‘फॅमिली मॅन’चे कर्तृत्व

समृद्धी धायगुडे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

वेबवॉच
 

सध्या वेबसीरिज वॉरमध्ये भाव खाणारी सीरिज म्हणजे ‘फॅमिली मॅन’. ॲमेझॉन प्राइमवर प्रदर्शित झालेली ‘फॅमिली मॅन’ ही श्रीकांत तिवारीची कथा आहे. श्रीकांत तिवारी (मनोज वाजपेयी) एकीकडे आपल्या कुटुंबासमोर अत्यंत घाबरट असल्याचे नाटक करतो, तर दुसरीकडे तो भारतातील चांगल्या गुप्तहेरांपैकी एक आहे. नॅशनल इन्टेलिजन्स एजन्सीच्या एका विशेष पथकासाठी काम करणाऱ्या श्रीकांतच्या या दुहेरी आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित ही नवी मालिका आहे. 

सर्वसामान्य माणसासारख्याच भारतीय गुप्तहेरांच्या आयुष्यातदेखील अडचणी येताना दिसतात. अशाच अडचणींवर मात करत श्रीकांत कसे असामान्य काम करतो, याचे चित्रण उत्तम केले आहे. वेबसीरिजमध्ये लागणारा मसाला म्हणजे ॲक्शन, इमोशन, ड्रामा, थ्रिल, सस्पेन्स सगळे आहे. 

वेबसीरिजच्या नावाप्रमाणेच हा गुप्तहेर कुटुंबासाठीही तेवढाच वेळ देतो, मुलांना शाळेत सोडतो, बिले भरतो, भाजी आणतो. प्रसंगी मुलांसाठी सँडविच करतानासुद्धा दिसतो. यासाठी त्याला सतत काहीतरी जुगाड करावा लागतो. त्याच्या मुलांचा असा समाज असतो, की आपले वडील आरामासाठी सरकारी नोकरी करतात. त्याची बायकोदेखील तो कुटुंबाला जास्त वेळ देत नाही म्हणून सतत नाराज असते. अशा बऱ्याच लहानसहान, पण कुटुंबाच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटना त्याच्या आयुष्यात घडताना दिसतात.          

या सीरिजची खास बाब हीच, की या सीरिजमध्ये सध्या देशात घडणाऱ्या घटनांवर कटाक्ष टाकलेला दिसतो. प्रत्येक भागाच्या आधी ही कथा वास्तवापासून प्रेरित असल्याचे लिहिले आहे आणि हे सर्व वास्तव श्रीकांत तिवारी या व्यक्तिरेखेच्या निमित्ताने आपल्यासमोर मांडले आहे.

या मालिकेची सुरुवात दोन दहशतवादी भारतीय हद्दीत येण्याचा प्रयत्न करतात, या घटनेपासून होते. श्रीकांतच्या आयुष्याची कथादेखील या घटनेनंतर सुरू होते. या सीरिजच्या सुरुवातीला श्रीकांत तिवारीला एक माहिती मिळते, की २६/११ रोजी झालेल्या हल्ल्याप्रमाणे एक मोठा दहशतवादी हल्ला होणार आहे. या हल्ल्यापासून श्रीकांत देशाला कशा प्रकारे वाचवतो हे दाखवले आहे. दक्षिण भारतातून सुरू झालेली गोष्ट मुंबई, काश्‍मीर, दिल्ली, पाकिस्तान, बलुचिस्तान, सीरियापर्यंत पोचते. या सीरिजचे दिग्दर्शक राज आणि डिके या जोडीचा ‘स्त्री’ चित्रपट सर्वांनीच पाहिला आहे. यांची एखादी गोष्ट सांगण्याची अनोखी स्टाइल या सीरिजला वेगळेपण आणते. त्यांनी दिग्दर्शनाबरोबर सुमन कुमार आणि सुमित अरोरा यांच्याबरोबरीने कथा लिहिली आहे. गंभीर घटनेवर भाष्य करताना कुठेही जड वाटणारे लेखन केलेले नाही.  

दिग्दर्शक आणि लेखकांनी प्रत्येक व्यक्तिरेखेचे महत्त्व आणि प्राधान्य दोन्ही जपले आहे; मग ते श्रीकांत तिवारी असो किंवा त्याची टीनएजर मुलगी किंवा अगदी बलुचिस्तानातील दहशतवादी संघटनेचा एक एजंट असो.  

पाकिस्तान, बलुचिस्तान, सीरियामधील काही प्रसंग इतके सहज चित्रित केले आहेत, की ते पाहताना सलमान खानच्या मसालापटांची आठवण होते. पण उत्कंठावर्धक असल्याने या गोष्टींकडे प्रेक्षकांचे दुर्लक्ष होऊ शकते.    

या मालिकेत मनोज वाजपेयीबरोबरच प्रियामानी, शारीब हाश्मी, शरद केळकर, नीरज माधव, गुल पनाग, सुंदीप किशन, दर्शन कुमार, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी हे कलाकार आहेत. ही वेबसीरिज पाहिल्यानंतर प्रेक्षक म्हणून आपला विश्‍वास बसतोच, की फक्त मनोजच या भूमिकेसाठी योग्य आहे. प्रियामानीच्या सहज अभिनयामुळे ती आपल्या घरातीलच एक सदस्य वाटते. जे. के. तळपदेच्या भूमिकेतील शारीब हाश्मी श्रीकांतचा सहकारी आणि मित्र. कामाच्या आणि घरातल्या बऱ्याच प्रसंगांमध्ये त्याची ढाल होऊन लढताना दिसतो. तिसरी भूमिका म्हणजे सीरिजमधील नकारात्मक पात्र मुसा रहमान. मुसाची भूमिका साकारणारा अभिनेता नीरज माधव हा मल्याळी चित्रपटसृष्टीतून आला आहे. यानंतर मराठी आणि अनोख्या आवाजासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे शरद केळकरनेही आपली भूमिका उत्तम वठवली आहे. श्रीनगरमधल्या लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेतील गुल पनाग जाता जाता आपल्या अभिनयाची छाप उमटवतेच.

या सीरिजची मांडणी खिळवून ठेवणारी आहे. प्रत्येक पात्र एकमेकांशी शेवटपर्यंत जोडलेले आहे. तो बंध कुठेही सुटलेला दिसत नाही. ‘फॅमिली मॅन’ नावातच सारे काही असल्याने ती किती जवळची वाटते, हे भारतीय प्रेक्षकाला सांगायलाच नको. या सीरिजच्या शेवटच्या भागावरून तरी लवकरच पुढचा सीझन येणार असे दिसते.  

फॅमिली मॅन
प्रदर्शन तारीख : २० सप्टेंबर २०१९

संबंधित बातम्या