बिग फॅट वेडिंगचे वास्तव
वेबवॉच
झोया अख्तर दिग्दर्शित ही वेबसीरीज अमेझॉन प्राइम या ॲपवर उपलब्ध आहे. नऊ भागांत विभागलेल्या या सीरीजमध्ये झोयाने अतिशय बारकाईने भारतातील ‘बिग फॅट’ आणि ‘बिग बजेट लग्न’ सोहळ्यातील कडवे वास्तव मांडले आहे. प्रत्येक भागातून तिने केलेला बारीकसारीक गोष्टींचा अभ्यास, त्याची मांडणी, मुख्य म्हणजे मुद्द्याला धरून केलेले भाष्य आपल्याला भानावर आणते.
हल्ली प्रत्येक वेबसीरीज म्हटल्यावर त्यात फक्त सेक्स, समलैंगिक संबंध दाखवले जातात. हे ज्या पद्धतीने दाखवले जाते, त्यावरून कदाचित तिशीच्या पुढील पिढीला फारसे न रुचणारे आहेत. या सीरीजमध्ये हे दाखवले आहे, पण त्यामुळे मूळ कथेला धक्का पोचत नाही. भारतीय चित्रपटात या सारखे विषय जे सोपे दिसतात; पण मांडायला अवघड वाटतात, हे शिवधनुष्य झोयाने आणि इतर टीमने अतिशय चांगल्या प्रकारे उचलले आहे. या वेबसीरीजची कथा फिरते ती म्हणजे करण मेहरा(अर्जुन माथूर), तारा खन्ना(शोभिता धुलीपाला), आदिल खन्ना(जिम सर्भ), फैजा नक्वी(कल्की कोचलीन), कबीर बसराय(शशांक अरोरा), जसप्रीत कौर(शिवानी रघुवंशी) आणि इवान रोड्रिग्युज, नताशा सिंग, विनय पाठक, दलिप तहील, मानिनी मिश्रा, आयेशा रझा, यशस्विनी दयमा, विजय राझ, हर्मन सिंग, हर्षिता शर्मा यांसारखे दर्जेदार कलाकार आणि वेब विश्वात आपल्या अभिनयाने लोकप्रिय असलेले हे सर्व अभिनेते आहेत. प्रत्येक पात्राला दिलेले स्वातंत्र्य, त्याचे विचार आताच्या पिढीचे नेतृत्व करणारे आहेत. प्रत्येक भागातील पात्रांची निवड अतिशय योग्य आणि समर्पक केली आहे. सीरीजच्या पहिल्या भागात मुख्य पात्रांची ओळख होते.
‘मेड इन हेवन’ या नावाची दिल्लीस्थित एक वेडिंग प्लॅनर कंपनी असते. ज्यात दोन भागधारक असतात. यातील तारा सामान्य घरातून आलेली पण तिच्या ग्रूमिंग आणि स्मार्टनेसमुळे श्रीमंत उद्योगपतींच्या घरात विवाहबद्ध होते. प्रत्येक इव्हेन्ट त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा आणि कसोटीचा ठरतो, एक लग्न संपन्न करण्यासाठी त्यांना किती दिव्यातून जावे लागते, प्रसंगी त्यांना कसे अडथळे येतात, याचे मार्मिक चित्रण केले आहे. या प्रमुख पात्रांबरोबरच कबीर आणि जसप्रीत हे आताच्या टिनएजर स्ट्रगलर्सचे नेतृत्व करतात. या सीरीजमध्ये फक्त श्रीमंतांची दुखणी नाहीत, तर सामान्य गरीब घरातून आलेल्या मुलांची मानसिकतादेखील नेमकी टिपलेली दिसते.
आधुनिक जीवनशैलीचे कपल्सवर होणारे शारीरिक, मानसिक, व्यावसायिक, कौटुंबिक परिणाम झोयाने अगदी नेमके दाखवले आहेत. गेल्या वर्षीपर्यंत समलैंगिक संबंध आणि सामान्य उच्चभ्रू कपल्सची दुखणी बघताना, मेट्रो सिटीजमधील हे अगदी आपल्या आजूबाजूला घडणारेच चित्रित केल्यासारखे वाटते. एकंदरीतच विषय थोडा गंभीर पण मांडणी ताजी आहे.
सुरुवातीला पहिला एपिसोड थोडा बोअर किंवा स्लो वाटू शकतो. पण सर्व पात्र समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. कदाचित हा वेळ पुढील वास्तव मांडण्यासाठीच घेतला असावा; पण झोयाने यात घेतलेली तगडी स्टार कास्ट आणि नवे चेहरे बघता पुढचे भाग रंजक ठरतात. यातील आदिलची व्यक्तिरेखा गोंधळलेली किंवा ग्रे शेडमध्ये असल्याने नेमकी भूमिका शेवटपर्यंत स्पष्ट होत नाही.
मुळात या वेबसीरीजचे चित्रण कलम ३७७ रद्द होण्यापूर्वी केलेले आहे. समलिंगी लोकांचा संघर्ष, जगण्याची लढाई घरापासूनच कशी सुरू होते, हे झोयाने करणच्या माध्यमातून दाखवले आहे. सामाजिक बंधनांमुळे तो अगतिक आणि बंडखोरही होतो. त्यावेळी आपला व्यवसायही पणाला लावायची त्याची तयारी असते.
ताराच्या व्यक्तिरेखेबद्दल बोलायचे झाले, तर तिच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू आहेत. सामान्य संस्कारी घरातून आल्याने नैतिक आणि अनैतिकतेमध्ये गुरफटलेली दिसते. आदिलच्या प्रेमात तिला बऱ्याच गोष्टींचा विसर पडतो. वेगवेगळ्या जाती-पंथातील, रूढी परंपरा असलेली लग्ने पाहिल्यामुळे सामाजिक चालीरीती आणि व्यक्तिमत्त्वातला फोलपणा तिच्यासमोर येतो. हे सगळे असह्य होऊन ती आणि करण काय निर्णय घेतात, वैयक्तिक आणि सामाजिक घुसमटीला कसे तोंड देतात, हे आवर्जून बघण्यासारखे आहे. ‘लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात’ या वाक्याचा नवा आणि वास्तववादी अर्थ या वेबसीरीजमधून प्रेक्षकांना नक्कीच लागेल ही अपेक्षा.
रेटिंग : 4/5
प्रदर्शित तारीख : ८ मार्च
भाषा : इंग्लिश, हिंदी, तमीळ, तेलगू