निरपराध तरुणाचा संघर्ष 

समृद्धी धायगुडे
सोमवार, 17 जून 2019

वेबवॉच
 

हॉट स्टार ॲपवरील ‘क्रिमिनल जस्टिस’ ही वेबसीरिज सध्या लोकप्रिय होत आहे. बॉलिवूड दिग्दर्शक तिगमांशू धुलियाने इंग्लंडमध्ये गाजलेल्या ‘क्रिमिनल जस्टिस’ या मालिकेची ही पुनर्निमिती केली आहे. इतर भाषेतील कोणत्याही कलाकृती आपल्या स्थानिक भाषेत करताना भरपूर मेहनत घ्यावी लागते. मूळ मालिका इंग्लंडमध्ये २००८ मध्ये प्रदर्शित झाली होती. त्यानंतर त्याची अमेरिकन पुनर्निमिती ‘द नाइट ऑफ’ या नावाने प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर आता पुन्हा मूळ नावाने ही मालिका लोकप्रिय होत आहे. यातील कलाकारदेखील काही नवे आणि काही कसलेले अभिनेते असल्याने स्टारकास्टची निवड परिपूर्ण वाटते. 

या वेबसीरिजची सुरुवात मध्यमवर्गीय होतकरू तरुण आदित्य शर्मा (विक्रांत मेसे) याच्या फुटबॉल सामन्यापासून होते. याचे वडील आणि बहिणीचा नवरा दोघे मिळून ऑनलाइन बुकिंगद्वारे उपलब्ध होणारी कॅब चालवत असतात. एका रात्री फुटबॉल सामन्यातील विजय साजरा करण्यासाठी आदित्य हीच कॅब घेऊन निघतो. वाटेत काही प्रवाशांना सेवाही पुरवतो. शेवटी प्रवासी स्वीकारणे बंद करण्याच्या वेळी त्याच्या कॅबमध्ये सनाया रथ (मधुरीमा रॉय) ही तरुण मुलगी जबरदस्तीने शिरते आणि पुढे तिच्यामुळेच आदित्यचे आयुष्य प्रचंड उध्वस्त होते.  

अतिश्रीमंत घरातील सावत्र मुलगी असलेली सनाया आदित्यच्या कॅबमध्ये बसल्यानंतर पूर्ण त्रासलेली असते. त्याचवेळी नेमकी ती काही वर्षांपूर्वी सोडलेल्या अमली पदार्थांचे सेवन करते आणि शेवटी घरी पोचते. या सगळ्या गोंधळात तिचा कॅबमध्ये विसरलेला मोबाईल परत देण्यासाठी आदित्य तिच्या घरी पुन्हा जातो. नेमका त्याचवेळी त्याचा घात होतो. सनाया त्याला मद्यपानाचा आग्रह करते, एक अघोरी खेळ खेळण्यास लावते. दोघे मद्यधुंद अवस्थेत असताना शरीरसंबंध येतो. आदित्यला रात्री उशिरा जाग येते, तेव्हा सनायाचा खून झालेला असतो. आदित्य भीतीपोटी तिचे घर सोडतो. त्याच गडबडीत त्याचा अपघात होतो आणि तो सहज पोलिसांच्या कचाट्यात सापडतो. अर्थातच आरोपी समोर असताना सर्व पुरावे त्याच्या विरुद्ध गोळा करून पोलिस चोर सोडून संन्याशाला फाशी या उक्तीप्रमाणे वागतात. त्याच्या सुटकेसाठी कुटुंबीय सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. ज्या कंपनीसाठी तो कॅब चालवत असतो, तेदेखील त्यांचा वकील आदित्यच्या मदतीसाठी देतात. आदित्य न केलेला गुन्हा कबूल करत नाही. न्यायालयीन कोठडी, पोलिस कोठडी, तुरुंग, न्यायालयातील युक्तिवाद या सर्व गोष्टी घडत जातात. पण हा प्रवास थोडा जास्त लांबवल्यासारखा वाटतो. आजकालच्या वेबसीरिजमध्ये अधोरेखित केले जाणारे सेक्‍स, मद्यपान, क्रौर्याची परिसीमा गाठणारे प्रसंग, शिव्या हे मुद्दे यामध्ये अगदी गरजेपुरते आहेत. त्यामुळे मालिकेतील समतोल आणि दिग्दर्शकाचे भान लक्षात येते. पापभीरू तरुण आणि त्याचे कुटुंब या घटनेनंतर समाजातील बदल, न्यायालयातील वास्तव, सतत पडणाऱ्या तारखा, बहिणीच्या नवऱ्याचे तऱ्हेवाईक वागणे हे दिग्दर्शकाने अगदी नेमके टिपले आहे. पोलिसांचा अनागोंदी कारभाराचा, न्यायालयातील वातावरणाचा सामान्य कुटुंबावर होणारा परिणाम दाखवताना दिग्दर्शक आणि कलाकार कुठेही कमी पडत नाहीत. एकाच वेळी विविध कंगोरे ताकदीने मांडताना ही केवळ एक वेबसीरिज ठरत नाही, तर परिपूर्ण कलाकृती होते. आदित्य तुरुंगात जातो, तेव्हा तुरुंगाच्या आतील आणि बाहेरील भेदक वास्तव बघताना हे जाणवते.

यासारख्या विषयांमध्ये विशेषतः न्यायालयीन प्रसंगांचे चित्रीकरण करताना कुठेही अतिरेक वाटत नाही. भावनिक प्रसंग उभारतानासुद्धा ते टिपिकल बॉलिवूडपटांसारखे वाटत नाहीत. या वैशिष्ट्यांमुळे ही वेबसीरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवते. या वेबसीरिजमधील दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कलाकारांची निवड. आवर्जून उल्लेख करण्यासारखा पंकज त्रिपाठी. येथे तो एक परिस्थितीने गांजलेला वकील माधव मिश्रा अगदी हुबेहूब साकारतो. दुसरा अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ, जो या वेबसीरिजच्या माध्यमातून प्रथमच वेबसीरिजच्या विश्‍वात पाऊल ठेवत आहे. तुरुंगातील दादा त्याने उत्तम साकारला आहे. विक्रांत मेसेनेदेखील बदलत्या परिस्थितीनुसार वागणारा आदित्य शर्मा छान उभा केला आहे. या वेबसीरिजमधील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे यात आदित्यच्या दोन महिला वकील. एक म्हणजे प्रचंड महत्त्वाकांक्षी मंदिरा माथूर (मिता वसिष्ठ) आणि दुसरी तिच्याकडे प्रशिक्षणार्थी असलेली निखत (अनुप्रिया गोएंका). या दोघी पूर्ण ताकदीनिशी आदित्यची बाजू न्यायालयात मांडताना दिसतात.

काही वेळा दिग्दर्शक एखाद्या मालिकेची पुन्हा निर्मिती करताना गडबडण्याची शक्‍यता असते, पण ही वेबसीरिज बघताना फारसे असे होत नाही. काही प्रसंग अतार्किक वाटतात. पण इतर जमेच्या गोष्टींमुळे साहजिकच त्याकडे प्रेक्षक म्हणून दुर्लक्ष होते. ही वेबसीरिज थोडी लांबली असली, तरी एकदा बघायला नक्कीच चांगली आहे.  

क्रिमिनल जस्टिस (सीझन : १)
प्रदर्शन दिनांक :
५ एप्रिल 
रेटिंग : 5/5

संबंधित बातम्या