निसर्गसौंदर्याने नटलेले बांफ

डॉ. राधिका टिपरे
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जागतिक पर्यटन
 

कॅनडाच्या रॉकी पर्वतमालेमधील जॅस्पर राष्ट्रीय उद्यानात चार दिवस कँपिंग करून राहिल्यानंतर परतीच्या वाटेवर बांफ उद्यानातील काही महत्त्वाच्या जागा पाहूनच एडमंटनला पोचायचे होते. त्यासाठी अगदी भल्या पहाटे उठून निघायची तयारी केली. मुख्य म्हणजे सामानाची आवराआवर, टेंट काढायचा, त्याचे पॅकिंग करावयाचे या वेळखाऊ गोष्टी पार पाडायच्या होत्या. ब्रेड, बटर, कॉफी हा सोप्पा नाश्ता घेतला आणि आम्ही मार्गस्थ झालो. कॅनेडियन रॉकीजच्या पर्वतरांगांमधून काळ्याभोर गुळगुळीत रस्त्यावरून मैलोनमैल प्रवास केला, तरी तो कंटाळवाणा होत नाही हे मात्र खरे. कारण पदोपदी निसर्गाची रम्य रूपे आपल्या नजरेला अक्षरशः जखडून ठेवतात. नजरेला पडणारी प्रत्येक चौकट मला खुणावत राहायची आणि ती चौकट कॅमेऱ्या‍त बंदिस्त केल्याशिवाय मन स्वस्थ बसायचे नाही. कॅनेडियन रॉकी पर्वतरांगांमध्ये ‘कोलंबिया आईसफिल्ड’ या नावाने ओळखले जाणारे प्रचंड आकाराचे बर्फाने खचाखच भरलेले क्षेत्र आहे. या अथांग आईसफिल्डमध्ये अनेक हिमनद्या आहेत... अनेक बर्फाच्छादित शिखरे आहेत. हा आईसफिल्ड किंवा बर्फाच्छादित प्रदेश कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया आणि अल्बर्टा या दोन राज्यांच्या सीमारेषेवर पसरलेला आहे. हे बर्फाच्छादित क्षेत्र किंवा आईसफिल्ड अर्धे जॅस्पर नॅशनल पार्कमध्ये तर अर्धे बांफ नॅशनल पार्कमध्ये सामावलेले आहे. जॅस्परच्या जंगलात चार दिवस कँपिंग करून आता बांफ नॅशनल पार्क बघायला निघालो होतो... तेव्हा वाटेतच असणाऱ्‍या या कोलंबिया आईसफिल्डचा एक हिस्सा असणारी हिमनदी म्हणजेच ‘अ‍ॅथाबास्का ग्लेशियर’ आम्ही प्रवास करत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाजवळच असल्यामुळे ती पाहायला थांबायचे होते. खरे तर दोन दिवस आधी या आईसफिल्डपर्यंत येऊन परत गेलो होतो. अ‍ॅथाबास्का हिमनदी अगदी रस्त्यावर थांबूनही पाहता येईल इतकी जवळ असल्यामुळे परत जाताना पाहायची असे ठरवले होते. हिमनदीजवळ पोचण्याच्या थोडे आधी मुख्य राष्ट्रीय महामार्गावर एका ठिकाणी ग्लेशियर स्कायवॉक ही जगावेगळी संकल्पना राबवलेली आहे. या ठिकाणी लोखंडाच्या आधाराने एक मोठी बाल्कनी तयार केलेली आहे, जी पहाडाच्या कड्यावर दरीच्या आतमध्ये घेण्यात आलेली आहे. या संपूर्ण बाल्कनीला काच लावलेली आहे, ज्यावरून चालताना तुम्हाला पायाखाली असलेल्या खोल दरीमध्ये पाहण्याची संधी मिळते. ही बाल्कनी कड्यापासून बऱ्यापैकी पुढे घेतलेली असल्यामुळे जवळजवळ हजार फूट खोल दरीचे आणि बाजूला असणाऱ्या बर्फाच्छादित शिखरांचे अत्यंत मनोहारी दर्शन आपल्याला घडते. या स्कायवॉकचा आगळावेगळा अनुभव घेतल्यानंतर आम्ही काही अंतरावर असलेल्या ग्लेशियरजवळ पोचलो.

तिथे पोचल्यानंतर खरेतर अगदी रस्त्यावरूनच आपल्याला हा ग्लेशियर दिसतो, पण अर्ध्या तासाची लहानशी चढण चढून आपण अगदी ग्लेशियरजवळ जाऊ शकतो. गाडी पार्क करून आम्ही खाली उतरलो. प्रचंड थंडी आणि बोचरे वारे होते. कपड्यांचे चार थर अंगात घातलेले होते, तरीही थंडी वाजत होती. थोडीशी चढण होती; पण अर्ध्या तासात मी माझ्या सात वर्षांच्या नातवाबरोबर अगदी ग्लेशियरच्या समोर जाऊन उभी राहिले. मात्र आता पूर्वीप्रमाणे भराभरा डोंगर चढणे शक्य होत नाही, हे मात्र तीव्रतेने जाणवले. हिमालयात खूप पदभ्रमण केले होते. पण तो अनुभवच वेगळा असायचा. इथे कॅनडामधील या ‘अ‍ॅथाबास्का ग्लेशियर’च्या समोर उभे राहून त्याचे रौद्रभयानक सौंदर्य न्याहाळण्याची संधी अगदी सहजासहजी मिळाली होती. या अ‍ॅथाबास्का ग्लेशियरमधूनच अ‍ॅथाबास्का नदीचा उगम होतो. कोलंबिया आईसफिल्डच्या सनवाप्ता नावाच्या शिखराजवळ सनवाप्ता नदीचा उगम होतो. या नदीवरील धबधबा आदल्या दिवशी पाहिला होताच. ही नदी आणि अ‍ॅथाबास्का नदी यांचा वाटेत झालेला संगमही येताना पाहिला होता. कॅनेडीयन रॉकीजमधील एका नदीच्या उगमाजवळ पोचल्याचा आनंद मनात दाटून राहिला होता. नदीच्या मुखापर्यंत पोचल्याचा आनंद हा होतोच...! भले इथे अगदी सहजासहजी याठिकाणी पोचलो होतो तरी...! विशेष म्हणजे प्रचंड आकाराची चाके असणाऱ्या, दगडासारख्या बर्फावर चालणाऱ्या, बसमधून पर्यटकांना साक्षात हिमनदीवर घेऊन जाण्याची सोय इथे आहे, पण त्यासाठी वेगळे आरक्षण करावे लागते. आम्हाला त्यात रस नव्हता. कारण बर्फावर चालताना पडून काही झाले, तर कॅनडामध्ये दवाखान्यात जाणे आम्हाला आत्यंतिक महाग पडणार होते. कोलंबिया आईसफिल्डच्या समोरच, डोंगररांगांच्या उतारावर कँपसाईट आहे. तुमची इच्छा असेल, तर हिमनदीच्या अगदी समोर तुम्ही रात्रीसाठी मुक्कामाला राहू शकता... असो, आम्ही हिमनदी पाहून झाल्यानंतर पुढच्या प्रवासाला निघालो. 

हे कोलंबिया आईसफिल्ड बरोबर जॅस्पर आणि बांफ या दोन्ही उद्यानांच्या सीमारेषेवर असल्यामुळे काही मिनिटांतच आम्ही बांफ नॅशनल पार्कच्या हद्दीत प्रवेश केला होता. या राष्ट्रीय उद्यानात बांफ नावाचे अत्यंत सुंदर आणि देखणे गाव आहे. जॅस्पर प्रमाणेच, लहानसे आणि टुमदार...! रॉकीजच्या पर्वत रांगांमधील ही लहानलहान गावे म्हणजे आपल्याकडे, हिमालयातील शिवालीक रांगांमध्ये असलेल्या मनाली, मसुरी, नैनिताल, कसौली, कौसानी या सारख्या शहरांचीच आवृत्ती होय. आम्ही बांफमध्ये मुक्कामाला राहणार नव्हतो, पण या उद्यानातील अत्यंत रमणीय असे महत्त्वाचे तलाव पाहून आम्हाला एडमंटनला पोचायचे होते. या वाटेवरील पहिला तलाव होता ‘बो लेक’ या नावाचा. हा बो लेक पाहण्यासाठी हायवे सोडून थोडी वाकडी वाट करून आम्ही बो ग्लेशियरच्या दिशेने गेलो. पार्किंग एरियामध्ये गाडी पार्क करून चालतच आपल्याला या तलावाच्या दिशेने जावे लागते. याठिकाणी उंच पर्वत शिखरांनी वेढलेल्या जागेत एका बाजूने खाली उतरणारा बो ग्लेशियर आणि त्यातून कोसळणारा धबधबा पाहायला मिळतो. या धबधब्यातून कोसळणारे पाणी डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या‍ सुंदर तलावात पडत होते... काय रंग होता या तलावाचा म्हणून सांगू....! निळ्या रंगाची ही छटा पाहून नजर संतृप्त झाली. एका बाजूला कोसळणारा बो वॉटर फॉल... दुसऱ्या बाजूला त्रिकोणी आकाराचे एक शिखर आणि पायथ्याशी पसरलेला निळ्या स्फटिकासारख्या निर्मळ पाण्याचा जलाशय...! त्या निळ्या पाण्यातील तळ आणि तळातील दगडगोटेसुद्धा अगदी स्पष्ट आणि सुंदर दिसत होते. खरे तर वर्णन करण्यास शब्द नाहीत माझ्याकडे... ते दृश्य इतके सुंदर होते, की फक्त डोळ्यात साठवून घेतले. फोटो तरी किती काढणार? बर्फासारख्या थंडगार पाण्यात कितीही इच्छा असली, तरी पाय घालायचे धाडस न करता काही वेळातच त्या निसर्गरम्य जागेचा निरोप घेतला आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. 

यानंतरचे महत्त्वाचे ठिकाण होते लेक लुईझी. बो तलावापासून लुईझी तलावाजवळ पोचायला फार वेळ लागला नाही. कॅनडाच्या आंतरराष्ट्रीय महामार्गापासून केवळ एक किलोमीटर आतमध्ये असल्यामुळे चटकन लेकजवळ पोचलो. खूप गर्दी होती. पार्किंग एरिया गाड्या आणि आरव्ही यांनी भरलेला होता. या दिवसांत कॅनडाच्या उत्तरेकडील अल्बटार्र राज्यात सूर्य लवकर मावळत नाही, कारण हा भाग आर्क्टिक प्रदेशात येतो. ‘लेक लुईझी’ या नावाचे लहानसे खेडे तलावापासून जवळच पाच किमी अंतरावर आहे. ‘लहान माशांचा तलाव’ (लेक ऑफ स्मॉल फिश) असं बिरुद मिळालेला हा अत्यंत सुंदर तलावसुद्धा हिमनदीच्या मुखातून विरघळलेल्या बर्फाच्या पाण्यामुळे तयार झालेला असून, चोहोबाजूंनी उंच उंच बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेला आहे. तलाव आकाराने फार मोठा नाही. हिमनदीच्या पोटातून येणाऱ्या पाण्याची सतत भर पडत असल्यामुळे ओव्हरफ्लो होणारे पाणी तलावाच्या  दुसऱ्या बाजूने लुईझी नदीच्या रूपात पुढे वाहत राहते. हा प्रवाह पुढे बो लेक मधून निघणाऱ्‍या बो नदीला जाऊन मिळतो. रॉकीजमध्ये अशा अगणित हिमनद्या असून त्यातून अनेक लहान मोठ्या नद्या उगम पावतात आणि खळाळत वाहत असतात. पुढे याच नद्या एकमेकींत मिसळून वाहत मुख्य नदीच्या नावाने ओळखल्या जातात. लुईझी तलावाच्या एका बाजूला एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात कॅनेडियन रेल्वेने बांधलेली एक जुनी कोठी आहे. तलावाच्या काठावर असलेले ‘फेअरमाँट्स चॅट्यू लेक लुईझी’ हे भव्य रिसॉर्ट म्हणजे ऐतिहासिक पार्श्‍वभूमी असलेल्या या कोठीचे आधुनिक रूपांतर आहे. त्यामुळेच लेक लुईझी तलावाचा समावेश युनेस्को वर्ल्ड हेरिटेजच्या यादीमध्ये केलेला आहे. या तलावाच्या पाण्याचा मोरपिशी रंग पाहून अक्षरशः संमोहित झाल्यागत अवस्था झाली होती. यापूर्वी मी कैलास-मानस यात्रेदरम्यान मानस सरोवराच्या पाण्याचे रंगवैविध्य पाहून भारावून गेले होते. पण कॅनडा येथील रॉकी पर्वतमालेमध्ये विखुरलेल्या अगणित लहान मोठ्या तलावाचे निळ्या रंगाच्या विविध छटांमधील रंगसौंदर्य पाहून चकित झाले, असे इथे आवर्जून सांगावेसे वाटते. मुळातच या निसर्गदत्त सौंदर्याची अत्यंत काटेकोरपणे नीटनेटकी निगा राखल्यामुळे आणि त्याला स्वच्छतेची जोड असल्यामुळे या डोंगर रांगांना आणि नद्या तलावांना तसेच दऱ्‍या खोऱ्‍यांना स्वर्गीय सौंदर्याचे परिमाण लाभले आहे असे वाटत राहते. कुठेही घाण नाही, कचरा नाही, प्लॅस्टिकचे ढीग नाहीत; यामुळे अक्षरशः विशुद्ध निसर्ग आणि शुद्ध हवा यांचा उत्कट अनुभव आपल्याला घेता येतो. या लेक लुईझीला त्याचे नाव मिळाले आहे, ते राजकुमारी लुईझी कॅरोलीन अल्बर्टा हिच्या सन्मानाप्रीत्यर्थ. ही राजकुमारी इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरिया हिची चौथी कन्या! तिचा विवाह कॅनडाचे तत्कालीन गव्हर्नर ‘मार्क्वीस ऑफ लोर्न’ यांच्याशी झाला होता. लेक लुईझीच्या पाण्यामध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत कनो घेऊन विहार करता येतोच, त्याचबरोबर कयाकिंग करण्यासाठी हौशी कयाकर्सची प्रचंड गर्दी होते. मात्र, लेक लुईझीचे महत्त्व हिवाळ्यात खऱ्‍या अर्थाने द्विगुणित होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जेव्हा येथील तापमान उणे तीस ते पस्तीस अंश सेल्सिअस असते आणि सर्वत्र पांढऱ्‍याशुभ्र बर्फाची चादर पसरलेली असते, तेव्हा येथे स्किइंग करण्यासाठी जगभरातून हौशे आणि नवशे स्किइंगपटू येतात. कारण जानेवारीच्या सुमारास येथे स्किइंग या खेळाचे जागतिक प्रदर्शन (वर्ल्ड कप) आयोजित केले जाते. त्याशिवाय याच सुमारास ‘आईस कार्व्हिंग’ म्हणजेच बर्फातील शिल्पकलेचा जागतिक उत्सवही साजरा केला जातो. आपण भारतात ज्या थंडीची कल्पनाही करू शकणार नाही, अशा थंडीत कॅनेडियन मंडळी आत्यंतिक उत्साहाने बर्फातील अनेक खेळांचा आनंद लुटत असतात... यामध्ये आईस स्केटिंग, स्किइंग, आईस हॉकी, माउंटन स्किइंग असे अनेक प्रकार आहेत. माझा लहानगा नातू आणि कॅनडात राहणारा मुलगा तसेच माझी युक्रेनियन सूनबाई हे सर्वचजण स्किइंग करण्यासाठी बर्फाने दगड झालेल्या लेक लुईझीला हिवाळ्यात भेट देण्यासाठी गेले होते. लेक लुईझीच्या वरच्या बाजूला असणाऱ्‍या जंगलात आणि आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यांत रॉकीजमधील जगप्रसिद्ध ग्रेझली बेअर आणि ब्लॅक बेअर यांचा भरपूर वावर असतो. तेथून वरच्या भागात जाण्यासाठी गंडोलाची सोयसुद्धा आहे. हे गंडोला म्हणजे केबल कार...! थंडीच्या दिवसांत या केबलकारमध्ये बसून स्की बरोबर घेऊन पर्यटक डोंगराच्या माथ्यावरती जातात. तेथून बर्फातील उतारावरून स्किइंग करत ही मंडळी खाली येतात. उन्हाळ्याच्या दिवसांत या गंडोलामध्ये बसून आपण हळूहळू उंच जातो, तेव्हा बऱ्‍याच वेळा खालच्या उतारावर ग्रेझली अस्वले पाहायला मिळतात. ग्रेझली अस्वलांना रानफुले खायला आवडतात. त्यामुळे उतारावर रानफुले फुललेली असतात त्या काळात हमखास त्यांचे दर्शन होते. वेळेअभावी अर्थातच आम्हाला हा अनुभव घेता आला नाही. प्रचंड गर्दी असलेल्या लेक लुईझीच्या परिसरात काही वेळ घालवून आम्ही तेथून जवळच असलेल्या मोरेन लेककडे जाण्यासाठी निघालो.

लेक लुईझीपासून अगदी थोड्या अंतरावरच लेक मोरेनकडे जाण्यासाठीचे वळण आहे. गर्दीमुळे थोडावेळ पार्किंगमध्ये थांबल्यानंतर आम्हाला मोरेन लेक पाहण्यासाठी ‘व्हॅली ऑफ टेन पिक्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्‍या खोऱ्‍यामध्ये जाण्यासाठी परवानगी मिळाली! आम्ही दहा शिखरांच्या त्या निसर्गरम्य खोऱ्‍यात शिरलो... आणि खूप आनंद झाला. फक्त दहा ते बारा किमीचा रस्ता होता तो... पण दोन्ही बाजूंना हिरव्यागार घनदाट जंगलाने वेढलेला. मुख्यत्वे सूचीपर्णी वृक्षांची घनदाट झाडी होती. जोडीला इतरही वृक्ष होते. पण लहानलहान रानफुलांनी अवघा परिसर नटलेला होता. गडद निळ्या आकाशाच्या पार्श्‍वभूमीवर एकापुढे एक अशा दहा बर्फाच्छादित शिखरांची मांदियाळी आरास मांडावी त्याप्रमाणे उठून दिसत होती. खरेच, हे सगळे पाहताना मन अगदी प्रसन्न होऊन गेले. काही मिनिटांतच आम्ही मोरेन तलावाच्या जवळ पोचलो. थोडेस चालून पुढे गेल्यानंतर मोरेन तलाव नजरेला पडला. खरोखर, कुठल्या शब्दांत या निळ्या जलाशयाचे वर्णन करावे तेच कळत नाही! एखाद्या गडद नीलमण्यागत चमकणारा तो तलाव पाहून खरोखरच डोळ्यांचे पारणे फिटले... निळा, पाचूच्या रंगाचा किंवा मोरपिशी निळा अशा अनेक छटा तलावाच्या वेगवेगळ्या भागात चमकत होत्या. तलावाच्या समोरची बाजू डोंगररांगांनी बंदिस्त होती. एकापुढे एक अशा दहा शिखरांचे विविध आकारातील देखणे रूप काही ठिकाणी तलावात प्रतिबिंबित होताना दिसत होते. दुसऱ्‍या बाजूला घनदाट झाडी होती आणि त्याच बाजूला पदभ्रमण करणाऱ्‍यांसाठी पायवाट होती. आम्ही या वाटेने तलावाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोचलो. तिथून डोंगर उतारांवरून घसरत येणारा ग्लेशियर दिसत होता. हा ग्लेशियर फार मोठा नव्हता, पण त्यातून कोसळणारे पाणी धारेच्या रूपाने तलावाच्या दिशेने येत होते. तलाव ज्या ठिकाणी संपतो तेथून आम्ही परत फिरलो, कारण वेळेचे गणित गृहीत धरणे आवश्यक होते. पुढे काही अंतरावर लहानसा धबधबा आहे, असे तिथे भेटलेल्या पुण्याच्या, पण अमेरिकेत राहणाऱ्‍या भारतीय जोडीने सांगितले. सारंगच्या इच्छेनुसार आम्ही ‘रॉक पाईल ट्रेल’ या छोट्याशा पायवाटेवरून तलावाच्या वरच्या बाजूला जाण्यासाठी निघालो. माझा गुडघा दुखत होता खरा... पण नातू ‘आजी डोंट वरी, आय विल होल्ड यूवर हँड,’ असे म्हणून मला त्या दगडी पायऱ्‍यांवरून नेत होता. पण वर गेल्यानंतर मोरेन तलावाचे दिसणारे रूप पाहून डोळ्यांचे पारणे फिटलेच... पण निसर्ग किती आणि कशा स्वरूपात दैवी साक्षात्कार करवतो त्याचे नवल वाटत राहिले. असे म्हणतात, की मोरेन तलावाचे त्या टेकाडावरून दिसणारे दृश्य हे कॅनेडियन रॉकीजमध्ये सर्वांत जास्त फोटोग्राफी करण्यात येणारे सुंदर दृश्य आहे. हे दृश्य कॅनडामध्ये ‘ट्वेंटी डॉलर व्ह्यू’ म्हणून प्रसिद्ध आहे. कारण १९६९ आणि ७९ मध्ये काढलेल्या वीस डॉलरच्या कॅनेडियन नोटेवर पाठीमागच्या बाजूला मोरेन तलावाचे हे दृश्य छापलेले आहे. आम्हाला त्या सुंदर दृश्याचा मोह सोडून तेथून निघणे अनिवार्य होते... कारण तेथून पुढील प्रवास भरपूर लांबचा होता.

आठपदरी राष्ट्रीय महामार्गावरून वेगाने जात असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला केवळ आणि केवळ जंगलच दिसत होते. विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारे वन्यजीव रस्त्यावर येऊन अपघात घडू नये यासाठी संपूर्ण रस्त्याला जाळीचे कुंपण घातलेले होते. या शिवाय रस्त्यावर वारंवार मोठमोठाले उड्डाण पूल बांधलेले होते आणि या पुलाखालून केवळ जंगलातील प्राण्यांना ये-जा करण्यासाठी मार्ग उपलब्ध करून दिलेला होता. काही ठिकाणी रस्त्याच्या वरून जंगलाचे जोडमार्ग किंवा कॉरीडॉर तयार केलेले होते, जेणेकरून हरणांचे कळप आरामात एका बाजूकडून दुसऱ्‍या बाजूला जाऊ शकत होते. जंगली प्राण्यांच्या अस्तित्वाला माणसांकडून कुठलेही अतिक्रमण होणार नाही यासाठी घेतलेली ही खबरदारी पाहून मनात आले, इथे जनावरांसाठी इतकी काळजी घेतली जाते. माझ्या देशात माणसासाठीसुद्धा अशी काळजी घेतली जात नाही. मग प्राण्यांच्या वाटेला हे सुख कधी मिळेल याची अपेक्षा करणेच दुरापास्त आहे. वाटेत रस्त्याच्या कडेला, जाळीच्या पलीकडे दोन-तीन वेळा गुबगुबीत काळी अस्वले दिसली. पण विशेष म्हणजे एकदा प्रचंड आकाराचे ग्रेझली अस्वलही दिसले. पण गाडीचा वेग आणि अशा हायवेवर अजिबात थांबायचे नसते, या गोष्टीमुळे त्याचा फोटो काढण्याचा विचारही करता आला नाही. वाटेत बांफ ऐवजी कॅनमोर नावाच्या एका चिमुकल्या खेडेगावात (कॅनडातील खेडेगाव म्हणजे आपल्या मुंबईपेक्षा चकाचक) बोस्टन पिझ्झामध्ये भला दांडगा पिझ्झा खाल्ला आणि पुढील प्रवास न थांबता पार पाडला. रात्री नऊनंतर या हायवेवर अजिबात ट्रॅफिक नव्हता. ट्रक तर नाहीच नाही, पण एखाददुसरी गाडीसुद्धा जोडीला नव्हती. इकडे रात्री कुणी फारसे ड्रायव्हींग करतच नाही बहुधा. त्या अवाढव्य रस्त्यावरून केवळ आमचीच गाडी ठरावीक वेगात दामटत होतो. रस्ता रिकामा आहे म्हणून भन्नाट वेगाने गाडी दामटली असे इथे चालतच नाही. मनातल्या मनात प्रचंड भीती वाटत होती, पण अडीचच्या सुमारास घरी पोचलो आणि नि:श्‍वास सोडला. कॅनडामधील जॅस्पर आणि बांफ ही दोन्ही उद्याने पाहून सुखरूप घरी परतलो होतो, या समाधानात लगेचच अंथरुणात शिरलो...!

संबंधित बातम्या