लाओस इज कॉलिंग!

अजित सांगळे
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जागतिक पर्यटन
 

शतकानुशतकांपासून आपण गणरायाला विघ्नहर्त्याच्या रूपात पूजत आलो आहोत. भारतीय संस्कृतीचा मानबिंदू असलेला हा देव भारतवर्षाच्या सीमा ओलांडून अनेक देशांमध्ये पोचला आहे आणि तिथलाच होऊन गेला आहे. गणरायाची विविध रूपे बहरली, ती खास करून आग्नेय आशियायी देशांमध्ये. हे आग्नेय आशियायी देश नव्या पर्यटनसृष्टीची द्वारे पर्यटकांसाठी खुली करत आहेत. त्यातीलच एक ठिकाण आहे लाओस. ‘मा देर’ ‘मा देर’ असे म्हणत नितांतसुंदर निसर्गसंपदा आणि देखण्या वारसास्थळांनी नटलेले लाओस तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे. स्थानिक लाओ भाषेत ‘मा देर’ म्हणजे ‘यावे, आपले स्वागत आहे!’ 

तसे तर लाओस नीटपणे पाहण्यासाठी दहा बारा दिवसही कमीच पडतील. लाओस हा देश वैशिष्ट्यपूर्ण असूनही पर्यटनाच्या दृष्टीने काहीसा दुर्लक्षितच राहिला आहे. युरोप, अमेरिकेचा झगमगाट किंवा ट्रॉपिकल देशांसारखे समुद्रकिनारे अशी पर्यटनातील चलनी नाणी या देशाकडे नाहीत. तरीही लाओस टुरिझम ‘सिंप्ली ब्युटिफूल’ असे अधिकृत स्लोगन मिरवते. या देशाची सैर केल्यानंतर या सौंदर्याची भुरळ आपल्यालाही पडल्यावाचून राहत नाही. ‘साइट सीईंग’ हा कोणत्याही टूरचा भाग असतोच. परंतु, कोणतेही ठिकाण नुसते पाहण्यापेक्षा त्याचा परिपूर्ण अनुभव मिळाला, तर पर्यटनाचा हेतू सफल झाला असे म्हणता येते. 

लाओसमधील नाइट मार्केटची भटकंती झाल्यानंतर नदीकिनारी डिनरचा आस्वाद घेताना अवघ्या पाचशे मीटर्सवर झगमगत खुणावणारी थायलंडची सीमा पाहणे, हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. लाओसमधील हे नाइट मार्केटदेखील आवर्जून अनुभवण्यासारखे असते. या मार्केटमध्ये मनसोक्त खरेदी किंवा नुसतीच भटकंती दोन्हीचा आनंद पुरेपूर उपभोगता येतो. या टूरमध्ये राजधानी व्हीएनचान, लुआंग प्रबांग आणि वट फू ही जागतिक वारसास्थळे, मेकाँगच्या पात्रातले फ्लॉटिंग मार्केट, फोर थाउजंड आयलंड्स, पाक ओऊ केव्हज, वट झिएंग थोंग, फा थाट लुआंग किंवा द ग्रेट स्तूप ऑफ लाओस, वट फु किंवा वट फोउ हे माऊंट फु काओच्या पायथ्याशी असलेले प्राचीन ख्मेर हिंदू मंदिर अशी कित्येक ठिकाणे तर पर्यटकांना आकर्षित करतातच; पण ती पाहत असताना अनुभवायला मिळणारे बुद्धिस्ट कल्चर, वेगळी खाद्यसंस्कृती, ट्रायबल कल्चर, वन्यजीवन, क्रूझ राईड्ससारख्या ॲक्टिव्हिटीजमुळे हा देश थेट आपल्या मनात घर करतो. 

लाओस हा एक लँडलॉक्ड देश आहे. म्हणजे सर्व सीमा भूमीने वेढलेला देश. मग केवळ एका नदीपात्राने वेगळी केलेली थायलंडची सीमा असो, की अमेरिकन युद्धाचे चटके सोसलेली व्हिएतनाम सीमा असो.

आग्नेय आशियाचे पर्यटन इंद्रधनुष्याप्रमाणे सप्तरंगी आहे. यातला प्रत्येक रंग युनिक, झळाळता आणि तरीही सुंदर एकसंध अनुभव देणारा आहे.  

संबंधित बातम्या