'चिंटूच्या बर्थडे'ची गोष्ट

प्राजक्ता कुंभार    
बुधवार, 1 जुलै 2020

वेब ओरिजिनल्स

लहानपणी सगळ्यात जास्त अप्रूप कोणत्या गोष्टीचं वाटलं असेल, तर ते वर्षातून एकदा येणाऱ्या वाढदिवसाचं! नवीन वर्षाचं कॅलेंडर घरात आल्यावर त्यातलं आपल्या वाढदिवसाच्या महिन्याचं पान काढून, त्यादिवशी येणारा वार बघणं हा सगळ्यात आवडता उद्योग असायचा. किमान तीन चार महिने अगोदरपासूनच घरच्यांना वाढदिवसाचं रिमांइंडर देणं सुरू व्हायचं. आपल्याला वाढदिवसाला काय हवंय हे डोक्यात पक्कं असायचं. नव्या फ्रॉकपासून, शाळेत वाटायच्या चॉकलेटच्या ब्रँडपर्यंत सगळी लिस्ट अगदी तयार असायची. पण या सगळ्यांत सर्वांत जास्त महत्त्वाचा असायचा तो म्हणजे वाढदिवसाचा केक. त्याचा आकार, फ्लेवर, रंग आणि त्यावर मिणमिणणाऱ्या छोट्या छोट्या मेणबत्त्या... सगळं कसं खास आपल्यासाठी म्हणून आपल्या आवडीचं असायचं! स्वतःच्या मर्जीप्रमाणं सेलिब्रेशन करून वाढदिवस संपला, की डोक्यात लगेच पुढच्या वाढदिवसाचं गणित सुरू व्हायचं. आता मात्र छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रमण्याचे आणि समाधानी असण्याचे हे दिवस कॅलेंडरमध्ये सापडत नाहीत. पण स्वतःचं हेच बालपण आणि हीच निरागसता अनुभवण्याची संधी झी-५ ओरिजिनलचा 'चिंटू का बर्थडे' हा चित्रपट आपल्याला देतो.

नावातूनच गोष्ट सांगणारा हा चित्रपट. ही गोष्ट आहे ती सहा वर्षांच्या चिंटूची, त्याच्या सहाव्या वाढदिवसाची. अतिशय गोंडस, चष्मीश अशा या चिंटूच्या घरात सकाळपासूनच धावपळ सुरू आहे. वाढदिवसाचा नवा ड्रेस, शाळेत मित्रांमध्ये वाटायची चॉकलेट्स आणि संध्याकाळी घरी होणाऱ्या बर्थडे पार्टीसाठी एक सुंदरसा केक अशी सगळी जय्यत तयारी सुरू आहे. फरक फक्त एकच, चिंटूचं घर बगदादमध्ये आहे. ही गोष्ट आहे ती २००४ मधील, जेव्हा इराकचा ताबा अमेरिकेच्या फौजांनी घेतलेला आहे आणि इराकचा सर्वेसर्वा सद्दाम हुसेन याच्यावर खटला सुरू होणार आहे. 

बिहारमध्ये राहणाऱ्या मदन तिवारी, म्हणजेच चिंटूच्या बाबांचं सगळं कुटुंब व्यवसायानिमित्त बगदादमध्ये राहत आहे, खरं तर अडकलं आहे. चिंटूच्या वाढदिवशी सकाळीच बगदादमध्ये बॉंब हल्ला सुरू होतो आणि शाळा बंद केल्या जातात. हिरमुसलेल्या चिंटूचा वाढदिवस घरातच एकदम जोशात साजरा करायचं तिवारी कुटुंब ठरवतं. चिंटूचे आई-बाबा, मोठी ताई, आजी आणि त्यांचे घरमालक असे सगळे मिळून चिंटूला खूश करण्याची तयारी सुरू करतात. तयारी सुरू होते आणि अशातच चिंटूच्या वाढदिवसाला दोन 'बिन बुलाए मेहमान' हजर होतात, दोन अमेरिकी सैनिक आणि ही गोष्ट वेगळंच वळण घेते. 'बर्थडे को हलवा नाही खाते, केक खाते है,' असं म्हणणाऱ्या चिंटूचा वाढदिवस शेवटी साजरा होतो की नाही यासाठी हा चित्रपट बघायला हवा. 

'हे सगळं माझ्याच आयुष्यात का घडतंय' असा प्रश्न मला कित्येकदा पडतो, मुळात जेव्हा खूप प्रयत्न करूनही मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, तेव्हा तर फारच. मी केलेल्या प्लॅनिंगनुसारच सगळं व्हावं हा उगाचचा अट्टहास असतो आणि त्यासाठी शक्य तितकी मायक्रो-मॅनेजमेंट करायचीही माझी तयारी असते. पण अगदी शंभर टक्के तयारी केली, तरी ऐनवेळी काहीतरी बिनसतं किंवा काहीतरी अनपेक्षित समोर उभं ठाकतं. अशावेळी स्वतःच्या बुद्धिमत्तेवर, क्षमतेवर स्वतःकडूनच शंका निर्माण केल्या जातात आणि आपण शांतपणे समस्या सोडवू शकतो हा विचारच मागं पडतो. त्यामुळंच कदाचित, 'एक छोटेखानी वाढदिवस' अगदी एवढीच अपेक्षा आयुष्याकडून असणाऱ्या चिंटूच्या मध्यमवर्गीय कुटुंबावर एका मागून एक येणाऱ्या अडचणी पाहून अस्वस्थ व्हायला होतं. पण या सगळ्या परिस्थितीतही चिंटूच्या बाबांचा संयम, शांतपणे परिस्थिती हाताळण्याची ताकद आणि स्वतःमध्ये रुजवलेली सकारात्मकता बरंच काही शिकवून जाते. कोणत्याही प्रश्नावर आततायीपणे उत्तर शोधणं किंवा इतरांना दोष देत राहणं हे उत्तराचे पर्याय असू शकत नाहीत, हे समजत जातं. कदाचित अनपेक्षितपणे समोर येणाऱ्या प्रश्नांना शांतपणे सोडवण्याची चिंटूच्या बाबांची हिम्मतच, खऱ्याखुऱ्या आयुष्यातही गरजेची असेल, हे जाणवतं.

छोट्यामोठ्या कुरबुरी असणारं पण एकमेकांना सांभाळून घेणारं आणि जपणारं हे तिवारी कुटुंब, म्हणजे मला माझीच एक्सटेन्ड फॅमिली वाटली आणि मी रमले त्यांच्या या गोष्टीत. काही गोष्टी आणि त्यातली पात्रं ही अगदी सरळसाधी असतात. ती गोष्ट आपल्या घरात घडतीये असं वाटावं अगदी इतपत सोपी - सुटसुटीत-हलकीफुलकी.'चिंटू का बर्थडे' ही गोष्टही आपल्याच घरातली आहे, त्यामुळं चिंटूची बर्थडे पार्टी आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचा 'केक' मिस करून चालणारच नाही!

संबंधित बातम्या