स्वस्थ मुशाफिरीचा आनंद 

डॉ. अविनाश भोंडवे 
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जागतिक पर्यटन
 

साहित्यातील कविकल्पनांमध्ये जीवनाला एक प्रवास मानतात. ''केल्याने देशाटन...'' हा व्यवहार चातुर्य संपादन करण्याचा एक मार्ग समजला जातो. पण आजमितीला प्रवास हे जीवनाचे मूलभूत अंग होऊन बसले आहे. दैनंदिन व्यवसाय किंवा नोकरीसाठी काही लोकांना रोजच्या रोज प्रवास करावा लागतो. परगावी जाणे, दूरवरच्या परराज्यात जाणे, परदेशात जाणे या गोष्टी काही छोट्या मोठ्या बिझनेसमनसाठी नेहमीची अनिवार्य गोष्ट असते. पण आजच्या जीवनात दूरवरचे निसर्गरम्य प्रदेश पाहणे, मानवनिर्मित अद्‌भुत रचना पाहणे, ऐतिहासिक स्थळांना भेटी देणे, रोजच्या बे एके बे अशा चाकोरीबद्ध जीवनाचा कंटाळा आला म्हणून मन रिझवण्यासाठी दूर प्रवासाला जाणे हा एक रिवाज झाला आहे. हा प्रवास कधी जमिनीवरून, कधी आकाशातून तर क्वचितप्रसंगी समुद्रातून होतो.

मात्र, या प्रवासाचा आणि उन्मुक्त मुशाफिरीचा आनंद मिळवायचा असेल तर पर्यटनापूर्वी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे, काही प्रचलित आजारांची माहिती आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घेणे, तसेच प्रवासी विमा उतरवणे या गोष्टींना महत्त्व द्यावेच लागते.

पर्यटनपूर्व आरोग्य तपासणी 
दूरच्या प्रवासाला जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी प्रवासासाठी आपण फिट आहोत का याबाबत डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. 

  • पन्नाशी उलटलेल्या व्यक्तींनी आपला रक्तदाब, रक्तातील साखर, हिमोग्लोबिन तपासून घ्यावे.
  • अतिशय दुर्गम किंवा पहाडी प्रदेशात जायचे असेल, तर फुप्फुसांची आणि श्वासोच्छ्वासाची तपासणी करावी. अनेकदा लडाख, मानस सरोवर, अमरनाथ किंवा अरुणाचल प्रदेश अशा ठिकाणी गेल्यावर तेथील विरळ हवेमुळे श्वासोच्छ्वासाचे गंभीर त्रास उद्‌भवू शकतात.
  • प्रवासात जर खूप उंचावर पायी चढायचे असेल, तर पन्नाशी उलटलेल्या स्त्रीपुरुषांनी हृदयविकार तज्ज्ञाकडून ईसीजी, स्ट्रेस टेस्ट करून घ्यावी. वैष्णोदेवीसारख्या ठिकाणी जिथे खूप पायऱ्या चढाव्या लागतात, तिथे हृदयविकाराचा झटका येऊन पर्यटक दगावण्याच्या अनेक घटना घडत असतात.
  • तुमच्या आजारांविषयी तुमच्या फॅमिली डॉक्टरला माहिती असते. त्यामुळे या आजारांच्या प्रतिबंध उपायांची माहिती व तुम्हाला आवश्यक औषधांची यादी डॉक्टरकडून घ्यावी. ती औषधे कशी घ्यायची याची माहितीही त्यात नमूद असावी. 
  • ज्यांना रक्तदाब, मधुमेह, संधिवात किंवा इतर प्रकारचे दीर्घकाळ चालणारे आजार असतील, तर प्रवासाला जाण्यापूर्वी ते नियंत्रणात आणावेत. प्रवासात ही औषधे आणि आजाराची पथ्ये कोणत्याही कारणाने कधीही चुकवू नयेत. 

आवश्यक औषधे 
 प्रवासाला जाताना औषधांचा एक वेगळा डबा न्यावा. त्यात चार प्रकारची औषधे असावीत. 

  • तुम्हाला नेहमी चालू असतील अशी औषधे, उदा. रक्तदाब, मधुमेह, संधिवात वगैरे. 
  • तुम्हाला एखादा साधाच त्रास वरचेवर होत असेल, तर त्यासाठी आवश्यक असलेली औषधे. औषधांची यादी तुमच्या फॅमिली डॉक्टरकडून घ्यावी. 
  • याशिवाय सर्दी, खोकला, ताप, अंग दुखणे, उलटी, मळमळ, जुलाब, गाडी लागणे, डोके दुखणे, छातीत जळजळणे, चक्कर येणे अशा प्रकारच्या साध्या पण प्रवासात हमखास होणाऱ्या त्रासांसाठी असलेली औषधे.
  • प्रथमोपचाराचे कीट - जखमा, सांध्यांची चमक, सांधा निखळणे, स्नायू दुखावणे अशांसाठी आवश्यक ती मलमे, स्प्रे, ड्रेसिंगचे सामान असलेली प्रथमोपचाराची पेटी.

ही सर्व औषधे नेण्यासाठी एम.बी.बी.एस. डॉक्टरांच्या लेटरपॅडवर त्यांची सही, शिक्का असलेले प्रिस्क्रिप्शन आवश्यक असते. ही औषधे विकत घेऊन तशीच बॅगेत नेली, तर विमानतळावरच ती नेण्यापासून तुम्हाला रोखले जाऊ शकते. भारतातच ही औषधे लगेजच्या यादीत जाहीर करावी लागतात. 

परदेशात भारताप्रमाणे कुठल्याही मेडिकलमध्ये जाऊन तुम्ही कोणतीही औषधे खरेदी करू शकत नाही. ती खूप महागही पडतात. त्यामुळे भारतातूनच ही औषधे बरोबर न्यावीत. या औषधांमध्ये नार्कोटिक्सयुक्त औषधे नसावी. कारण अनेक देशांत ते बेकायदा समजले जाते. या औषधांची बॅग तुम्ही प्रवासात जवळ बाळगावीत. कारण अनेकदा औषधे घेतलेली असतात, पण त्यांची बॅग सिटी टूर करताना रूममध्ये ठेवली जाते किंवा बसच्या सामानाच्या कप्प्यात राहते आणि वेळेवर काहीच मिळत नाही. 

लसीकरण 
देशापरदेशातल्या अनोळखी ठिकाणी प्रवास होत असतो. प्रत्येक देशामध्ये आणि देशातल्या प्रदेशामध्ये काही संसर्गजन्य आजार मोठ्या प्रमाणात आढळत असतात. या आजारांपासून सुरक्षित राहण्यासाठी लसीकरण करून घेणे गरजेचे असते. त्यामुळे आपण जाणार आहोत त्या देशात त्यावेळेस एखाद्या आजाराची साथ चालू आहे की नाही याची माहिती घ्यावी. 

परदेशी जाताना किंवा देशांतर्गत प्रवास करताना 
हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, टायफॉईड आणि पॅराटायफॉईड, मेनिंगोकॉकल डिसीज, यलो फीवर, रेबीज, जापनीज एन्केफेलायटिस अशा आजारांच्या लसी त्या त्या देशातील आजारांनुसार घ्याव्या लागतात. अमेरिकेतील काही राज्यांमध्ये फ्लूची, श्वसनसंस्थेच्या आजारांची, टायफॉईडची साथ असते. त्यामुळे तिथे जाताना याबाबत लसीकरण करून घ्यावे.  
 लसीकरणाचा परिणाम होऊन त्या आजाराची प्रतिकारशक्ती शरीरात निर्माण व्हायला साधारणतः दोन ते तीन महिने लागतात. त्यामुळे प्रवासाच्या आधी चार ते सहा महिने लसीकरण करून घ्यावे. अन्यथा त्या लसींचा परिणाम सुरू न झाल्याने ती निरुपयोगी ठरतात. काही देशांत विशिष्ट आजारांचे लसीकरण अनिवार्य असते. आपण त्या लसी घेतल्याचे त्या लसीच्या बॅच नंबरसह नोंदवलेले डॉक्टरांचे सर्टिफिकेट घेणे अनिवार्य असते. उदाहरणार्थ, आफ्रिकन देशांमध्ये जाण्याअगोदर ‘यलो फीवर’ची लस, तर हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला जाताना पोलिओ व मेनिन्गोकॉकल लस आणि त्यांचे सर्टिफिकेट असावे लागतेच. 

लहान मुले 
प्रवासामध्ये लहान मुलांच्या औषधांचे कागद आणि लसीकरणाच्या नोंदीच्या कार्डाची झेरॉक्स प्रतबरोबर असावी. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांची औषधे बालरोगतज्ज्ञांकडून सही करून घेतलेल्या प्रिस्किप्शनसह बरोबर बाळगावी. कृत्रिम दुधाची पावडर, पॅसिफायर बरोबर बाळगावे. विमान आकाशात उडताना तसेच विमानाचे लॅंडिंग होताना, बाळाच्या तोंडात पॅसिफायर द्यावे. परदेशात प्रवास करताना चाईल्ड सेफ्टी सीट्सचा वापर करावा.

गर्भवती स्त्रिया 
भारतातील विमान कंपन्या गरोदर स्त्रियांना साधारणपणे ३२ आठवडे (आठ महिने) पूर्ण झाले असल्यास त्यानंतरच्या काळात हवाई प्रवास नाकारतात. काही कंपन्या ३५ आठवड्यांपर्यंत परवानगी देतात. सात महिने पूर्ण झालेल्या गरोदर स्त्रीला विमान आकाशात असताना प्रसूतीवेदना सुरू झाल्या, तर मोठा बाका प्रसंग निर्माण होतो. त्यामुळे त्याबाबत यथायोग्य नियोजन करावे. 

परदेशप्रवास करताना लागणारा दीर्घ काळ लक्षात घेतला, तर २४ ते ४८ तासांचा हवाई प्रवास गरोदर स्त्रीला आणि तिच्या पोटातील बाळाला धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे साधारणतः सहाव्या महिन्यानंतर विमानप्रवास टाळावा. देशांतर्गत प्रवासाबाबतीतही रेल्वे किंवा बसचा दीर्घकालीन प्रवास आठव्या महिन्यानंतर टाळणे श्रेयस्कर ठरते.

आहार आणि भोजन 
देशातील अथवा परदेशातील प्रवासात जेवणाअगोदर हात स्वच्छ धुणे विसरू नये, कारण त्यातूनच जंतुसंसर्ग होतो. 

सर्दी, खोकल्याचे आणि पोटाचे आजार त्यामुळेच होतात. सहसा शिजवलेले ताजे अन्न खावे. परदेशात मासे आणि सॅलड्‌स खाणे टाळावे. कारण भारतीयांना या खाद्यपदार्थांमुळे अंगावर पुरळ उठण्याचा तसेच पोट बिघडण्याचा त्रास होऊ शकतो. आइस्क्रीम आणि दुधाचे पदार्थ टाळावेत. रस्त्यावरचे अन्न खाऊ नये. पाणी पिताना मिनरल वॉटरचा आग्रह धरावा. पोहण्याच्या तलावातच पोहावे, इतरत्र पोहणे टाळावे. प्रवासादरम्यान पोहायची तयारी असेल, तर आपला स्वतःचा कॉस्च्युम बाळगावा. त्या तलावावर ठेवलेले कपडे वापरू नयेत. 

काही विशेष आजार
प्रवासात आपली तब्येत बिघडली, तर आपल्याला त्रास होतो तो वेगळाच, पण सोबत असलेले कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्या आनंदावर विरजण पडते. अशावेळेस संपूर्ण प्रवास रद्द करून घरी परतण्याची वेळही अनेकदा येते. केवळ परदेशप्रवासाबाबतीत नव्हे, तर देशांतर्गत मुशाफिरीतसुद्धा ही गोष्ट महत्त्वाची असते. जगात आणि विशेषतः भारतात प्रवास करताना काही आजारांबाबत काळजी घेणे आवश्यक ठरते. काळजी घेतल्यास हे आजार टाळता येतात.

उलट्या-जुलाब
प्रवासात खाताना हॉटेलमधील स्वच्छता लक्षात घ्यावी. उघड्यावरचे पदार्थ, मिठाई, हातगाडीवरील चमचमीत पदार्थ टाळावेत. विशेषतः देवस्थाने, तीर्थक्षेत्रे आणि काही थंड हवेची ठिकाणे अशा जागी असे पदार्थ खाण्याचा मोह टाळावा. काही प्रवासी हॉटेलमध्ये नाश्त्याला आणि जेवणाला नेहमीपेक्षा जास्त खातात. अशांना अपचनाचे जुलाब होतात.

प्रवासात खाण्यावर आणि पिण्यावर नियंत्रण हवे. पाणी स्वच्छ आणि फिल्टर्ड असल्यासच प्यावे. उघड्यावरील ज्यूस, सरबते टाळावीत. अन्यथा खात्रीच्या ब्रॅंडचे मिनरल वॉटर वापरावे. त्रास झाल्यास मेट्रोनायडॅझोल, सिप्रोफ्लॉक्सॅसिन, लोमोटिल अशा गोळ्या जुलाबासाठी आणि ऑन्डेनसेट्रॉन उलट्यांसाठी, डॉक्टरांना विचारून जवळ ठेवाव्यात आणि त्या जरुरीप्रमाणे घ्याव्यात. शिवाय उलट्या-जुलाब झाल्यास ओरल रीहायड्रेशन सोल्युशनची (ओआरएस) पावडर एक लिटर पाण्यात विरघळवून वापरावी. 

पायाला फोड येणे 
काही प्रवासात बरेच चालावे लागते. अनेक ठिकाणी पायऱ्या चढाव्या लागतात. अशा वेळेस पादत्राणे खूप घट्ट असतील किंवा कडक असतील, तर पायांना फोड येतात. पुढे चालणे अशक्य होते. काही देवस्थानात आत अनवाणी फिरावे लागते. उन्हाळ्यामुळे फरश्या तापलेल्या असतात. अशानेही पायांना फोड येऊ शकतात. फोड येऊ नयेत म्हणून पादत्राणे योग्य आकाराची वापरावीत. फोड आल्यास ते स्वच्छ करून त्यांच्यावर चिकटपट्ट्या लावाव्यात. पाय स्वच्छ ठेवावेत. सूज असल्यास त्यासाठी डॉक्टरांना विचारून गोळ्या घ्याव्यात.

गाडी लागणे 
अनेकांना बसमध्ये, बोटीत, विमानात बसल्यावर उलट्या व्हायला लागतात. याला 'मोशन सिकनेस' म्हणतात. ज्यांना असा त्रास होत असेल, त्यांनी प्रवासाआधी तीन तास जास्त जेवण करू नये, अगदी मर्यादित खावे. प्रवासादरम्यान हलके अन्न घ्यावे. प्रवासात मद्यपान, शीतपेये टाळावीत. हवाई प्रवासादरम्यान वाचन करणे किंवा टी.व्ही., व्हिडिओ पाहणे यामुळे गरगरून आल्यासारखे होते आणि उलट्या होतात. शक्य असल्यास सीट सरकवून मागे रेलून बसावे. पंख्याजवळ सीट असावे, विमानातील हवेचा ब्लोअर सुरू ठेवावा. स्टेमेटील, स्टुजेरॉन अशा गोळ्या जवळ ठेवाव्यात

कानाचे त्रास 
हवाई प्रवासात काहींचे कान दुखतात आणि कानात आवाज येतात. त्याकरिता विमान आकाशात झेपावण्यापूर्वी आणि लॅंडिंग करण्यापूर्वी पाणी पिणे, गिळणे, चुईंगम खाणे किंवा वारंवार तोंड उघडण्याची क्रिया करावी. तोंड बंद ठेवून, नाक बंद ठेवून, नाकाद्वारे श्वास बाहेर सोडण्याचा प्रयत्न करावा.  नाक बंद असेल, तर नेझल स्प्रेचा वापर करावा. सर्वसाधारण इअर प्लग्सपेक्षा फिल्टर्ड इअरचा वापर करावा. प्रवासाला निघताना ते बरोबर घ्यायला विसरू नये. 

पाय सुजणे 
काही जणांना पायांच्या रक्तवाहिन्यांत रक्ताच्या गुठळ्या (थ्रॉम्बोसिस) निर्माण होण्याची शक्यता असते. हा त्रास गंभीर ठरू शकतो. या प्रवासाच्या आधी असा त्रास झालेला  असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने अॅस्पिरीन घ्यावे. सपोर्ट स्टॉकिंग्ज व सॉक्सचा वापर करावा. विमानाच्या खुर्चीत बसल्यावर पाय सतत ताणून सरळ करणे, गुडघे ताठ करणे, तळपाय, पायाची बोटे, गुडघे हालवत राहणे असे व्यायाम करावेत. दर तासाला पाच मिनिटे टॉयलेटपर्यंत फिरून यावे. याशिवाय भरपूर पाणी प्यावे, सैल कपडे घालावेत. विमानातल्या प्रवासात शूज घालणे टाळावे. पाय दुमडून बसू नये.

लघवीचा त्रास 
प्रवासात पाणी कमी घेतले जाते. अनेकदा लांब पल्ल्याच्या बस प्रवासादरम्यान मूत्रविसर्जनाची संधी मिळत नाही. यामुळे मूत्रविकार, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स होऊ शकतात. मूतखड्याचा त्रास असलेल्यांना त्रास पुन्हा उद्‌भवू शकतो.

डास आणि कीटक 
अनेक ठिकाणी डासांचा आणि काही कीटकांचा त्रास जास्त असतो. त्यांच्या दंशाने काही मोठे आजार उद्‌भवू शकतात. त्यामुळे हात झाकणारे अंगरखे आणि पायघोळ पॅंट्स वापराव्यात. मस्किटो रिपेलंट, क्रीम्स वापराव्यात. साप, विंचू यांच्यापासून जपून राहावे. त्यांचा दंश झाल्यास त्वरित वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असते.
 याशिवाय सर्दी, खोकला, दम लागणे, पाय-पाठ दुखणे, काही गंभीर अपघात होण्याचे धोके असतात. त्यासाठीही काळजी घ्यावी.  

आरोग्य विमा 
भारतात काढलेला आरोग्य विमा परदेशात आजारी पडल्यास उपयोगी नसतो. साहजिकच बऱ्याच विमा कंपन्यांनी पर्यटनाच्या दृष्टीने अगदी पाच दिवसांइतक्या कमी कालावधीचा आरोग्य विमा उपलब्ध केला आहे. त्याचा वापर करावा. उदा. दुर्दैवाने परदेशात रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली, तर तुमच्यावर अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार नाही. याकरिता आंतरराष्ट्रीय प्रवासी आरोग्य विम्याचा जरूर वापर करावा. दीर्घकालीन आजार, विमा घेताना आधीपासून असलेले आजार आणि त्रास यांची त्यात प्रामाणिकपणे नोंद करावी.
 नेहमीच्या पठडीपेक्षा वेगळा आनंद मिळवण्यासाठी, काही तरी वेगळे अनुभवण्यासाठी किंवा रीलॅक्स होण्यासाठी पर्यटन केले जाते. आरोग्याबाबत त्यात काळजी घेतल्यास हा आनंद अबाधित राहू शकतो.   

संबंधित बातम्या