द बॉय हू हार्नेस्ड द विंड     

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 15 जून 2020

वेब ओरिजिनल्स
 

कोणी काही म्हणा, शेतकरी ही एक युनिव्हर्सल फिगर  आहे. जिल्हे बदलतील, राज्य बदलतील, झालंच तर देशांच्या सीमा ओलांडल्या जातील, पण शेतकरी या माणसाची कोअर व्हॅल्यू सगळीकडं  सारखीच  असणार. मातीची ओढ, जमिनीविषयीचं  अपार प्रेम आणि निसर्गाची कितीही अवकृपा झाली, तरी पुन्हा पुन्हा नव्यानं  उभं  राहण्याची जिद्द. 'लेट्स क्वीट' या उत्तराच्या जवळपासही न फिरकणारा हा माणूस... अन्नदाता! राजकारण्यांपासून अगदी सर्वसामान्यांपर्यंत प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय. सरकारी योजना, कागदोपत्री व्यवहार, कर्जाची उपलब्धता या उगाचच्या गोंधळात अडकलेला. सकारात्मक बातम्यांपेक्षा 'कर्जबळी, आत्महत्या,  नैसर्गिक संकटं' यासारख्या शब्दांतून आपल्यासमोर उलगडणारा. कधी निर्सगामुळं  वेठीस धरला जाणारा,  तर कधी पडलेल्या बाजारभावामुळं! पण या सगळ्या संकटांतूनही स्वतःचे मार्ग काढणाऱ्या, सोल्युशन शोधणाऱ्या याची ऐट वेगळीच. 'द बॉय हू हार्नेस्ड द विंड' हा नेटफ्लिक्स ओरिजिनलचा चित्रपट आफ्रिकेतल्या एका शेतकऱ्याचा संघर्ष  आपल्यासमोर मांडतो खरा, पण ही गोष्ट आहे ती या शेतकऱ्याच्या १३ वर्षांच्या मुलाची,  विल्यम कमकवंबा (William Kamkwamba)ची!

आफ्रिकेतलं  एक छोटंसं खेडेगाव  मलावी (Malawi). इथं राहणारं  शेतकरी कमकवंबा कुटुंब. आई-वडील, मुलगी, चित्रपटाचा नायक विल्यम आणि एक छोटं बाळ. ओला नाहीतर कोरडा दुष्काळ या गावाच्या पाचवीला पुजलेला. आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याची, शिकवण्याची प्रचंड इच्छा मनाशी बाळगणारे  ट्रायवेल  आणि अग्नेस हे आई-बाबा. शेती हा उत्पन्नाचा एकमेव मार्ग आणि त्याबद्दल मनात कोणतीही तक्रार नसणारं, हे एक साधं सरळ कुटुंब. विल्यमला शाळेत जाण्याची भारी हौस. विज्ञानामध्ये  विशेष गती! दिवसातल्या फावल्या वेळात यंत्रांची जोडाजोडी करण्यात त्याचा वेळ जातो.

एकीकडं दुष्काळाचा प्रश्न, तर दुसरीकडं डोंगरावरून वाहून येणाऱ्या पावसाच्या पाण्याला गावात शिरण्यापासून  अटकाव करणाऱ्या झाडांना  पैशांसाठी विकणारे गावकरी. साहजिकच  ओला दुष्काळ गावासमोर उभा राहतो. घरात उपलध असणाऱ्या अन्नावर कशीबशी गुजराण करणारे गावकरी हा ओला दुष्काळ निभावून नेतात, पण पुढं संकट येतं ते कोरड्या दुष्काळाचं. घरात अन्न नाही, शेतीला पाणी देण्याची सोय नाही आणि नजर जाईल तिकडं फक्त भेगाळलेली कोरडी जमीन.

विल्यमला शाळेत पाठवण्यासाठीही आता त्याच्या घरच्यांकडं पैसे उरले नाहीत. पण शिक्षणाची ओढ विल्यमला शांत बसू देत नाही. काहीतरी जुगाड करून किमान शाळेच्या लायब्ररीमध्ये बसून पुस्तकं वाचण्याची परवानगी विल्यमला मिळते.. आणि या संधीचं  विल्यम सोनं करतो. पावसाच्या पाण्यावर  मुख्यतः अवलंबून असणारी शेती, विल्यम पावसाविना, अगदी बारा  महिने कशी फुलवतो हे या चित्रपटातच पाहायला हवं. 'द बॉय हू हार्नेस्ड द विंड' याच पुस्तकावर आधारित असणारी गोष्ट खऱ्याखुऱ्या विल्यमच्या आयुष्यावर आधारित आहे.  त्यामुळं  ती पाहताना आणि अनुभवताना आपणही या गोष्टीचा नकळत एक भाग होऊन जातो.

आपल्याही आयुष्यात, कळत-नकळत कितीतरी संकटं  येतात. आपल्याला हादरवून टाकणारी, प्रसंगी अगदी टोकाची परीक्षा पाहणार, पण तरीही अशा संकटांना सामोरं जाऊन, त्यावर आपल्या परीनं मात करून बाहेर पडण्यात एक वेगळीच मजा असते. अनेकदा ही उत्तरं शोधताना आपण आपलेच अनेक कंफर्ट झोन बाजूला सारतो. संकटं तुमची परीक्षा पाहतात हे जरा फिलॉसॉफिकल असलं, तरी ती तुम्हाला क्रिएटिव्ह करतात हे मात्र नक्की. एखादी  समस्या सोडवताना  तुम्ही प्रत्येकवेळी काहीतरी नवीनच करावं हे गरजेचं नसतंच मुळी, गरजेचं असतं ते स्वतःच्या स्ट्रेंथवर काम  करणं, त्यांचा उपयोग करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या क्षमतेवर कोणतीही शंका न घेणं. 

इतरांना शून्य ठरवण्याची वाट बघणाऱ्या किंवा त्यांच्याभोवती असणाऱ्या अडचणींना पाहून सहानुभूती द्यायला तयार असणाऱ्यांची मला नेहमीच भीती वाटते. पण कदाचित त्याहून जास्त कीव ती अडचणींचा बाऊ करून इतरांकडून सहानुभूती मिळवणाऱ्यांची वाटते. प्रश्नावर उत्तर शोधणं हे त्यापेक्षा अधिक सोप्पं आणि सहज आहे. घरात अन्न नाही, आयुष्यातला एकुलता एक विरंगुळा असलेली शाळा बंद झालीये, आपण काहीतरी करू शकतो, यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नाही.  ही अशी सगळी प्रतिकूल परिस्थिती असताना, स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवणारा विल्यम भावतो ते त्याचसाठी. प्रसंगी वाऱ्यालाही दिशा बदलायला भाग पाडेन ही धमक असणाऱ्या, तेरा  वर्षांच्या या विल्यमची ही गोष्ट बघायला हवी ती याच आत्मविश्वासासाठी!

संबंधित बातम्या