एका जोडप्याची हलकीफुलकी कहाणी

समृद्धी धायगुडे
सोमवार, 9 सप्टेंबर 2019

वेबवॉच
 

तुम्हाला एखाद्या वीकएन्डला हलकीफुलकी वेबसीरिज बघायची असल्यास एमएक्स प्लेअर वरील वरुण नार्वेकर दिग्दर्शित ‘आणि काय हवं...’ ही अस्सल मराठी वेबसीरिज बघू शकता. या वेबसीरिजमध्ये नवीन लग्न झालेल्या प्रत्येक जोडप्याचे अमूल्य आणि तितकेच महत्त्वाचे असलेले क्षण चित्रित केले आहेत.

पुण्यात स्थायिक असलेले जुई (प्रिया बापट) आणि साकेत (उमेश कामत) हे दोघे एका कॉर्पोरेट कंपनीत कार्यरत असतात. पहिल्या भागाची सुरुवात त्यांच्या नवीन घरात सामान आणण्यापासून होते. पहिल्या भागातच साकेत जुईसाठी एक सरप्राईज प्लॅन करतो. पुढच्या भागांमध्येही अशी काही सरप्राईजेस येतात. हे प्रसंग पाहतानाच नवदांपत्य अगदी हुबेहूब डोळ्यासमोर उभी राहतात. त्या दोघांमधील मतभेद, एकमेकांसाठी वेगळे काही करण्याची ऊर्मी हे सर्व प्रसंग उमेश आणि प्रियाच्या केमेस्ट्रीने छान उभे केलेत.   

पोस्टरवरून रोमँटिक वाटणारी ही वेबसीरिज कुठेही पातळी सोडत नाही किंवा कुठेही कंटाळवाणी होत नाही. म्हटले तर एका नवीन जोडप्याच्या आयुष्यात येणारे सर्व छोटे छोटे चढ-उतार या सहा भागांच्या वेबसीरिजमध्ये दिसतात. या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनचे नवे घर, नवी कार, पुरणपोळी, छोटी सुटी, कमी वजन, मोकळे मन असे एकूण सहा भाग आहेत.              

या सीरिजची महत्त्वाची गोष्ट म्हणजे यातील कलाकार दोघे वास्तव आयुष्यातील नवरा-बायको आहेत. त्यांना खूप वर्षांनी एकत्र आणि तेदेखील या मायक्रो पडद्यावर पाहण्याची संधी मिळत आहे. प्रिया बापट यापूर्वी हॉटस्टारवरील एका वेबसीरिजमधून आपल्या समोर आली होतीच. पण त्या भूमिकेपेक्षा ही भूमिका एकदम सुटसुटीत वाटते.

अनिश जोग याने निर्मिती केलेल्या या सीरिजमध्ये कपल गोल्स असलेल्या लहानसहान गोष्टींचेसुद्धा सुंदर चित्रण केले आहे. एकत्र साजरे केलेले नव्या घरातील क्षण, नवीन गाडी, मधेच येणारे फिटनेसचे फॅड, बायकोचे नवऱ्यावर चालणारे स्वयंपाकाचे आणि डाएट फूडचे प्रयोग, कुरघोडी हे प्रसंग अतिशय गमतीदारपणे चित्रित केले आहेत. त्यामुळे आजच्या नवीन पिढीच्या प्रत्येक जोडप्याला आपल्यातलेच संवाद किंवा घटना छोट्या पडद्यावर पाहत असल्यासारखे वाटावे, इतकी ती जवळची वाटणारी वेबसीरिज आहे. 

यातील एका भागात तर समस्त मुलींच्या आवडीचा विषय चित्रित केला आहे. तो म्हणजे शॉपिंग आणि ब्युटीपार्लर आणि कारमध्ये वेटिंगवर असलेला नवरा. तुम्ही जोडीने हे प्रसंग बघत असाल, तर तुम्हाला बघताना खूपच मजा येईल. या वेबसीरिजमधील विषय खरेच इतके छोटे छोटे आणि हलकेफुलके असल्यानेच ती जास्त जवळची वाटते. फक्त दिग्दर्शकाने हे मांडताना प्रत्येक भाग वेगवेगळ्या कालावधीचे केले आहेत. 

मराठी इंडस्ट्रीतील क्युट कपल म्हणून ओळख असलेले प्रिया आणि उमेश टाइम प्लीज नंतर साधारण सात वर्षांनी एकत्र प्रेक्षकांसमोर आले. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्यासारखे वाटते. या वेबसीरिजचे सहाच भाग असल्याने बघायला कंटाळवाणे वाटत नाहीत. यात कोणतीही अनावश्यक पात्रे नाहीत, फापटपसारा नाही, कपल गोल्स असले तरी कुठेही अश्‍लीलता नाही. मात्र, काही गोष्टी अजून परिपूर्ण होऊ शकल्या असत्या. पहिला भाग थोडासा कंटाळवाणा वाटतो. उरलेले चार भाग एकदम भारी, कारण दोघांच्या रिलेशनशिपबाबत अगदी सहज पद्धतीने दिग्दर्शक भाष्य करताना दिसतो.  

प्रिया बापट या वेबसीरिजविषयी एका मुलाखतीत म्हणते, ‘या वेबसीरिजची टीम मला माझ्या कुटुंबासारखी वाटते. या वेबसीरिजमध्ये एक जोडपे त्यांच्या लग्नानंतरचे काही सुंदर क्षण पहिल्यांदा अनुभवताना दिसते. मुख्य म्हणजे उमेशसोबत खूप वर्षांनी काम करण्याचा अनुभव चांगलाच होता आणि त्यात लग्नानंतरच्या आमच्यासुद्धा काही आठवणी आहेत, त्या आठवणी या वेबसीरिजमुळे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाल्या.’ 

उमेश या वेबसीरिज विषयी म्हणतो, ‘प्रिया आणि मी सात वर्षांनंतर एकत्र झळकलो. आम्हाला एकत्र काम करण्याची खूप मनापासून इच्छा होती आणि या क्षणाची खरेतर आम्ही आतुरतेने वाट पाहात होतो. ही प्रतीक्षा संपली. आम्हाला ‘आणि काय हवं’बद्दल विचारणा झाली. आम्हाला ही संकल्पनाच इतकी आवडली, की आम्ही चटकन होकार दिला. यात लग्नानंतर घडणाऱ्या अनेक छोट्या, तरीही मौल्यवान गोष्टी खूपच सुंदर पद्धतीने दाखवल्या आहेत.’ 

तुमच्याकडे एमएक्स प्लेअर असेल, तर ही मोफत वेबसीरिज कधीही सहज ऑनलाइन बघू शकता. एकंदरीतच या वेबसीरिजची कथा, दिग्दर्शन, अभिनेत्यांची निवड सर्वच गोष्टी छान आहेत. त्यामुळे वेबसीरिज पाहणाऱ्या प्रेक्षकाला आणि काय हवे...?
आणि काय हवं... 
सीझन : १ 
प्रदर्शन तारीख : १६ जुलै २०१९ 
 

संबंधित बातम्या