरोचं आपल्या आयुष्यात फक्त असणंही थोर असतं. मुलाला त्याच्या अशक्य वाईट अवस्थेत बघूनही त्यानं  नॉर्मल जगावं म्हणून धडपडण्याचं  बळ कुठून येतं बापाकडं  हा प्रश्नच आहे माझ्यासाठी.

'ब्यूटिफुल बॉय' हा  अॅमेझॉन  प्राइमचा चित्रपट पाहून हाच प्रश्न अधिक गहिरा  होत जातो. ड्रग्सच्या आहारी गेलेला आपला मुलगा सतत चुकतोय, हे दिसत असूनही, त्यानं  नॉर्मल आयुष्य जगावं म्हणून  शक्य ते सगळं करण्याची तयारी असणाऱ्या बापचे प्रयत्न क्षणभर आपल्याही सुन्न करून जातात.

डेव्हिड शेफ आणि निक शेफ या खऱ्याखुऱ्या बाप लेकाच्या आयुष्याची ही गोष्ट. लेखक-पत्रकार डेव्हिड यांनी लिहिलेल्या 'ब्यूटिफुल बॉय - अ फादर्स जर्नी थ्रू  हिज सन्स अॅडिक्शन' या पुस्तकावर आधारित आहे. ही गोष्ट आहे दोघांची, एकीकडं  निक , वरवर  आयुष्य भरभरून जगू पाहणारा मुलगा, आतून मात्र खूप एकटा पडलेला, त्याच्या भाषेत सांगायचं तर एक खूप, अथांग मोठं ब्लॅक होल स्वतःमध्ये आहे असं वाटणारा. लिहिणं, स्केचिंग यात रमणारा. कॉलेजच्या उंबरठ्यावर असणारा. कधीतरी सहज, गंमत म्हणून सुरू  केलेल्या दारू, पॉट, स्मोकिंग या साखळीतून ड्रग्सच्या आहारी गेलेला. तर दुसरीकडं  डेव्हिड, आपल्या गोंडस-गोजिरवाण्या, हुशार, निरागस मुलाला हातातून निसटताना, 'क्रिस्टल मेथ'च्या आहारी जाताना बघणारा, त्याच्यासाठी अस्वस्थ होणारा, त्याला पुन्हा माणसात आणण्यासाठी वाटेल  ते करण्याची तयारी असणारा, आपली नवी फॅमिली-बायको, दोन छोटी मुलं यांना वेळ देण्यात कमी पडणारा, अगतिक बाप आणि नवरा.

खरं  तर अगदी सुखवस्तू घरात राहणाऱ्या निकला ड्रग्सची गरजच काय? असा प्रश्न पडतो.  पण वेळोवेळी फ्लॅशबॅकमधून उलगडणारं निकचं बालपण, त्याच्यामध्ये कुठंतरी नकळत रुजलेल्या  एकटेपणाची जाणीव करून देतं  आपल्याला. अतिशय हट्टी, स्वतःचाच विचार करणारा निक अनेक प्रसंगांमध्ये चीड आणतो, तर दुसरीकडं  त्याची ड्रग्स सोडण्याची हतबलता आपल्याला अस्वस्थ करते. निकसाठी काहीही करण्याची तयारी असणारा डेव्हिड, अगदी शेवटच्या क्षणी मात्र त्याला मदत करायला नकार देऊन फोन कट करतो आणि स्वतःशीच रडतो, तेव्हा एखाद्याचा बाप होणं हे किती अवघड असू शकतं ही जाणीव आपल्याला अस्वस्थ करते. एकूण काय तर ही सगळी गोष्टच अस्वस्थ करते आपल्याला. 

डेव्हिडची दुसरी बायको, कॅरेन, निकची आई विकी, तिचा मित्र, हे सगळेच या गोष्टीला आपापल्या व्ह्यू पॉइंटनं आपल्यासमोर मांडतात. चित्रपट बघताना प्रत्येक क्षणी निक चुकीचा वाटतो, त्याचा रागही येतो, पण तरीही 
कुठंतरी त्याला एकदा जवळ घेऊन बसावं, त्याच्याशी बोलावं, त्याला समजवावं असंही 
वाटतं राहतं. 

एक प्रसंग आहे या गोष्टीत, आपल्या बाबांबरोबर   खूश असणाऱ्या चार-पाच वर्षांच्या छोट्या निकला  सुटीसाठी त्याच्या आईकडं  जावं लागतं. बाबा आपल्याला त्याच्यापासून दूर करतोय म्हणून रुसलेल्या या  छोटुशा निकला निरोप देताना 'तुला माहितीये  माझं  तुझ्यावर किती प्रेम आहे?' असा प्रश्न डेव्हिड विचारतो. त्यावर १८० डिग्रीमध्ये मान हलवून नकार देणाऱ्या निकला 'व्हॉट  आय  फील फॉर यू इज एव्हरीथिंग.. आय लव्ह यु मोअर दॅन एव्हरीथिंग' असं उत्तर डेव्हिडकडून मिळतं आणि या उत्तरातल्या 'एव्हरीथिंग' याच शब्दाभोवती निकचा  इतकुसा मेंदू अडकून पडतो. माझंही असंच  काहीसं झालं ही गोष्ट पाहून... काय आवडलं या चित्रपटातलं? एकच उत्तर आहे सध्या... एव्हरीथिंग!

संबंधित बातम्या