‘फील द बीट’ 

प्राजक्ता कुंभार 
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

वेब ओरिजिनल्स

माणूस जगतो ते नेमकं कशाच्या भरवशावर? एका ठराविक काळानंतर रुटीन होत जाणारं आयुष्य आपल्याला कंटाळवाणं किंवा बोअर का नाही होत? आणि समजा झालं, तरी आपण जगणं थांबवत नाही, ते कशामुळं? बरं.. यात आला दिवस ढकलला असं लॉजिकही काही प्रत्येकाचं नसतं, मग तरीही रोज जवळपास एकसारख्याच प्रकारे उगवणाऱ्या आणि शक्यतो त्याच त्या प्रकारे मावळणाऱ्या दिवसात काहीतरी नवं, वेगळं करण्याची उर्मी येते कुठून? माझ्यासाठी तरी या प्रश्नाचं एकच उत्तर आहे... 

माणूस जगतो ते त्यानं पाहिलेल्या, फक्त त्याच्या म्हणून असणाऱ्या स्वप्नांच्या भरवशावर. आयुष्यात काहीतरी अचीव्ह करण्याचं, स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायचं किंवा अगदीच स्वतःच्या मनाप्रमाणं जगण्याचं स्वप्न..! मग या स्वप्नाला इच्छा म्हणा, जिद्द म्हणा किंवा महत्त्वाकांक्षा.. हवं तसं डिफाइन करा..! पण आपण जगतो ते याच्याच भरवशावर..! आणि आपली स्वप्नंही जवळपास सारखीच असतात, म्हणजे त्यांचे डिटेल्स, ती अचीव्ह करण्याचा आपला वे फॉरवर्ड या गोष्टी जरी समांतर असल्या तरी त्यांचे रिझल्ट्स मात्र कुठं तरी एकत्र येतातच. ‘फील द बीट’ हा नेटफ्लिक्स ओरिजिनल चित्रपट अशीच स्वप्नांची गोष्ट आपल्यापुढं मांडतो. कथानक म्हणून आपल्या अगदीच परिचयाची आणि प्रेडिक्टिबल असणारी ही गोष्ट वेगळी ठरते ती तिच्या फ्रेश मांडणीमुळं. 

एप्रिल..! न्यू होप नावाच्या छोट्याशा गावातून एक यशस्वी ब्रॉडवे डान्सर होण्याचं स्वप्न बघत न्यूयॉर्कमध्ये दाखल झालेली विशीतली तरुणी. तिनं फक्त ब्रॉडवे डान्सर होण्याचं स्वप्नं बघितलं नाही, तर त्यासाठी लागणारी कमिटमेंट, फोकस आणि हार्डवर्क असं सगळंच तिच्याकडं आहे. पण गोष्टी चुकत जातात आणि एका मोठ्या शोच्या फायनलमध्ये पोचूनही, त्या राऊंडच्या जजबरोबर नकळत घेतलेल्या पंग्यामुळं तिचं सिलेक्शन होत नाही, उलट तिला न्यूयॉर्कच्या डान्स लिस्टमध्ये ब्लॅकलिस्ट केलं जातं. हातात काहीच न उरल्यानं आपल्या छोट्याशा गावी परत जाण्याखेरीज दुसरा कोणता मार्ग एप्रिलसमोर उरतं नाही. मात्र गावी परतल्यावर तिच्यासमोर खुला होतो एक पर्याय, ‘डान्स डान्स डान्स डान्स कॉम्पिटिशनचा’! ज्यामुळं तिला न्यूयॉर्कमध्ये जाऊन तिचं स्वप्न पूर्ण करणं कदाचित शक्य होऊ शकणार असतं. मात्र त्यासाठी अजिबातच डान्स न येणाऱ्या, आठ प्रकारच्या आठ तऱ्हा असणाऱ्या आठ चिल्ल्यापिल्ल्यांना डान्स शिकवण्याचं आव्हान तिच्यासमोर उभं ठाकतं. या आठ जणांना सांभाळत, त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींची वर्तुळं पूर्ण करत एप्रिल तिचं हे स्वप्न कसं पूर्ण करते हे या चित्रपटातच अनुभवायला हवं. 

स्वतः स्वतःची स्वप्न बघणं, ती पूर्ण होण्यासाठी मेहनत करणं हे जरा जास्त सोपं आहे. कारण यात फक्त तुमचे तुम्ही इन्व्हॉल्व्ह असता. निराशा आली, आनंद वाटला तरी ते फक्त तुमच्यापुरतं मर्यादित असतं. पण सोबतीला काही जण घेऊन, तेच स्वप्न पूर्ण करणं कितपत सोपं असेल? सोबत असणाऱ्या प्रत्येकाची मर्जी सांभाळून, सर्वांना एकाच प्रकारची मेहनत करायला लावणं आणि फक्त कोणा एकाबरोबर सूर जुळू न देता प्रत्येकाबरोबर एकाच लेव्हलची अटॅचमेंट ठेवणं आपल्यापैकी किती जणांना जमत असेल?

बेस्ट इंडिव्हिज्युअल प्लेयर असणारी एप्रिल जेव्हा या टीम ड्रीमच्या प्रकारात शिरते, त्यावेळी टीमबरोबर जुळवून घेणं तिलाही फारसं सोपं जात नाही. खरंतर स्वतःला न्यूयॉर्कमध्ये पुन्हा ओळख मिळावी हा एकच उद्देश डोळ्यासमोर असणाऱ्या एप्रिलला या डान्स स्पर्धेचं किंवा या आठ छोट्या मुलींच्या छोट्या स्वप्नांचं काही कौतुक नसतं. त्यांची स्वप्नं ही तिच्यासाठी तिच्या बिग ड्रीमकडं पोचण्याची फक्त एक पायरी असतात. पण या मुलींबरोबर राहताना, त्यांना डान्स शिकवताना ती त्यांच्यातलीच एक होऊन जाते. त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी त्यांच्याइतकीच इन्व्हॉल्व्ह होते. 

बहुतांश परिकथेसारखीच वाटणारी ही गोष्ट वेगळी ठरते ती यातल्या अनेक छोटी छोट्या गोष्टींमुळं. कॅरी आणि सारा, ग्रुपमधल्या वयानं तेवढ्या मोठ्या असणाऱ्या या दोघींचा इंडिव्हिज्युअल स्ट्रगल असूदे, किंवा ऐकू-बोलू न शकणाऱ्या चिमुरडीचं डान्स करण्यामागचं ‘आय फील द बीट’ हे उत्तर, हा फ्रेशनेस या चित्रपटाला आपल्या डोक्यात रेंगाळत ठेवतो. 

आयुष्याचं तत्त्वज्ञान बोजड आणि अवघड शब्दांत उलगडून दाखवणारे अनेक चित्रपट असतात आणि ते बघून आपण अनेकदा भारावूनही जातो. पण तेच आयुष्य, तोच संघर्ष आणि तेच तत्त्वज्ञान हलक्या फुलक्या आणि मजेशीर पद्धतीनं, शक्य तिथं चेहऱ्यावर हसू आणत सांगणारा हा चित्रपट किमान एकदा ‘फील’ करायला हवा.

संबंधित बातम्या