सुन्न करणारे ते सहा दिवस 

समृद्धी धायगुडे
सोमवार, 29 एप्रिल 2019

वेबवॉच
 

राजधानी दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ या दिवशी एका २३ वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. या घटनेत दिल्ली पोलिसांचे दुर्लक्षित राहिलेले योगदान दिल्ली क्राइम या वेबसीरिजच्या निमित्ताने पाहायला मिळते. 

निर्भया प्रकरणाचा कसून तपास करणाऱ्या पोलिस आधिकाऱ्यांच्या नजरेतून ही सीरिज चित्रित केली आहे. लेखक/दिग्दर्शक रिची मेहता यांनी हे प्रकरण इतके संवेदनशील असतानादेखील नेमकेपणाने मांडले आहे. हे प्रकरण माध्यमांनी दाखवले त्यापेक्षा किती भयानक होते, याची जाणीव ही सीरिज बघताना होते. याची सुरुवात दिल्लीतील एका महामार्गावर होते. रस्त्याच्या बाजूला एक मुलगा (आकाश) आणि गंभीर जखमी मुलगी (दीपिका) नग्नावस्थेत असतात. गस्तीवर असलेल्या पोलिसांना फोन आल्यानंतर पुढची कार्यवाही होते. वेबसीरिजची नायिका दक्षिण दिल्लीची डीसीपी वर्तिका चतुर्वेदी (शेफाली शहा) माहिती मिळताच रुग्णालयात तातडीने हजर होते. दीपिकाला पाहिल्यानंतर तिच्यासोबत झालेल्या क्रौर्याची तिला जाणीव होते. लगेच आपली टीम बोलावून ती पुढच्या चौकशीला सुरुवात करते. या प्रकरणातील दुसरा आणि महत्त्वाचा साक्षीदार म्हणजे त्या तरुणीबरोबर असलेला तिचा मित्र आकाश (संजय बिष्णोई). या दोघांच्या पालकांना बोलावून त्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली जाते. आरोपी ताब्यात येईपर्यंत पोलिस ठाण्यातच ठाण मांडणारी वार्तिका पाहताना अतिरेक वाटत नाही. तिने तपास संपेपर्यंत कोणालाही घरी न जाण्याची ताकीद दिलेली असते. 

पोलिसांना त्यांच्या कार्यपद्धतीवरून नेहमीच टीका सहन करावी लागते. पोलिसांची घरी आणि कामाच्या ठिकाणी होणारी तारांबळ दिग्दर्शकाने नेमकी टिपली आहे. या कसरतीमधून कोणीही महिला किंवा पुरुष अधिकारी, कॉन्स्टेबल, नव्याने रुजू झालेली तरुण अधिकारी, अगदी डीसीपी वर्तिकासुद्धा सुटलेली नाही. वर्तिका पहिल्या भागापासून आपल्या मुलीला देशाबाहेर शिक्षणासाठी जाण्यापासून रोखत असते. ही मुलगी यशस्विनी दायमा (चांदनी/चंदू) प्रसंगी इंडिया गेटजवळ पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करतानाही दिसते. आधी आईविषयी थोडा आकस, मग आईच्या कामाविषयी अभिमान; तरीही परदेशात जाण्यावर ठाम, अशी तिची वयाप्रमाणे द्विधा मनःस्थिती दाखवली आहे. वर्तिका तिचे मतपरिवर्तन करण्यासाठी पूर्ण प्रयत्नांनीशी ही केस आणि त्यातील आरोपींना पकडण्यासाठी इरेला पेटते. यासाठी तिची टीम घरदार सोडून चार-चार दिवस राजस्थान, बिहार, गुडगाव (सध्याचे गुरुग्राम), काही नक्षली भाग येथे जाऊन आरोपींना ताब्यात घेतात.

या घटनेने प्रशासनाची, समाजाची कशी प्रतिक्रिया उमटते हेदेखील वास्तवाचे प्रतिबिंब वाटते. या प्रकरणाची खुमखुमी माध्यमांना लागल्यानंतर एनजीओवाले कॉर्पोरेट लूकमध्ये येऊन पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित करतात. काही आळशी अधिकारीदेखील दाखवले आहेत. हा आळशीपणा सीरिजच्या पहिल्या भागातच, किंबहुना घटनेची माहिती मिळाल्यापासून आरोपी पकडेपर्यंत अधून-मधून दिसतो. मुख्यमंत्री सगळा दोष पोलिसांवर ढकलण्यासाठीच पूर्ण तयारी करून बसतो. 

या वेबसीरिजमधील आणखी एक विरोधाभास म्हणजे दिवसरात्र आपली मुलगी बरी व्हावी यासाठी रुग्णालयात बसणारे दीपिकाचे आईवडील, तपास अधिकारी आणि एकीकडे मुख्य साक्षीदार संजय बिष्णोई आणि त्याचे काका कुंदन नेगी हे प्रसारमाध्यमांसमोर जायला उतावळे झालेले दाखवले आहेत. मुख्य गुन्हेगाराला ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणातील प्रत्यक्ष घडलेल्या क्रूर कृत्याची कल्पना येते. ही सीरिज बघणाऱ्यांना खरा झटका तेव्हा बसतो. यातून दिग्दर्शकाची प्रगल्भता दिसते. कोणता प्रसंग चित्रित करायचा आणि कोणत्या प्रसंगाला संवादातून मोठे करायचे, हे अगदी अचूक जमले आहे. आणखी एक गोष्ट नमूद करण्यासारखी म्हणजे, यातील अल्पवयीन गुन्हेगार पकडल्यानंतर विमला भारद्वाज (जया भट्टाचार्य) त्याचे वय ओळखून आपल्या कर्तव्याला जागते. हीच विमला भारद्वाज जेव्हा चौथ्या आरोपीला ताब्यात घेते, तेव्हा तो त्याच्या आईने आत्महत्या केली असेल म्हणून भेदरलेला असतो. त्याची ही अवस्था बघून ती थेट फोन लावून त्याचे मानसिक द्वंद्व थांबवते. म्हणजे आरोपींबाबतसुद्धा कशी वेगवेगळी भूमिका घ्यावी लागते, हे खूप चांगल्या प्रकारे दाखवले आहे. 

या वेबसीरिजमधील शेफाली शाह (वर्तिका चतुर्वेदी), अभिलाषा सिंग (दीपिका), इन्स्पेक्‍टर भूपेंद्र सिंग (राजेश तेलंग), रसिका दुगल (नीती सिंग), सब इन्स्पेक्‍टर जयराज सिंग (अनुराग अरोरा), सब इन्स्पेक्‍टर विमला भारद्वाज (जया भट्टाचार्य), एसएचओ विनोद तिवारी (विनोद शारस्वत), यशस्विनी दायमा (चांदनी/ चंदू), स्वाती भाटिया (इरा), आदिल हुसेन (कुमार विजय), डेंझिल स्मिथ (विशाल चतुर्वेदी), शोभना भारद्वाज (किरण), गौरव राणा (एसएचओ राकेश वर्मा), अमिताभ आचार्य (सब इन्स्पेक्‍टर अशोक शर्मा), रामजी बाली (सब इन्स्पेक्‍टर प्रकाश शुक्‍ला), विपिन कात्याल (अरिफ पोलिस ऑफिसर), जैती खेरा (डॉ. टिना भूतानी) यांनी आपली भूमिका उत्तम वठवली आहे. यात एक गोष्ट नमूद करण्यासारखी म्हणजे यात दाखवलेली दीपिकाची साक्ष. ती घेताना महिला न्यायाधीशांच्या भूमिकेतील गायत्री शर्मा डोळ्यांनी जे व्यक्त होते ते प्रचंड भावते. सरसकट पोलिसांना एकाच नजरेतून बघणाऱ्या नेटिझन्सनी आणि फक्त सोशल मीडियावर पाठिंबा देणाऱ्यांनी ही वेबसीरिज जरूर पाहावी. कदाचित त्यांची दृष्टी बदलेल.  
रेटिंग : 

संबंधित बातम्या