इतिहासाचा मूक साक्षीदार 

प्रतिमा दुरुगकर 
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जागतिक पर्यटन
 

यावेळच्या अमेरिकावारीत आम्ही टेक्‍सासमधील ऑस्टिन या राजधानीच्या शहरात राहिलो. एका रविवारी तेथून ९० मैलांवरील सॅन अँटोनिओ या ऐतिहासिक शहराला भेट देण्याचे ठरवले. तेथील स्पॅनिश मिशन्स (एकूण पाच) ही २०१५ मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केली आहेत. त्यापैकी सॅन होजे या मिशनला आम्ही भेट दिली. 

उन्हाळ्यातील ती कडकडीत दुपार होती. आम्ही मिशनच्या प्रवेशद्वारातून आत शिरलो आणि विस्तीर्ण अशा चौकोनी प्राकारात प्रवेश केला. उजवीकडे, समोर व डावीकडे तीनही बाजूंना छोट्या छोट्या दगडी खोल्या होत्या. त्यांना लाकडी दारे, खिडक्‍या होती. प्रवेशद्वाराच्या भिंतीला लागून उजवीकडे दुमजली बांधकाम आणि चर्च होते. हे टेक्‍सासमधील सर्वांत जुने चर्च, समोरच मागचे प्रवेशद्वार होते. त्यातून बाहेर पडून आम्ही मागच्या परिसरातील इमारतीमध्ये गेलो. तेथे छोटेसे थिएटर व गिफ्ट शॉप होते. थिएटरमध्ये आम्ही या स्थळाच्या इतिहासावर आधारित केलेली छोटीशी फिल्म बघितली व त्यानंतर आम्हाला तेथील गाइडने (ती एक हसरी, नाजूक बांध्याची तरुणी होती.) सर्व परिसर फिरून माहिती दिली. (दुपारी तीनपर्यंत प्रत्येक तासाला अशा गायडेड टूर्स तेथे आयोजित केल्या जातात.) 

पुन्हा एकदा मागच्या प्रवेशद्वाराने आम्ही आत शिरलो आणि मग त्या परिसराचा इतिहास आमच्या समोर उलगडला. साधारणपणे १६ व्या, १७ व्या शतकात अमेरिकेच्या नॉर्थ ईस्ट भागात (न्यू इंग्लंड) इंग्रजांच्या वसाहती होत्या. टेक्‍सासच्या पूर्वेकडे लुझियाना भागात फ्रेंच वसाहती होत्या, तर स्पेनच्या मेक्‍सिकोत होत्या. फ्रेंच पश्‍चिमेकडे सरकण्यापूर्वी स्पॅनिश टेक्‍सासमध्ये गेले. १७ व्या शतकात टेक्‍सासच्या परिसरात अनेक भटक्‍या टोळ्या होत्या. त्या शिकार व फळे गोळा करून गुजराण करीत असत. Apach व Comanche या वायव्य टेक्‍सासमधील टोळ्या होत्या. त्यांना त्यांच्या परिसरातून स्पॅनिश लोकांनी हुसकावून लावले. तेव्हा त्या दक्षिणेकडे सरकल्या. त्यांनी स्पॅनिश लोकांच्या घोड्यावर स्वार होणे व भाला चालविणे या दोन कला आत्मसात केल्या. त्यामुळे या टोळ्या शक्तिमान झाल्या व त्यांची दहशत पसरली. तेव्हा दक्षिण टेक्‍सासमध्ये राहणाऱ्या टोळ्यांमध्ये दक्षिणेकडून स्पॅनिश लोकांद्वारे पसरलेल्या साथींच्या रोगांची लागण झाली होती. त्यासाठीची प्रतिकारशक्ती (Imunity) त्यांच्यात नव्हती. हे काय होत आहे, हेच त्यांना कळेना. माणसे पटापट मरू लागली. तशातच वायव्येकडून आलेल्या Apache व Comanche टोळ्यांनी त्यांच्यावर हल्ले करण्यास सुरुवात केली. दोन्ही बाजूंनी कोंडीत सापडलेल्या या स्थानिक टोळ्या शेवटी स्पॅनिश मिशनच्या आश्रयाला गेल्या. १८ व्या शतकाची सुरुवात झाली होती. १६९१ मध्ये काही स्पॅनिश मिशनरी सॅन अँटोनिओ नदीकाठी आले होते. त्यांनी या नदीला हे नाव दिले. १७०९ मध्ये मिशनची स्थापना झाली होती. कॅथलिक ख्रिश्‍चन धर्मप्रसारासाठी जरी मुख्यतः स्पॅनिश मिशनरी येथे वसाहत करण्यात आले होते, तरी फ्रेंचांना रोखणे हा त्यांचा उद्देश होताच. त्यांनी नदीकाठी चर्च व त्याभोवती चौकोनी भिंत बांधून खोल्या बांधल्या. टोळीतील जे लोक ख्रिश्‍चन होण्यास तयार होते त्यांना खोल्यांतून राहण्यास परवानगी मिळाली. तेथे स्पॅनिश मिशनरी लोकांनी या रानटी लोकांना सुतारकाम, लोहारकाम, शेती, कुंभारकाम इ. शिकविण्यास सुरुवात केली. त्यामुळे अश्‍मयुगात जगणाऱ्या या टोळ्या एकदम Iron Age मध्ये आल्या. पण तरीही स्वच्छता हा प्रकार त्यांना माहीत नव्हता. भटक्‍या जीवनात त्याची गरजही नव्हती. पण आता नवीनच प्रश्‍न उभे राहिले. स्वच्छतेअभावी रोग पसरू लागले. साथीचे रोग व हे रोग यामुळे माणसे मरू लागली. स्पॅनिश लोक त्यांच्या परीने सर्व प्रयत्न करीत होते. धर्मप्रसाराबरोबर औषधोपचार व शिक्षण सुरू होते. पण या सर्व घडामोडीत ८० टक्के स्थानिक लोक मेले. 

ते ज्या खोल्यांमधून राहत होते. त्या खोल्या आम्ही आत जाऊन पाहिल्या. मधल्या चौकात काही दगडी बांधकामे होती. ती मांस भाजण्याची स्मोकर होती. ख्रिश्‍चन धर्माचा स्वीकार करेपर्यंत स्थानिक लोकांना ब्रेड खाण्याची परवानगी नव्हती. गहू त्यावेळी युरोपातून आणावा लागे. त्यांना चर्चच्या आत प्रवेशही नव्हता. परंतु, त्या बंदिस्त जागेत त्यांना संरक्षण मात्र दिले गेले. शिवाय त्यांना अनेक गोष्टी शिकविल्या गेल्या. १७५६ मध्ये मिशनची लोकसंख्या सर्वाधिक म्हणजे ३२८ होती. ते सर्व लोक या खोल्यांमधून राहत होते. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करीत होते. रोगांमुळे जर्जर झाले होते. ते वातावरण कसे असेल? असा विचार करून माझे मन सुन्न झाले. निसर्गाच्या सान्निध्यात उत्फुल्ल जीवन जगणारी ही माणसे वसाहतवाद, आधुनिकीकरण यांच्या झंझावातात सापडली. जवळ-जवळ नामशेष झाली. जी काही थोडी जगली, त्यांचे वंशज आजही या गावात राहतात. पुढे फ्रेंचांचा प्रभाव कमी झाल्यावर स्पॅनिश मिशनरी चर्चच्या आदेशानुसार कॅलिफोर्नियाकडे गेले. जाताना ख्रिश्‍चन झालेल्या स्थानिकांना त्यांनी स्पॅनिश हा दर्जा दिला व तेथील जमिनीचे मालकी हक्कही दिले. 

मिशनच्या परिसरातील जमिनीवर शेती करण्यास या स्थानिक लोकांना स्पॅनिश मिशनऱ्यांनी शिकवले. ही शेतजमीन प्रचंड विस्ताराची होती. साहजिकच त्याची राखण घोड्यावरून केली जाई. हे लोक म्हणजेच टेक्सासचे प्रसिद्ध काऊ-बॉय. त्यांची ती हॅटही प्रसिद्ध आहेच. मिशनमधील चर्च टेक्सासमधील सर्वांत जुने चर्च आहे. त्याची वेळोवेळी पुनर्रचना केलेली आहे. त्याचे स्थापत्य कलात्मक आणि त्या काळात घेऊन जाणारे आहे. या चर्चच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्पॅनिश मिशनरी लोकांनी स्थानिकांच्या देवीची मूर्ती बसवली आहे. चर्च शेजारी धर्मगुरू व इतर मिशनरीची राहण्याची व्यवस्था दुमजली इमारतीमध्ये केली होती. त्याचे अवशेष रोमन स्थापत्याची आठवण करून देतात. आत दोन छोट्या विहिरी आहेत.

इतिहास जाणून घेतल्यामुळे असेल, पण मला तो सगळा परिसर उदास वाटला. स्पॅनिश एम्पायरचा भाग असलेला हा परिसर नंतर मेक्सिकन रिपब्लिकचा भाग झाला (इ.स. १८२१). पुढे टेक्सास स्वतंत्र झाला व नंतर तो अमेरिकेत १८४५ मध्ये २८ वे राज्य म्हणून सामील झाला. आज सॅन अँटोनिओ ही टेक्सासची सर्वांत जुनी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. सॅन अँटोनिओ मिशन हे ऐतिहासिक उद्यान आहे. तसेच युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळसुद्धा आहे. इतिहासाचा मूक साक्षीदार असलेले हे मिशन आजही इतिहासाच्या पाऊलखुणा जपते आहे.  

संबंधित बातम्या