कौशिकीचा उत्कंठावर्धक प्रवास

समृद्धी धायगुडे
सोमवार, 13 मे 2019

वेबवॉच
 

वेबसीरिजच्या लोकप्रिय विषयांमध्ये गुन्हेगारी, सेक्‍स आणि कौटुंबिक अडचणी हे विषय ठरलेले असतात. Viu.com वरील ‘कौशिकी’ ही वेबसीरिजही त्याला अपवाद नाही. पण या वेबसीरिजची मांडणी शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवते. वेबसीरिजचे नावच नायिकेचे आहे. कौशिकी म्हणजे हिंदू संस्कृतीतील दुर्गा मातेचे एक नाव. कौशिकी या तरुणीच्या मित्रमैत्रिणींच्या गूढ रहस्यांबाबत ही वेबसीरिज आहे. या वेबसीरिजची कथा मजबूत असल्याने विद्या बालनच्या कहानी चित्रपटासारखे शेवटपर्यंत प्रेक्षकांना एक एक धक्के बसत राहतात. अहमदाबाद, गोवा या शहरांत ही वेबसीरिज घडते.

कौशिकीच्या मित्रांपैकी अंकुश ऊर्फ मॅगी (ओंकार कपूर) हा ‘बडे बाप का बिगडा हुआ बेटा’ आणि त्याचे चमत्कारिक मित्र, मैत्रिणी एक मुखवटा घेऊन वावरत असतात. पहिल्या काही भागांत घडणाऱ्या घटनांवरून त्यांचा मुखवटा दिसतो. याच मुखवट्यामागचा चेहरा कौशिकीला (सयानी गुप्ता) दिसतो. यामुळे ती त्यांच्या ग्रुपमध्ये अचानक आल्यानंतर त्यांच्या आयुष्यात होणारी उलथापालथ शेवटी कौशिकीच्या जिवावर कशी उठते, हा सर्व घटनाक्रम थोडा फ्लॅशबॅक आणि थोडा नॅरेटिव्हमध्ये दाखवला आहे. सहाव्या, सातव्या भागानंतर पोलिसांचा प्रवेश, त्यानंतर होणाऱ्या नाट्यमय घडामोडी आपल्याला वेगळ्याच वळणावर घेऊन जातात. हाय प्रोफाइल गुन्हेगारी प्रकरणात पोलिस म्हणून एसीपी समरवर (रणविजय सिंग) येणारा तणाव तो किती सहजतेने आणि कसा हाताळतो, या प्रश्‍नाचे उत्तर शेवटच्या दोन भागांत मिळते. स्वतःची काळी बाजू उघड होण्याच्या भीतीने मुख्य पात्रे अंकुश पटेल ऊर्फ मॅगी, आदिती (श्रुती श्रीवास्तव), डिके (नमीत दास), मृत्युंजय (राजीव सिद्धार्थ), निकिता (मधुरीमा रॉय) कोणत्या थराला जातात, त्यासाठी त्यांच्या मनात कणभरही अपराधीपणाची भावना नसते, हे आजच्या श्रीमंत घरातील बिघडलेल्या तरुणाईचे वास्तव दिग्दर्शक सुपर्ण वर्माने नेमके मांडले आहे. अतिश्रीमंतीचा परिणाम म्हणजे सुख बोचते, तशी यातील मॅगी या पात्राची अवस्था आहे. वडिलांचा व्यवसाय सांभाळायचा नाही म्हणून वाममार्गाला लागणारा मॅगी कधी खाईत लोटला जातो, हे त्याचे त्याला समजत नाही. हीच अवस्था त्याच्या प्रत्येक मित्राची आहे. पोलिस तपासात एसीपी समरला या सर्वांची गुंतागुंत असलेली रहस्ये समजतात आणि त्याप्रमाणे तो पुढे कारवाई करतो. शेवटच्या दोन भागांमध्ये प्रेक्षकांना बसणारे झटके, हे त्या मित्रांच्या रहस्यांपेक्षा जबरदस्त आहेत. तुम्हाला उत्कंठावर्धक स्वरूपाच्या वेबसीरिज पाहण्यात रस असेल, तर ही वेबसीरिज जरूर पाहा. 

यातील कौशिकीच्या भूमिकेतील सयानी गुप्ता यापूर्वी अमेझॉन प्राईमवरील फोर मोअर शॉट्‌समध्ये आयर्न मॅन मिलिंद सोमण आणि प्रतीक बब्बरबरोबर, तसेच जॉली एलएलबी, बार बार देखो यामध्ये दिसली होती. शिवाय इतर पात्रे निभावणारे कलाकारदेखील वेबविश्वातील, बॉलिवूडपटातली चांगले अभिनेते आहेत. या वेबसीरिजमध्ये मराठी प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज कलाकार आहे, ती म्हणजे किशोरी शहाणे-वीज. रिॲलिटी शोच्या निवेदनासाठी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला रणविजय सिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. जाता जाता हा कुल ॲटिट्यूड असलेला पोलिस अधिकारी भाव खाऊन जातो. 
एकंदरीतच गूढ रहस्यकथा किंवा चित्रपट बघणाऱ्यांना ही वेबसीरिज निश्‍चित आवडेल. या वेबसीरिजची दुसरी जमेची बाजू म्हणजे शंतनू श्रीवास्तव यांचे लेखन खरेच आपल्याला चकित करणारे आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे viu.com हे नवीन संकेतस्थळ असल्याने त्यावरील वेबसीरिज मोफत आहेत.

रेटिंग : 4/5

संबंधित बातम्या