उगवत्या सूर्याचा देश 

विवेक गोळे
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

जागतिक पर्यटन
 

जपानबद्दल आपण अनेकदा ऐकलेले असते. मग ते उगवत्या सूर्याचा देश म्हणून असो, जपानी कार्यक्षमतेबद्दल असो किंवा आपल्याशी साधर्म्य असलेल्या चहाच्या प्रेमाबद्दल असो. पण प्रत्यक्षात जपान पाहिलेला नसतो किंवा भेटीचा योग आलेला नसतो. प्रत्यक्षात जपानमध्ये यापेक्षा बरेच काही आहे. 

जपानचे पूर्वीचे नाव ‘निपॉन’, ज्याचा जपानी भाषेतील अर्थ म्हणजे ‘उगवत्या सूर्याचा देश.’ (त्यामुळेच जपानच्या एअरलाईन्सचे नाव ‘अल निपॉन’ असे आहे.) 
पूर्व आशियामधलाच हा एक देश. पण बहुतेकांच्या (जपानला नातेवाईक/आप्तेष्ट नसलेल्या) प्राधान्यक्रमावर नसलेला. याची दोन कारणे म्हणजे जपानची ओळख ‘टुरिस्ट डेस्टिनेशन’पेक्षा ‘कमर्शिअलाईझ्ड कंट्री’ अशी जास्त आहे. दुसरे कारण म्हणजे, भाषेची समस्या. नुसता भाषेचा अडसर जरी दूर झाला, तरी हा देश पर्यटनाबाबत युरोप-अमेरिकेच्या तोडीचा आहे. ती क्षमता या देशात आहे. 

अतिशय छान हवा, नैसर्गिक सौंदर्य आणि वन्यप्राणी विश्‍व यामुळे जपानबद्दल आकर्षण वाटते. जपानचा इतिहास आपल्याला अनेकदा हिरोशिमा, नागासाकीपर्यंतच माहीत असतो. खरेतर, ख्रिस्तपूर्व काळाचा इतिहास असलेले जे काही मोजके देश आहेत, त्यातला एक जपान आहे. त्यामुळे अर्थातच सांस्कृतिकदृष्ट्या जपानला समृद्ध वारसा लाभला आहे. चक्क २३ युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट्स जपानमध्ये आहेत. भारतीय पर्यटकांसाठी जपानला जाण्याची योग्य वेळ मार्च ते मे आहे. हा काळ अनुकूल हवामान आणि त्याहून जास्त चेरी ब्लॉसमचा असल्याने जपान पाहण्यासाठी अगदी योग्य ठरतो. जपानला जाताना एंट्रीसाठी टोकियोचा नारिता एअरपोर्ट आणि एक्झिटसाठी ओसाकाचा कन्साई एअरपोर्ट सोयीचा पडतो. टोकियो टू टोकियो फ्लाईट घेतल्यास तुम्हाला ट्रिप संपल्यावर ओसाका वरून टोकियोला परत यावे लागते. 
जपानचा व्हिसा फारसा अवघड नाही. कुठल्याही इंटरव्ह्यू किंवा अधिक डॉक्युमेंट्सची गरज नसते. १५ दिवसाचा सिंगल एंट्री व्हिसा सर्वसाधारणपणे पर्यटकाला मिळून जातो.
ग्रुपने ट्रॅव्हल करणे अनेक कारणांसाठी सोयीचे पडते. भाषेची समस्या तर आहेच, पण जपान मुलखाचा महागडा देश आहे. ग्रुपबरोबर गेल्यास ट्रान्सपोर्टसह अनेक खर्च वाटले जातात आणि जेवणाचीही समस्या येत नाही. 

ग्रुपबरोबर न जाता तुमचा कस्टमाईज्ड ट्रिपचा प्लॅन असेल, तर जपान फिरण्यासाठी सर्वोत्तम मार्ग म्हणजे जेआर पास. या पासने तुम्ही सिटी टू सिटी सुपरफास्ट बुलेट ट्रेन्सचा प्रवास अतिशय किरकोळ किमतीत करू शकता. याशिवाय ज्या शहरात जाल, तिथला मेट्रो पास घेणे स्थानिक स्थलदर्शनासाठी सोयीचे पडते. जपानमधला पब्लिक ट्रान्सपोर्ट हा जागतिक दर्जाचा आहे. त्यामुळे तुम्ही टेकसॅव्ही असाल, तर तुम्ही इंटरनेट आणि गुगल ट्रान्स्लेटच्या मदतीने तुमचे जपानमधल्या पर्यटनाचे नियोजन करू शकता. हॉटेल बुकिंग्स मात्र भारतातूनच केलेली चांगली कारण चेरी ब्लॉसमच्या काळात हॉटेल्स पूर्ण भरलेली असतात आणि आयत्यावेळी काहीही सोय होणे अशक्य असते. 

टोकियो 
राजकीय आणि आर्थिक राजधानी टोकियो हे ‘इडो’ नामक मासेमाऱ्यांचे खेडे होते आणि जपानचा कारभार चालवणारी राजधानी होती ‘क्योटो.’ १८६९ नंतर टोकियो राजधानी म्हणून अस्तित्वात आले आणि त्यानंतर जपानच्या प्रगतीचे केंद्र झाले. पूर्वापार चालत आलेल्या जपानी कल्चरच्या पाऊलखुणा जपणाऱ्या ‘हेरिटेज साईट्स’ आणि आजच्या प्रगत जगातील लँडमार्क्स अशा दोन भागात टोकियोचे स्थलदर्शन विभागले जाते. सम्राट मेजी आणि त्याची सम्राज्ञी शोकेन यांना समर्पित असलेला मेजी श्राइन, आजही जपानच्या ‘रॉयल इंपिरियल फॅमिली’चे निवासस्थान असलेले ‘इंपिरियल पॅलेस’ ईस्ट गार्डन सोडता उर्वरित पॅलेस हा लोकांसाठी ‘जपानी न्यू इअर’ आणि सम्राटाच्या वाढदिवसाशिवाय बंदच असतो. या दोन दिवशी मात्र पॅलेस आणि राजा दोहोंचे दर्शन होऊ शकते. ‘फाइव्ह लेव्हल पॅगोडा’ असलेले ‘असाकुसा सेन्सो’ टेंपल हे टोकियोमधील सर्वांत प्राचीन बुद्धिस्ट टेंपल आहे. ३० लाखाहून अधिक बुद्धधर्मीय दरवर्षी भेट देत असलेले हे टेंपल जपानच्या ‘टॉप टेन टेंपल्स’मध्ये मोडते. 
जपानमधील दुसरे सर्वांत उंच स्ट्रक्चर म्हणजे टोकियो टॉवर होय. येथून शहराचा अप्रतिम नजारा दिसतो. २०१० मध्ये टोकियो स्काय ट्री हा सर्वांत उंच टॉवर बांधून होईपर्यंत टोकियो टॉवर पहिल्या नंबरवर होता. शहराच्या मध्यभागी उभारलेला हा टॉवर तुमच्यासाठी टोकियोचा पॅनोरामा बरोबर कव्हर करतो. तब्बल अडीच लाख स्क्वेअर मीटरवर विस्तारलेले हॅमारीक्यू बोटॅनिकल गार्डन न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कची आठवण करून देते. इलेक्ट्रॉनिक्स आणि हाय एंड शॉपिंगचे टेम्प्टेशन, गिंझा आणि आकाईबारा शॉपिंग डिस्ट्रिक्टमध्ये पूर्ण होते. लोकल आणि इंटरनॅशनल ब्रॅण्ड्स मिळणारी जपानी प्रॉडक्ट्स हे या मार्केट्सचे मुख्य आकर्षण आहे. 

माउंट फुजी 
जपानी आख्यायिकेप्रमाणे, जपानचा राजा चंद्राच्या मुलीच्या प्रेमात पडला. त्यांचा पत्रव्यवहार सुरू झाला. काही काळानंतर त्यांचे बिनसल्यावर राजाने तिची पत्रे त्याच्या सेवकांना, जपानच्या सर्वांत उंच - माउंट फुजीवरून अमृतात भिजवून ती पत्रे जाळण्याची आज्ञा केली. अशाप्रकारे माउंट फुजी अमृताने प्रज्वलित झाला आणि जगातील सर्वांत मोठा ज्वलंत ज्वालामुखी म्हणून ओळखला जाऊ लागला. जपानला गेलेला कुठलाही पर्यटक माउंट फुजी बघितल्याशिवाय परत येऊच शकत नाही. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये, वेगवेगळ्या छटा दाखवून अचंबित करणारा आणि एकापेक्षा एक सुंदर ५ लेक्सच्या मधे वसलेला माउंट फुजी जपानचा ‘टुरिस्ट आयकॉन’ आहे. अनुक्रमे कावागुचीको, सायको, यामानाकाको, शोजिको आणि मोटोसुको या लेक्सच्या किनाऱ्यावरून फुजीच्या अराउंड द इअर विविध छटा पाहायला मिळतात. जपानी पुराणात असलेल्या महत्त्वामुळे अनेक श्रद्धाळू पर्यटक माउंट फुजी चढून जातात. 

हिरोशिमा 
फिनिक्स सिटी म्हणून ओळखली जाणारी हिरोशिमा. दुसऱ्या महायुद्धानंतर अक्षरशः राखेतून उभे केलेले हे शहर पाहिल्यावर ७० वर्षांपूर्वी हे संपूर्ण नष्ट झाले होते यावर विश्वास बसणार नाही. ‘कोड नेम - लिटिल बॉय’ असलेला न्यूक्लिअर बॉम्ब ‘एनालो गे’ नामक विमानाने ६ ऑगस्ट १९४५ मध्ये टाकला आणि वीस हजार सैनिकांसह १,२०,००० जपानी नागरिकांचा बळी घेतला. काही क्षणात राखरांगोळी झालेले शहर युद्धानंतर जपानी लोकांनी प्रचंड एकजुटीने, मेहनतीने आणि श्रमदानाने उभे केले. आजूबाजूच्या शहरांमधला प्रत्येक नागरिक दररोज किमान ४ तास श्रमदान करायचा. 
या सर्व दिवसांच्या आठवणींचे स्मारक आणि युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट ‘हिरोशिमा पीस मेमोरियल’ आणि ॲटॉमिक डोम पाहताना डोळे पाणावतात. मियाजिमा आयलंड म्हणजे हिरोशिमाला मिळालेली नैसर्गिक देणगी आहे. अतिशय युनिक वाइल्ड लाइफ आणि सिनिक वृक्षराजी असलेले हे बेट, फेरीने काहीच मिनिटांच्या अंतरावर आहे. हिरोशिमाचे फेमस ‘टोरी गेट’ याच बेटावरून पाहता येते. 

ओसाका 
ओसाका म्हणजे जपानमधले दोन नंबरचे शहर. आपल्या पुणे मुंबई सारखे जपानचे टोकियो आणि ओसाका. मुख्य बेटाच्या दक्षिणेकडील साईटसिंईंगसाठी ओसाका आयडियल गेटवे आहे. हिरोशिमा तसेच क्योटो आणि नारा या शहरांना भेट देण्यासाठी ओसाका योग्य ठरते. क्योटो म्हणजे जपानची टोकियो आधीची राजधानी. कियोमिझुदारा किंवा गोल्डन पॅव्हिलिओन नावाने प्रसिद्ध संपूर्ण सोन्याचे मंदिर आणि पूर्वी जपानवर राज्य करणाऱ्या ‘शोगुन’ या सेनापती/राज्याचे निजो कॅसल अतिशय इंटरेस्टिंग आहे. नारामधले आगळे वेगळे डिअर पार्क आणि जपानमधील ७ सर्वाधिक प्रभावशाली बुद्ध मंदिरांपैकी एक तोडा-जी टेंपल पाहण्यासारखे आहे. जपानमधल्या सर्वांत जुन्या ओसाकाला स्वतःचा ऐतिहासिक वारसा आहेच. १५८३ मध्ये बांधले गेलेले ‘ओसाका कॅसल’ हे त्या काळाचे जपानी कल्चर जतन करून आहे. 

जपानी फूड आणि शॉपिंग 
‘सुशी’ हा जपानी जेवणाचा आत्मा आहे. व्हिनेगर्ड राइसच्या बेसवर विविध भाज्या आणि मासे यांच्या वेगवेगळ्या फ्लेव्हर्समध्ये तो केला जातो. मासे, बटाटा आणि बांबू या तीन गोष्टी जपानी जेवणाचा हमखास भाग असतात. जपानी जेवणाबरोबर ग्रीन टी प्यायची पद्धत आहे. याला लोकल भाषेत ‘माचा’ म्हणतात. माचा फ्लेव्हरचे आईस्क्रीमदेखील खूप पॉप्युलर आहे. शॉपिंग म्हणाल, तर लोकल सुव्हीनर्स (भेटवस्तू) आणि हॅंडिक्राफ्ट्स अतिशय देखणी असतात. इलेक्ट्रॉनिक्ससुद्धा जपानमध्ये कमालीचे स्वस्त आहे. शिवाय टुरिस्ट म्हटल्यावर आपल्याला व्हॅट रिफंडदेखील मिळतो. याशिवाय दैनंदिन वापराच्या स्मार्ट गोष्टींसाठी ‘मिनिझो’ला भेट देणे आवश्‍यक आहे. 

जपान - चेरी ब्लॉसम 
जानेवारीपासून मेपर्यंत जपानच्या विविध भागात सकुरा किंवा चेरी ब्लॉसम हा सीझन असतो. युनिक भौगोलिक स्थितीमुळे आणि हवामानामुळे जगभरात कुठेही दिसणार नाही अशी नैसर्गिक कलाकृती चेरी ब्लॉसममध्ये दिसते. झाडांची पाने झडून फांद्याच्या फांद्या फुलांनी लगडलेल्या असतात. पांढरी आणि गुलाबी झालेली अशी झाडे अतिशय सुरेख दिसतात. संपूर्ण जगातून लाखो पर्यटक चेरी ब्लॉसममध्ये जपानचे सौंदर्य अनुभवायला येतात. चेरी ब्लॉसमच्या अनेक बागा खास पर्यटकांसाठी तयार केल्या जातात. टोकियो, ओसाकासारख्या अनेक शहरांमध्ये ‘चेरी ब्लॉसम फेस्टिव्हल’ नावाने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.   

संबंधित बातम्या