‘गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल’ 

प्राजक्ता कुंभार 
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

वेब ओरिजिनल्स

बाप.. कोणत्याही मुलीच्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा माणूस. तिच्या आसपास वावरणारा, त्याच्या वागण्या-चालण्या-बोलण्यातून तिला जगाची ओळख करून देणारा, तिला स्वतःच्या खांद्यावर बसवून आजूबाजूची रंगीबेरंगी दुनिया दाखवणारा, तिच्या इवल्याशा बाळमुठीत आख्खे आकाश आणून देणारा जादूगार...!  तिचा रडवेला चेहरा बघून कासावीस होणारा, तिच्यावर लक्ष ठेवणारा पण तिला धडपडू-अडखळू देणारा, तिच्यावर कोणतीही बंधने न लादणारा, ‘तुला हवे ते तू करू शकतेस’ हे सतत स्वतःच्या कृतीतून पटवून देणारा कोणीतरी..! 

‘बाबा’ हा विषयच मुळात सॉफ्ट कॉर्नर असणारा. त्याच्याशी भांडण होऊदे  किंवा अगदीच जीवनमरणाचा प्रश्न असल्यासारखे मतभेद, आयुष्यात बाप हवाच... तो लागतोच! बाप ही एक वेगळीच सपोर्ट सिस्टीम असते मुलींसाठी. तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे जगू देणारा, हव्या त्या फिल्ड मध्ये करिअर करू देणारा, लग्न-संसार-सेटल होणं या सगळ्या रुटीनपेक्षा तुमच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची जास्त काळजी असणारा आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे तुमचे नको तितके लाड आणि हट्ट पुरवणारा ‘बाबा’ मुलीच्या आयुष्यात ‘सुपर हिरो’ असतो. त्यामुळेच नेटफ्लिक्स ओरिजिनलचा ‘गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल’ हा चित्रपट जरी गुंजन सक्सेना या एअर फोर्समधल्या पहिल्या महिला पायलटची गोष्ट सांगत असेल, तरी माझ्यासाठी ही गोष्ट आहे ती गुंजन आणि तिच्या बाबाची, त्यांच्या नात्याची, त्यांच्यातल्या अगदी स्पेशल बॉण्डिंगची. 

कारगिल युद्धाची पार्श्वभूमी. पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आणि अडकलेल्या भारतीय जवानांना बेसवर सुरक्षित घेऊन यायचेय. एअर फोर्सचे बाकीचे पायलट इतर मिशनवर अडकलेत, बेसवर फक्त त्यांचा लीडर आणि एक महिला पायलट आहे. खरेतर एअर फोर्समध्ये ट्रेनिंग सुरू झाल्यापासूनच तिचे ‘बाई’ असणे सगळ्यांच्याच नजरेत खुपतेय. आर्मीला पुरुष कमी पडतात का, म्हणून आता त्यांनी बायकांना घ्यायला सुरुवात केली, अशी टीका होतेय तिच्यामुळे. युद्धभूमीवर तिच्या सुरक्षिततेच्या मुद्द्याला नॅशनल न्यूज केलेय. ‘तिला जमणार नाही’ याची खात्रीच जणू तिच्या आजूबाजूच्या प्रत्येक पुरुषाला आहे. पण आता दुसरा कोणताच पर्याय नाही म्हणून तिला बॅकअप चॉपर उडवण्यासाठी सोबत घेतले जाते. प्रत्यक्ष रेस्क्यू मिशनवर गेल्यावर मात्र, मुख्य चॉपर पाकिस्तानी हल्ल्यात कोसळते, आणि जिला ‘तू निघ, परत ये तिथून, तुमसे ना हो पायेगा’ अशी ऑर्डर बेसकॅम्पवरूनच  देण्यात येते, ती गुंजन सक्सेना फक्त आपल्या सहकाऱ्यांचे प्राण वाचवत नाही, तर त्यांना सुरक्षित बेसकॅम्पवर घेऊन येते... रेस्ट इज द हिस्टरी! 

गोष्ट आपल्याला माहिती असणारी. वर्तमानपत्र, पुस्तके, गुगल - विकिपीडिया सगळीकडेच उपलब्ध असणारी. पहिली महिला पायलट होऊन इतिहास रचणारी गुंजन शर्मा, तिच्या या एका कृतीने शेकडो महिलांसाठी ‘इंडियन एअर फोर्स’ हे फक्त स्वप्न उरले नाही..! पण हा प्रवास जितका तिचा, खरेतर त्याहून खूप जास्त तिच्या वडिलांचा..! लहानपणापासून ‘मला पायलट व्हायचे’ हे एकच स्वप्न (इतरांच्या मते खूळ) डोक्यात असणाऱ्या गुंजनच्या स्वप्नाला आकार देणारे तिचे बाबा या गोष्टीचे खरे हिरो! 

मुली प्लेन उडवत नाहीत, असे सांगणाऱ्या गुंजनच्या भावाला ‘मुर्गा’ बनवणारे आणि प्लेन को पायलट उडाता, मुलगी असो वा मुलगा, त्याला पायलटच म्हणतात असे लहानग्या गुंजूला सांगणारे तिचे बाबा खऱ्या अर्थाने तिचे स्वप्न स्वतः जगतात. प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशनची फी देणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर, स्वतः आपल्या मुलीला एअरफोर्सचा पर्याय शोधून देणारा, तिचा फॉर्म स्वतः भरून टाकणारा तिचा हा बाप वेगळाच अवलिया वाटतो. हा चित्रपट बघताना मी सगळ्यात जास्त गुंतले ते गुंजन आणि तिच्या बाबांच्या संवादांमध्ये. ट्रेनिंगमधल्या सहकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून, सुटी टाकून घरी आलेल्या आणि आता मी लग्न करून सेटल होते, असे म्हणणाऱ्या गुंजनला, ‘प्लेन छोड के मेरी बेटी पराठे बनाने की बात कर रही है।’ असे अगतिकपणे समजावणारा बाप मिळायला भाग्यच लागते. 

प्रत्येक मुलगी आपल्या बाबाकडे बघून, त्याच्या सहवासात राहून तिच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पुरुषाला जज करत असते. तिचा बाबा हा बेंचमार्क असतो दुनियेसाठी! बाकी जग काही म्हणो, ‘बाबा’चे मत काय, त्याला काय वाटते हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्ट असते तिच्या आयुष्यात. त्यामुळे तिच्या वेडगळ स्वप्नाला, तितक्याच ताकदीच्या वेडेपणाने साथ देणारा बाप ही केमिस्ट्रीच अलग आहे. काही चित्रपट हे अभिनय, कथा-पटकथा, संवाद या सगळ्या पातळीवर ठीकठाक असले तरी एखाद्या ‘एक्स फॅक्टर’मुळे ते आपल्या फेव्हरेट लिस्टचा पार्ट होऊन जातात. ‘गुंजन सक्सेना’मध्ये हा एक्स फॅक्टर आहे, ते या बाप-लेकीचे आपल्यातलेच वाटणारे बॉण्डिंग..! त्यामुळे दोन तास त्यांच्या या विश्वात रमून जाणे मिस करून चालणार नाही.

संबंधित बातम्या