ब्रिटनी रन्स अ मॅरेथॉन 

प्राजक्ता कुंभार
सोमवार, 13 जुलै 2020

वेब ओरिजिनल्स

नुकतंच ''फेअर अँड लव्हली'' या फेअरनेस क्रिमनं  त्यांच्या  नावातून ''फेअर'' हा शब्द काढून टाकायची घोषणा केली. अमेरिकेत झालेल्या ''ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर'' या मुव्हमेंटनंतर वर्णद्वेषाचा मुद्दा तसाही ताजा होता. त्यात ''युनिलिव्हर''च्या या घोषणेनं ''फेअर अँड लव्हली'' या नावामुळं कित्येक दशकांपासून सेट झालेला ''सौंदर्य आणि त्वचेचा गोरा रंग'' हा स्टिरीओटाइप बदलण्याचा किमान प्रयत्न केला. या दोन्ही घटनांमुळं एखाद्याचं  असणं आणि दिसणं याबद्दल अजूनही समाजामध्ये असणारा विचार समोर आला.

छान दिसणं म्हणजे तुमचा रंग गोरा असणं किंवा तुमचं  शरीर प्रमाणबद्ध असणं असा ठराविक विचार आपल्यापैकी बरेच जण अजूनही करतात. मुलींच्या बाबतीत म्हणाल, तर जास्त वजन असणारी, रंगानं  गोरी नसणारी मुलगी आजही आपल्याकडच्या सौंदर्याच्या व्याख्येत बसत नाही. आपण आपल्या बाजूनं ''एखाद्यानं  कसं दिसावं'' याचे बेंचमार्क सेट करत असताना, या एकतर्फी वैचारिक प्रोसेसची चाचपणी करण्याचा विचारही करत नाही. व्यक्तीचं वजन आणि तिचा रंग हा आपल्यासाठी इतर कोणत्याही फॅक्टरपेक्षा महत्त्वाचा होऊन जातो. ''ऑल स्किनटोन्स अँड ऑल बॉडी टाइप्स आर  ब्यूटिफुल'' हे वाक्य भिंतीवर लिहिलेल्या सुविचारांसारखंच उरतं आणि गडबड तिथं  होते, जिथं  आपण एखाद्याला फक्त बघून जज करतो! ना त्याच्या तसं दिसण्याची कारणं लक्षात घेतो, ना त्या व्यक्तीचा तिथपर्यंत पोचण्याचा स्ट्रगल! ''ब्रिटिनी रन्स अ मॅरेथॉन'' हा अॅमेझॉन ओरिजिनलचा चित्रपटही आपल्याला याच स्ट्रगलची गोष्ट सांगतो.

ब्रिटनी, २७ वर्षांची, न्यूयॉर्कमध्ये राहणारी तरुणी. आयुष्यात अजूनही चाचपडणारी, मैत्रिणींसोबत अपार्टमेंट शेअर करून राहणारी. कोणताही बँक बॅलन्स नसणारी, तरीही निवांत आयुष्य जगणारी. वाट्टेल ते खाणं, सैरभैर जगणं, रात्रभर पार्टी करून सकाळी उशिरा उठणं या सवयी अंगवळणी पडलेली ब्रिटनी. ''ऑल बॉडी टाइप्स आर  ब्यूटिफुल'' या मृगजळात जगणारी. एनर्जेटिक वाटत नाही, म्हणून रेग्युलर चेकअपसाठी ती डॉक्टरकडं जाते आणि समोर येतं ते तिच्या अनफिट लाइफस्टाइलचं वास्तव. आरशामध्ये दिसणारं स्वतःचं प्रतिबिंब पाहून, ब्रिटनी  स्वतःच्या आरोग्यसाठी एक प्रयत्न करायचं ठरवते आणि ''फक्त एवढा एक ब्लॉक'' म्हणून ब्रिटनीच्या आयुष्यात झालेली रनिंगची सुरुवात, संपते ती न्यूयॉर्क मॅरेथॉन, या जगातल्या सगळ्यात मोठ्या मॅरेथॉनमध्ये.

एखाद्याकडं  बघून त्याच्या आयुष्यात नेमकं काय चाललंय याचा अंदाज लावणं फार अवघड असतं. सतत हसणारी आणि हसवणारी व्यक्ती आनंदी, उत्तम दिसणारी आणि राहणारी व्यक्ती सुंदर किंवा अतिशय हुशार आणि बुद्धिमान म्हणजे आयुष्यात यशस्वी असं वरवर जरी वाटत असलं, तरी प्रत्येकाचा स्ट्रगल आपल्याला कळतोच असं म्हणणं अतिशयोक्ती ठरेल. एखाद्याच्या वाढलेल्या वजनाबद्दल त्या व्यक्तीला काहीच वाटत नाही किंवा त्यानं ते कमी करण्याचा कोणताही विचार केला नाही, असं सरधोपटपणे ठरवणं चुकीचं आहे. ''एवढंच सगळं कळत होतं, तर वजन वाढूच का दिलं'' या प्रश्नालाही फारसा अर्थ नाही. कारण प्रत्येकाच्या गोष्टीचा तो भाग कदाचित आपल्याला अजूनही माहिती नाही. त्यामुळं एखाद्याच्या वजन कमी करण्याच्या आणि हेल्दी राहण्याच्या प्रयत्नांना त्याच्या दिसण्यावरून जज करण्यापेक्षा, समजून घेणं जास्त सोयीचं.

ब्रिटनीच्या प्रवासातली एक गोष्ट मात्र महत्त्वाची, ती म्हणजे आयुष्यातला मोठा बदल अनुभवायचा असेल, तर त्या प्रवासासाठी, रादर स्वतःसाठी छोटे छोटे गोल्स ठरवून घेणं. मॅरेथॉनमध्ये धावण्याची स्वप्नं बघताना, रोज ठराविक अंतर पळणारी, त्यात सातत्यानं वाढ करत राहणारी, योग्य आहारावर लक्ष देणारी ब्रिटनी रोज आपल्याला याच छोट्या गोल्सची आठवण करून देत राहते. वाढलेल्या वजनामुळं एका वेगळ्याच कोशात जगणारी ब्रिटनी, जेव्हा या कम्फर्ट-झोनमधून बाहेर पडायला सुरुवात करते, त्यावेळी प्रत्येक क्षणी तिचा स्वतःशी सुरू असणारा स्ट्रगल आपल्याला तिच्या प्रेमात पाडतो. मदत करणाऱ्या प्रत्येकाला आपली दया येते ही इनसिक्युरिटी  असणारी, प्रेम-रिलेशनशिप्स आपल्यासाठी नाहीतच हे स्वतःशी पक्कं ठरवून टाकलेली आणि इतरांच्या आयुष्यात फक्त टाइमपास म्हणून उरलेली ब्रिटनी, माझ्यासारख्या अनेकींचं प्रतिनिधित्व करते आणि कदाचित म्हणूनच ती आपलीशी वाटते. वजन थोडं कमी झाल्यावर पुरुष मित्रांकडून मिळणारं अटेंशन, लोकांच्या नजरेत नसणारी सहानुभूती पाहून ''कित्येक दिवसांनी बाई होऊन  बरं वाटलं'' असं म्हणणारी ब्रिटनी आजही आपल्या डोक्यात असणारी बाईची ठराविक व्याख्या आपल्यासमोर मांडते आणि आपल्याला भानावर आणते. त्यामुळं इतरांसाठी नाही, तर स्वतःसाठी स्वतःला बदलणाऱ्या ब्रिटनीचा, एक ब्लॉक ते जवळपास ४३ किलोमीटर हा अशक्य वाटणारा प्रवास एकदा तरी अनुभवावा असाच!

संबंधित बातम्या