‘बुलबुल’ 

प्राजक्ता कुंभार 
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

वेब ओरिजिनल्स

जून महिन्यात ‘द हिंदू’ने एक रिपोर्ट पब्लिश केला होता, ‘डोमेस्टिक वायलन्स’बद्दलचा. कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झालं आणि याच मार्च ते मे महिन्याच्या ६८ दिवसांच्या कालावधीत जवळपास दीड हजार तक्रारी दाखल झाल्या. या सगळ्या तक्रारी होत्या, घरगुती हिंसाचाराच्या. गेल्या दहा वर्षांतील मार्च ते मे या कालावधीतील तक्रारींपेक्षा यावर्षीचा, लॉकडाऊनमधला हा आकडा मोठा आहे. हा रिपोर्ट लिहिणाऱ्या एक्सपर्टसच्या मते, हा आकडा म्हणजे फक्त ‘टीप ऑफ आईसबर्ग’ - हिमनगाचा छोटासा भाग आहे. कारण भारतातल्या जवळपास ७७ टक्के महिला घरगुती हिंसाचाराचे प्रसंग स्वतःपुरते ठेवतात, त्याबद्दल कोणाला सांगत नाहीत. देश बदलतोय, महिलांचं सक्षमीकरण होतंय, झालंच तर प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीनं स्त्रियांना स्थान आहे, हे असे विचार रोजचेच झालेले असताना, असा एखादा रिपोर्ट मेंदूला सुन्न करून जातो.  

बायकांनी काय आणि कसं वागावं, त्यांनी कोणत्या मर्यादेत राहावं याबद्दलच्या चौकटी आपल्याला फारशा नव्या नाहीत. अगदी पुराणापासून चालत आलेल्या, अनेक गोष्टींचे दाखले देऊन बायकांभोवती ‘लक्ष्मणरेषा’ आखणारे आजही अनेक आहेत. समजून घे - सहन कर - एवढं तर चालायचंच - हे तर प्रत्येक घरात घडतं... ही ‘अपेक्षित’ उत्तरं आजही अनेक ‘अनपेक्षित’ प्रश्नांवर तयार आहेत. पण कोणतीही चूक नसताना, स्वतःवर घडणाऱ्या अन्यायाविरुद्ध एखादी स्त्री अगदीच पेटून उठली तर? जन्माने बाई आहे, म्हणून तिनं सहन केलं पाहिजे ही चौकटच एखादीनं मोडायची ठरवली तर? नेटफ्लिक्स ओरिजिनलचा ‘बुलबुल’ हा चित्रपट हीच स्त्रीवादाची संकल्पना आपल्यासमोर मांडतो, ती पण एका सस्पेन्स थ्रिलर ट्विस्टमधून.  

ही गोष्ट आहे बुलबुलची. स्वातंत्र्यपूर्व काळातली, सन १८१८ ची. पाच-सहा वर्षांच्या छोट्या बुलबुलचं लग्न होतं आणि हवेलीची ‘बडी बहू’ - ‘ठकुराइन’ होऊन ती ठाकूर हवेलीत प्रवेश करते. तिच्यापेक्षा वयानं खूपच मोठ्या असणाऱ्या नवऱ्यापेक्षा, समवयीन असणाऱ्या छोट्या दीराबरोबर, ‘सत्या’बरोबर तिची गट्टी जमते. वर्षं सरतात आणि तारुण्यात प्रवेश केलेल्या सत्या आणि बुलबुलची निरागस मैत्री घरच्यांच्या नजरेत यायला सुरुवात होते. या दोघांना वेगळं करण्यासाठी सत्याला लंडनला पाठविण्याचा घाट घातला जातो आणि या दोघांमध्ये नक्कीच मैत्रीपलीकडं काहीतरी होतं, या केवळ आणि केवळ संशयातून बुलबुलला तिच्या नवऱ्याकडून अशक्य मारहाण होते. पाय मोडलेले, अंगात त्राण नाही, वेदना सहन करायची ताकद नाही अशा अस्वस्थेत पडलेल्या बुलबुलवर तिचा मोठा वेडसर दीर बलात्कार करतो आणि बुलबुलमधली निरागसता एका क्षणात संपते. पुढं बुलबुलच्या आयुष्यात काय होतं, ती नेमका कोणता निर्णय घेते, हा निर्णय फक्त तिच्यापुरता असतो, की इतरांसाठीही? या उत्तरांसाठी हा चित्रपट बघायला हवा. वरवर नेहमीचीच वाटणारी ही गोष्ट वेगळी ठरते ते बॅकग्राऊंडला सुरू असणाऱ्या सिरीयल मर्डर मिस्ट्रीमुळं. 

हा चित्रपट पाहताना आजही काही फारशी वेगळी अवस्था नाही हे प्रत्येक मोमेंटला - क्षणाला जाणवत राहतं. ‘एका स्त्रीच्या आयुष्यात तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त खासगी इतर कोणती गोष्ट असू शकते?’ असा प्रश्न विचारणारा इंद्रनील, आजही कितीतरी पुरुषांचं प्रतिनिधित्व करतो. आपल्या बायकोनं फक्त आणि फक्त आपल्याशी प्रामाणिक असावं, तिच्या प्रत्येक निर्णयाबद्दल आपल्याला माहिती असावं, आपल्याशिवाय तिच्या आयुष्यात इतर कोणी महत्त्वाचं असू नये, तिला तिच्या स्पेसची काय गरज असा विचार असणारे अनेक इंद्रनील आजही आहेतच की आपल्या आसपास! ‘बडी हवेली के राज भी बडे होते है।’ हे सांगणाऱ्या बुलबुलच्या जावेचा, विनोदिनीचा मोनोलॉगही मेंदूला झिणझिण्या आणतो. बलात्कार झालेल्या बुलबुलच्या पायावरचे रक्ताचे ओघळ पुसत, कोणाला काही सांगू नको हे सुचवत आणि स्वतःच्या नवऱ्याला वाचवायचा प्रयत्न करत बोलणारी विनोदिनी ही ‘सहन करू, कशाला कुठं बोलायचं’ हा विचार करणाऱ्या अनेक जणींसाठी मोठं प्रश्‍नचिन्हच उभं करते. लहानपणापासूनचा मित्र सत्या, जेव्हा लंडनवरून परत येऊन, बुलबुलच्याच चारित्र्यावर संशय घेऊ पाहतो, त्यावेळी ‘तुम्ही सगळे सारखेच आहात’ असं उद्विग्नतेनं म्हणणारी बुलबुल आजचीच वाटते. आजही काही बिनसलं, काही कानावर आलं की चूक बाईचीच असेल या निष्कर्षाला पोचायला फारसा वेळ लागतोच कुठं आपल्याला! 

एकीकडं २१ व्या शतकाच्या गप्पा सुरू असताना, या १८ व्या शतकात घडलेल्या गोष्टीतले अनेक प्रसंग आजच्याच काळातले वाटतात याबद्दल नेमकं काय वाटायला हवं, हे चित्रपट संपला तरी उमजत नाही. खूप दिवसांनी एखाद्या चित्रपटातले प्रसंग बघून अस्वस्थ वाटलं आणि मेंदू क्षणभर का असेना सुन्न झाला. अनेकांना ही गोष्ट स्टिरीओटायपिक वाटेल, अनेकांना यातला मर्डर मिस्ट्रीचा ट्विस्ट गम्मतशीरही वाटू शकेल, पण हा चित्रपट आवर्जून अनुभवायला हवा, ते आपल्या विचाराच्या स्थित्यंतरासाठी. सगळं आलबेल आहे, महिला सक्षमीकरण जोशात सुरू आहे, बायकांना तर काय सगळ्याच सवलती मिळतात असं वाटतंय? मग ही बुलबुलची गोष्ट नक्कीच बघा!

संबंधित बातम्या