गुलाब पाकळ्यांची पेटन्ट कथा!

प्रा. ॲड. गणेश शं. हिंगमिरे
सोमवार, 8 मार्च 2021

कव्हर स्टोरी

वास्तविक पाहता एखाद्या कल्पनेला किंवा संशोधनाला पेटन्ट मिळणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहेच पण एखाद्या महिला संशोधकाने ते पेटन्ट मिळवणे ही त्याहून महत्त्वाची बाब आहे. जागतिक बौद्धिक संपदेच्या एका अहवालानुसार १९९५मध्ये संपूर्ण जगात महिला पेटन्ट धारकांचे प्रमाण केवळ नऊ टक्के होते. ताज्या आकडेवारीनुसार २०१९मध्ये हे प्रमाण एकोणीस टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. पेटन्ट मिळवणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ झाली असली तरी जगातल्या एकूण पेटन्टधारकांच्या विचार करता हे प्रमाण अजूनही केवळ एक पंचमांश एवढेच आहे.

पेटन्ट ही बुद्धीतून निर्माण झालेली महत्त्वाची संपत्ती असते आणि राष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक जडणघडणीमध्ये ही पेटन्टरूपी संपत्ती फार महत्त्वाची भूमिका बजावत असते. आंतरराष्ट्रीयदृष्ट्या इतर संपत्तीपेक्षा पेटन्टची ओळख खूपच वेगळी असते. तुमच्याकडे जमीन आहे, कार आहे तर ती संपत्ती तुमच्या देशांतर्गत मालमत्तेशी निगडित संपत्ती म्हणून अधोरेखित होत असते. तुम्ही तुमची जमीन एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकत नाही; म्हणजेच त्या संपत्तीला काही मर्यादा येतात. पण पेटन्ट ही अशी एक संपत्ती आहे, ज्या संपत्तीला स्थळकाळाची अशी फार बंधने बांधून घालू शकत नाहीत. ती संपत्ती एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येते. उदाहरण द्यायचे झाल्यास कॅलिफोर्नियातील स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांटचे देता येईल. ही मदर प्लांट पेटन्टेड आहेत आणि महाबळेश्वर परिसरात स्ट्रॉबेरीची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीच्या मदर प्लांट रॉयल्टी देऊन विकत घ्यावी लागतात. म्हणजेच अमेरिकेतील पेटन्ट भारतातही कमाई करून देत असते. याच कारणामुळे पेटन्टच्या संपत्तीचे व्हॅल्युएशन खूप मोठ्या प्रमाणात गृहीत धरले जाते, परिणामी इतर संपत्तीच्या तुलनेत पेटन्टचे महत्त्व अधिक किंमत असणारी संपत्ती म्हणून धरले जाते.

पेटन्ट या बौद्धिक संपत्तीचे उदारीकरण आणि व्यापारीकरण जगभरातल्या अनेक मंडळींनी केले आहे. पेटन्टच्या औद्योगिकीकरणाच्या या क्रांतीमध्ये अनेक महिलांचे योगदानही फार मोठे आहे. आंतरराष्ट्रीयस्तरावर अनेक महिला संशोधकांनी जगभरातल्या महत्त्वाच्या प्रश्नांना आपल्या पेटन्टच्या माध्यमातून उत्तरे दिली आहेत, असे पेटन्टचा आजवरचा इतिहास सांगतो. अनेक महिला संशोधकांनी, ठरीव साच्याच्या पलीकडे जाऊन विचार करणाऱ्या महिलांनी समाजाचे महत्त्वाचे प्रश्न सोडवताना त्या कल्पनांचे बौद्धिक हक्क स्वतःच्या नावाने घेतले आहेत.  

इंग्लंडमधील मँचेस्टर विद्यापीठातल्या प्राध्यापक सारा हे यांनी जगाला भेडसावणाऱ्या पाण्याच्या प्रश्नावर एक उपाय शोधला, एवढेच नव्हे त्या शोधाचे पेटन्टही मिळवले. त्यांचे हे संशोधन आगळेवेगळे होते, उत्तम होते आणि प्रत्यक्ष सामाजिक प्रश्न सोडविणारे होते म्हणून मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनने त्यांना संशोधनासाठी आर्थिक साहाय्यही दिले. एका विशिष्ट तंत्रज्ञान वापरून चालवल्या जाणाऱ्या एका यंत्राच्या साहाय्याने स्वच्छतागृहांमधून वाया जाणारे पाणी प्रक्रिया करून पुन्हा पिण्यायोग्य बनेल एवढे शुद्ध करण्याची प्रक्रिया प्राध्यापक हे यांनी विकसित केली. त्या संपूर्ण एम्बेडेड सिस्टीमला पेटन्ट मिळाले. जगभरातील टॉयलेटमध्ये वापरलेले पाणी वाया जाते, त्याचा पुनर्वापर करण्यावरही मर्यादा असतात, असे समजले जात असताना, त्याच पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी पिण्यायोग्य करण्याची किमया इंग्लंडच्या या महिला प्राध्यापिकेने केली. त्यांच्या या संशोधनाला पेटन्टच्या रूपाने एकस्व अधिकारही प्राप्त झाला. अशा महत्त्वाच्या संशोधनाला जरी जगातल्या एका देशात पेटन्ट मिळाले असले तरी भारतासारख्या देशात हे पेटन्ट कार्यान्वित झाल्याचे एकही उदाहरण ऐकिवात नाही. आपल्या विद्यापीठांमध्ये जर हे तंत्रज्ञान वापरायला सुरुवात झाली तर मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकेल. शिवाय या तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक संकुलात होणार असल्याने त्यासाठी कदाचित कुठलेही मूल्य किंवा रॉयल्टीसुद्धा मोजावी लागणार नाही. अशावेळी गरज असते ती इच्छाशक्तीची! ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग भारतातल्या शिक्षणसंस्था करून घेतील अशी आशा आहे. 

वास्तवात पेटन्ट मिळणे ही एक महत्त्वाची गोष्ट आहेच, पण एखाद्या महिलेला पेटन्ट मिळणे ही त्याहून महत्त्वाची बाब आहे. जागतिक बौद्धिक संपदेच्या एका अहवालानुसार १९९५मध्ये जगभरातले महिला पेटन्टधारकांचे प्रमाण केवळ नऊ टक्के जगभरात होते. आताच्या उपलब्ध आकडेवारीनुसार २०१९मध्ये हे प्रमाण एकोणीस टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. जगभरातल्या महिला पेटन्टधारकांच्या संख्येमध्ये जरी वाढ झाली असली तरी जगातल्या एकूण पेटन्टधारकांच्या मानाने हे प्रमाण केवळ एक पंचमांश आहे. अशा वेळी कोणत्याही महिलेचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पेटन्ट महिलांचा एकस्व अधिकारातला टक्का वाढवण्यासाठी उपयोगी ठरेल.

स्वतःच्या संशोधनाकरता स्वतःच्या नावावर पेटन्ट असणाऱ्या अशाच एक महिला उद्योजिका पुण्यात आहेत. जयश्रीताई यादव. कला शाखेच्या पदवीधर असणाऱ्या जयश्रीताईंनी घरच्याघरी काहीतरी उद्योग सुरू करायचा म्हणून काही वर्षांपूर्वी गुलकंद बनविण्याचे प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गुलकंद बनविण्याचा व्यवसायही सुरू केला. गुलकंद, गुलाबपाणी, सरबतांचा व्यवसाय करीत असतानाच आणखी काहीतरी मोठे करण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. या अस्वस्थतेतूनच जयश्रीताईंनी एका संशोधनाची आणि त्यातून पुढे एका पेटन्टची उभारणी केली. गुलाबाच्या पाकळ्यांपासून जर गुलकंद तयार होऊ शकतो तर त्याच पाकळ्या वापरून वाइन का तयार होऊ शकणार नाही, असा प्रश्न त्यांना पडला; आणि मग तो प्रश्नच त्यांच्या संशोधनाचा विषय ठरला. वेगवेगळ्या प्रयोगातून त्यांनी गुलाब पाकळ्यांच्या वाईनची प्रक्रिया आत्मसात केली. या संशोधनादरम्यान फळांपासून बनणाऱ्या अनेक ठिकाणच्या वायनरींनी त्यांनी भेटी दिल्या. वाइन उद्योग कोणत्या निकषांवर चालतो याचा सविस्तर अभ्यास केला. कश्मिराला, आपल्या धाकट्या कन्येला त्यांनी वाइन टेक्नॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पाठवले. आठ-नऊ वर्षे न थकता, न कंटाळता समोर दिसणारे प्रत्येक दार ठोठावत त्यांनी गुलाबापासून वाईनची निर्मिती करण्यात यश मिळवले. फुलांच्या राजाची बाजारपेठ त्यांच्या या प्रयत्नांमुळे आणखी एका नव्या दिशेला विस्तारली.

त्यांच्या या संशोधनाला भारतातले पेटन्ट मिळवून देण्यासाठी आम्ही यशस्वी प्रयत्न केले. पेटन्टसाठी आम्ही ऑस्ट्रेलियातही अर्ज केला. जयश्रीताई केवळ पेटन्ट मिळवून थांबल्या नाहीत, तर त्या पेटन्टच्या आधारे त्यांनी वाइन निर्मितीसाठी पूर्ण यंत्रणा उभी केली, एक व्यवसाय उभा केला. पुण्याजवळच दहा एकर जमिनीवर वाइनसाठी लागणाऱ्या गुलाबांची शेती सुरू केली. फुलांपासून वाइन निर्मितीचा आपल्याकडचा हा पहिलाच यशस्वी प्रयत्न होता. त्यांच्या या पेटन्टचे सर्वात मोठे यश म्हणजे महाराष्ट्र शासनाला वाइन निर्मितीच्या संदर्भात नवीन शासकीय आदेश काढावे लागले. पूर्वी केवळ द्राक्षं, चिकू, जांभळं अशा काही फळांपासून वाइन निर्मिती व्हायची, त्यातही द्राक्षांपासून करण्यात येणाऱ्या वाइनच एक प्रकारे सर्वमान्य 

होती. अशा परिस्थितीत फुलांच्या पाकळ्या पासून वाइन निर्मितीचे पेटन्ट नुसते घेऊन ठेवून उपयोग नव्हता, कारण त्यापासून उद्योग निर्मिती होऊ शकणार नव्हती. या सर्व तांत्रिक अडचणींना जयश्रीताईंनी चिकाटीने तोंड दिले. अनेक वेळा मंत्रालयात जाऊन जयश्रीताईंनी संबंधित अधिकारी आणि मंत्री यांच्या भेटी घेऊन त्यांना आपले पेटन्ट आणि गुलाबापासून शक्य झालेली वाइन याबद्दल सविस्तर सांगितले. पेटन्ट मिळाले असल्याकारणाने विषय समजावून देणे सोपे झाले होते. आता नवीन आदेशानुसार फुलांपासूनही वाइन निर्मितीला परवानगी मिळाली आहे. याचे श्रेय जयश्रीताई आणि त्यांच्या पेटन्टला जाते. पेटन्टच्या आणि त्यातून नव्या उद्योग उभारणीच्या सगळ्या प्रवासात त्यांची धाकटी मुलगी त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभी होती. 

एखाद्या स्वप्नकथेसारखी ही जयश्री यादव यांची पेटन्ट कथा अनेक कारणांसाठी आणि अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

संबंधित बातम्या